वार्ताहर / खोची
वारणा पाणलोट क्षेत्र व धरण क्षेत्रात सतत चालू असलेला जोरदार पाऊस त्यामुळे धरणातून चालू असलेला मोठ्या प्रमाणात विसर्ग यामुळे खोची ता.हातकणंगले परिसरातून वहात असलेल्या वारणा नदीच्या पाणी पातळीत रविवारी पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जोडणारा खोची- दुधगांव बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.
नदीकाठच्या शेकडो एकर शेतात पाणी घुसल्याने या भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत.त्यामूळे प्रामुख्याने जनावरांचा चारा,गवती मळी भाग पाण्यात गेले असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने या पाण्याने खोची येथील भैरवनाथ मंदिर परिसराला वेढा दिला आहे.पुन्हा स्मशानभूमीत पाणी शिरले आहे सलग दोन दिवस पावसाची संततधार दमदार आहे. त्यामुळे परिसरात पाणी पाणी झाले आहे. सखल भागात पाणी साठुन डबक्यात रूपांतर झाले आहे.

