पुलाची शिरोली / वार्ताहर
कोल्हापूर -सांगली राज्य महामार्गावर हेरले ता. हातकणंगले देसाई मळा नजीक रस्त्याच्या मध्यभागी रस्ता खचून शंभर फुटच्या अंतरापर्यंत दहा ते बारा खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणचा मार्ग अपघातास निमंञक बनला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवून पॅचवर्क करून हा मार्ग सोयीस्कर करावा . अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर हेरले येथील देसाई मळ्यानजीक रस्त्याच्या मधोमध भाग खचून शंभर फुटापर्यंत दहा ते बारा मोठे खड्डे पडले आहेत. तीन ते चार फुट लांबीचे व पाऊण फूट खोलीचे हे खड्डे आहेत.या ठिकाणी कायम रस्त्याच्या बाजूला चार ते पाच ट्रक उभे असतात. या परिसरात पाणी साठून राहिल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. हा भाग वळणदार असल्याने ‘ब्लांईड कर्व्हमुळे ‘पुढील भाग वाहन चालकास सहजासहजी दिसत नाही. या राज्य महामार्गावरून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, अवजड वाहने जलद गतीने जातात. रस्त्याच्या मधोमध खड्डे असल्याने अनेक दुचाकीस्वार खड्ड्यात गाड्या आदळून स्लीपहून पडले आहेत. अनेक दूचाकी तीनचाकी गाडया मोठया गतीने जात असतांना या खड्डयात मोठ्या प्रमाणात जोरात आदळल्या गेल्याने गाडयांची मोडतोडही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
चारचाकी वाहनासुद्धा या रस्त्यावरून जलद गतीने जातांना हेलकावे खात्याले दिसतात व गाडयावरचा ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या बाजूला कायम ट्रक उभे असल्यानेही हा परिसर अपघात प्रवण झालेला असून मृत्यूचा सापळा बनला आहे. यापूर्वी हे खड्डे भरून जुजबी सेवा दिला होती. पक्क्या स्वरूपाचे पॅचवर्क व्यवस्थीत न झाल्याने पुन्हा हा रस्ता उखडला जाऊन खड्डेमय झाला आहे.
या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला ट्रक थांबण्यास मज्जाव करावा. या रस्त्यावरील खड्डे पुन्हा पडू नयेत अशा प्रकारे त्यांचा पॅचवर्क करावा व या ठिकाणच्या चिखलमय भागात मुरूमीकरण करावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
कोल्हापूर-सांगली महामार्गावरील या खड्डयामुळे हा मृत्युचा सापळा बनला आहे. यापूर्वी दोन वेळेला खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजविले होते. मात्र हे पॅचवर्क व्यवस्थीत झाली नाहीत यासाठी खड्डे पुन्हा पडू नयेत अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाने पॅचवर्क केले पाहिजेत तसेच जे रस्त्या कडील व्यवसाय आहेत त्यांनाही त्याची काळजी घेऊन वाहने पार्किंग करण्याची व्यवस्था करावी. तरच ही समस्या कायमची दूर होईल. – अॅड. प्रशांत पाटील


previous post