Tarun Bharat

कोल्हापूर : सीपीआरमधील बेडसाठी सौदेबाजी

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजेनेट बेडची मागणी वाढतेय, ‘सीपीआर’मधून व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. अडलेल्या रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना सीपीआर चौकात गाठून त्याच्याकडे दहा हजारांची मागणी केली जात आहे. बार्गेनिंग करत पाच हजार रूपयांत सौदा ठरतो अन् रात्री उशिरा ‘सीपीआर’मध्ये रूग्णाला बेड मिळतो. रूग्णांना लुटणार्‍या या कार्यकर्ता नामक टोळीचा सीपीआर चौकात वावर आहे, या टोळीत चौकडीचे सीपीआर कनेक्शन आहे, त्यामुळे रूग्णांना लुटणाऱया या टोळीचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या सप्ताहातील घटना, शहरातील एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर नागाळा पार्क येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिचा दोन दिवसांत मृत्यू झाला, तिच्या पतीला याचा धक्का बसला, त्यांचाही स्वॅब घेण्यात आला. त्यांना तातडीने उपचाराची गरज होती, शहरातील कोणतेही हॉस्पिटल त्यांना दाखल करून घेत नव्हते, अन् या रूग्णाच्या मुलाला या टोळीतील एकजण भेटला. त्याने गरज पाहिली अन् सीपीआरमध्ये आठ ते दहा हजारांत बेड देतो, असे सांगितले. गरज होती, पण इतकी रक्कम देणे अवघड होते तेव्हा त्याने 8 हजारांची मागणी केली. टोळीने रूग्णाची गरज पाहिली अन् सौदा पाच हजारांत फायनल झाला. त्यातील दोन हजार रूपये काही वेळातच त्याला देण्यात आले, रूग्णाला सीपीआरमध्ये बेड मिळाल्यानंतर उर्वरीत 3 हजार रूपये दुसर्‍या दिवशी संबंधिताला देण्यात आले. दरम्यानच्या काळात रूग्णाचा मृत्यू झाला. पण त्यांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला, कोरोना रूग्णांना बेड नाहीत म्हणून एकीकडे ओरड सुरू असताना 10 हजारांत गरजू रूग्णाला बेड मिळतो कसा, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

टोळीतील एक सीपीआरमधील वॉर्डशी निगडीत
सीपीआरमध्ये 400 ऑक्सिजनेटेड बेड आहेत, त्यातील काही एनआयव्ही आहेत. रूग्णांना एनआयव्ही समजत नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. सीपीआरमधील डॉक्टर अन् अन्य स्टाफ जीव तोडून कार्यरत आहे. सीपीआरमधील उपलब्ध बेडची माहिती प्रशासनाला दिली जात आहे. हायरिस्क रूग्णांची संख्या वाढत असताना बेडचा सौदा करणारी टोळी रूग्णांना लुटत आहे. त्यांच्यातील एकजण सीपीआरमधील वॉर्डशी निगडीत आहे. पण बेड देताना ही रक्कम आत द्यावी लागते, आम्ही ती घेत नाही, असे साळसुदपणे या टेळीकडून सांगितले जात आहे. पण ही टोळी नेमकी पैसे देते कोणाला, की ती चैनीसाठी वापरते, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

कार्यकर्ता नावाखाली टोळी कार्यरत?
सीपीआर हॉस्पिटल चौकात या टोंळीचा वावर आहे. करवीर पंचायत समितीच्या शेजारील केबीनसमोर यातील काहीजण थांबतात, रूग्णाचा नातेवाईक दिसल्यास त्याला शोधतात. त्याच्याकडे बेडसाठी 10 हजारांची मागणी होते अन् सौदा पक्का होताच काही तासांतच रूग्णाला ‘सीपीआर’मध्ये बेड दिला जातो. आतापर्यत या टोळीने पैसे घेऊन अनेकांना बेड दिले आहेत, पण याची कोणीही वाच्यता करत नाही. ‘कार्यकर्ता’ या नावाखाली ही टोळी सक्रीय आहे. या टोळीचा संपर्क आतील यंत्रणेशी आहे. सीपीआर चौक अन् सीपीआरमधील प्रवेशद्वाराशेजारील केबीन ही या टोळीची सेंटर पॉईंट आहेत, यासंदर्भात जिल्हा प्रशासनासह पोलिस यंत्रणेने याची तातडीने दखले घेऊन या टोळीला पायबंद घालावा, अशी मागणी आहे.

होम क्वॉरंटाईनचे बोगस शिक्के मारणारीही होती टोळी
यापुर्वी दोन महिन्यांपुर्वी सीपीआरमध्ये तपासणीसाठी येणाऱया रूग्णांना होम कोरोंटाईन केले जात होते, या काळात होम क्वॉरंटाईनचे बोगस शिक्के देणारी टोळी सक्रीय होती, यासंदर्भातील वृत्तही सर्वप्रथम ‘तरूण भारत’ने दिले होते. त्यानंतर या टोळीतील काही जणांवर पोलिसांनी कारवाई केली होती, आताही या टोळीशी निगडीत काही जण बेड देण्यात सक्रीय झाल्याची चर्चा आहे.

Related Stories

एकदिवसाच्या कारवाईचे नाटक कधी बंद होणार ?

Archana Banage

कोल्हापूर खंडपीठ : पंधरा दिवसात केंद्रीय कायदे मंत्र्यासोबत बैठक – नारायण राणे

Abhijeet Khandekar

डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच आज दलितांमध्ये आत्मविश्वास, लवकरच इंदूमिल स्मारक पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

Rahul Gadkar

संचारबंदीत कामगारांकडे ओळखपत्र बंधनकारक

Archana Banage

पदवीधर’शिक्षक’च्या तयारीला लागा

Archana Banage

एनडीए परीक्षेत रोनित नायक देशात प्रथम

Archana Banage