भोगावती / प्रतिनिधी
ऊस दराच्या एफआरपी ची रक्कम तीन हप्त्यात देण्यासंदर्भातील करार करून घेण्याच्या भोगावती कारखान्याच्या प्रक्रियेबाबत शनिवारी परिते (ता.करवीर) येथील कारखान्याच्या शेती गट कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.साखर सहसंचालकांनी निर्देश देऊनही सभासदांकडून संमतीपत्रे लिहून घेतली जात असल्याच्या कारणावरून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चारशेहुन अधिक करार फाडून टाकले.यावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने वातावरण गंभीर बनले होते.
भोगावती सहकारी साखर कारखाने चालू ऊस लागण हंगामाच्या कराराला जोडूनच तीन हप्त्यांमध्ये ऊसदर देण्यासाठी शेकऱ्याकडून संमतीपत्रे घेतले जात आहेत.याबाबत शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाला न्यायालयाचा अवमान होत आहे,एक रकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे.अशा सूचना केल्या होत्या.शिवाय असे प्रकार जिल्ह्यात सुरू असल्याचे साखर सह संचालक यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले होते. या नंतर साखर सहसंचालकांनी सभासदांच्या संमतीशिवाय कोणतेही चुकीचे करार करून घेऊ नयेत व त्याबाबत सभासदाला वेठीस धरू नये अशा सूचना केल्या होत्या.
तरीही भोगावती साखर कारखान्याकडून असे करार केले जात असल्याचे आज पुन्हा दिसून आल्याने या परिसरातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिते शेती गट कार्यालयावर जाऊन हा प्रकार हाणून पाडला. त्यांनी आतापर्यंत केलेले सर्व ४०० हून अधिक करार फाडुन टाकले.यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी शत्रुघ्न पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटील यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली.

