वार्ताहर / हेर्ले
कोल्हापूर सांगली महामार्गावर हेर्ले (ता.हातकणंगले) येथे देसाई मळ्याजवळ मोठा गाजावाजा करून आठ दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजवलेले खड्डे पूर्ववत झाले असून काम केलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.यामुळे वाहनधारकांच्या जिवाशी खेळण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असून वाहनधारकांतुन संताप व्यक्त होत आहे.
कोल्हापूर सांगली हा अतिशय रहदारीचा महामार्ग आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. गेल्या आठ दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठा गाजावाजा करून व प्रसिद्धी करून या महामार्गावरील देसाई मळ्याजवळील खड्डे हजारो रुपये खर्च करून भरून घेतले पण सद्यस्थितीत या रस्त्यावर मोठे खड्डे पडून या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले आहे. रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे पडल्या मुळे वाहनधारकांना याचा अंदाज येत नाही ,यामुळे वाहनधारकांच्या जिवाशी खेळण्याचे काम बांधकाम विभागाकडून सुरू आहे यामुळे वाहनधारकांतुन सार्वजनिक बांधकाम विभागाला लाखोली वाहिली जात आहे.
हा महामार्ग अपघाताचा मार्ग म्हणून ओळखला जातो सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ आठ दिवसांत या खड्यांचे डांबरीकरण करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करून या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका सरचिटणीस मुनीर जमादार यांनी दिला आहे.


previous post