कोळशाअभावी वीजनिर्मितीवर मोठा परिणाम
वीज भारनियमनापासून सुटका होणार काय?
कोळशाच्या तुटवडय़ामुळे देशावर वीज संकटांची टांगती तलवार आहे. वीजनिर्मितीमध्ये अडचणी आणि आव्हान निर्माण झाले आहे. तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर देश अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर अनेक राज्यांनीही केंद्र सरकारकडे आर्जव सुरू केले आहे. पण कोळसा टंचाई आणि वीजसंकटाची समस्या भीषण नसल्याची सारवासारव केंद्र सरकारने केली आहे. तथापि, सध्या जवळपास सर्वच जगासमोर ऊर्जेचे मोठे संकट उभे ठाकलेले दिसते. भारत, चीन, युरोपसह इतर अनेक देशात सुरू असलेल्या ऊर्जासंकटामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. विविध देशांमधील कोळसा खाणींमधील कोळसा संपला काय? चीनमध्ये कोळशाचा तुटवडा जाणवतोय काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या अनुषंगाने घेतलेल्या कोळसा टंचाई-पुरवठा आणि विजेचे संकट यासंबंधीचा आढावा…!
कोळसा टंचाईची कथा...


देशात कोळशाचा तुटवडा निर्माण होण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. देशातील अर्थव्यवस्था सुधारत असल्याने विकासाला गती मिळत असून कोळशाच्या मागणीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. कोळशाच्या खाणी असलेल्या भागात गेल्या काही दिवसात पाऊस मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे उत्खननात अडचणी येत आहेत. खाणींमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे आणि भारतात आयात करण्यात येणाऱया कोळशाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे सध्यातरी सांगितले-बोलले जात आहे. तसेच मान्सूनच्या आधी आवश्यक प्रमाणात कोळशाचा साठा न केल्याचे कारणही पुढे केले जात आहे.
ऊर्जा संकटाची व्यथा…
जगभरात ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाचाच वापर मोठय़ा प्रमाणात होतो. मात्र पर्यावरणाचा ऱहास टाळण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी युरोप, अमेरिकेत कोळशाच्या उत्पादनात घट करण्यात आली आहे. त्यामुळे या देशांमधील कोळसा उत्खनन मंदावले आहे. परिणामी या क्षेत्रातील गुंतवणुकीवरदेखील परिणाम झाला आहे. अपारंपारिक ऊर्जेला सर्वत्र प्रोत्साहन दिले जात आहे. अशा परिस्थितीत जगातील कोळसा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कोळशाचे उत्पादन घटल्यामुळे एकीकडे कोळशाच्या उत्खननात घट तर दुसरीकडे वीज निर्मितीसाठी कोळशाची आवश्यकता अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतातील स्थिती…
चीन आणि भारत हे दोन्ही देश विजेसाठी मोठय़ा प्रमाणावर कोळशावर अवलंबून आहेत. चीन सर्वाधिक कोळशाची आयात करतो. तर भारत तिसऱया क्रमांकाचा कोळसा आयातदार देश आहे. कोळसा उत्खननात चीन पहिल्या तर भारत दुसऱया क्रमांकावर आहे. देशातील कोळशावर चालणाऱया बहुतेक वीज प्रकल्पांना कोळशाच्या साठय़ाची कमतरता भासत आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या मते, देशात एकूण कोळशावर चालणारे 135 कारखाने आहेत. नियमानुसार, सर्व ऊर्जानिर्मिती प्रकल्पांमध्ये कमीतकमी 20 दिवस कोळसासाठा ठेवावा लागतो, परंतु सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बहुतांश प्रकल्पांमधील कोळसासाठा कमी झाल्याने नजिकच्या काळात भारनियमनासारख्या गंभीर स्थितीचा सामना करावा लागू शकतो.
केंद्र सरकारची फुंकर…


देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठा परिस्थितीचा केंद्राने आढावा घेतला आहे. देशात वीजपुरवठा खंडीत होण्याचा कोणताही धोका नाही. कोल इंडिया लिमिटेडकडे 24 दिवसांचा पुरवठा करता येईल इतका 43 दशलक्ष टन कोळसा साठा उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली होती. दररोज कोळसा पुरवठा करून औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा कोळसासाठा वाढविला जात आहे. मान्सूनच्या परतीसोबत कोळसा पुरवठय़ात गती आल्यानंतर केंद्रांमध्ये कोळशाचा साठा वाढेल, असा दावा करत वीज पुरवठय़ामध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याची ‘फुंकर’ सरकारने मारली आहे. मात्र, यानंतर कोल इंडियाने कोळसा पुरवठय़ावर घातलेले निर्बंध पाहता स्थिती काहीशी चिंताजनक असल्याचे दिसते.
‘कोल इंडिया’चे निर्बंध…
कोळशा टंचाईमुळे कोल इंडिया लिमिटेड (सीएएल) कंपनीने वीजनिर्मिती न करणाऱया पुरवठादार कंपन्यांचा कोळसा पुरवठा पुढील काही दिवस बंद ठेवण्यात येत असल्याचे कळवले आहे. राष्ट्रहित विचारात घेऊन पुढील काही दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय घेतल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. सद्यस्थितीत वीजनिर्मिती केंद्रांना आवश्यकतेप्रमाणे कोळशाचा पुरवठा होत नसल्यामुळे वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झालेला दिसतो. बऱयाच राज्यांमधील वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ही समस्या निर्माण झाल्यानंतर काही ठिकाणी भारनियमनही सुरू करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कोल इंडिया या पुरवठादार कंपनीने कोळसा पुरवठय़ाच्या निकषात तात्पुरते बदल केले आहेत. कंपनीने वीज क्षेत्रासाठी असलेल्या कोळशाचे सर्व ऑनलाईन लिलावही बंद केले आहेत. एकंदर परिस्थिती चिंताजनक असल्याचेच दिसून येत आहे.
वीजनिर्मितीतील अडचणी…


महाराष्ट्र ः महाराष्ट्रात वीजपुरवठा करणाऱया ‘महावितरण’नेही नागरिकांना वीज जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. महावितरणला वीजपुरवठा करणाऱया विविध औष्णिक वीजनिर्मिती पेंद्रांतील काही संच सद्यस्थितीत बंद ठेवल्यामुळे तब्बल 3,330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्राsतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तर प्रदेश ः कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात वीजनिर्मिती प्रभावित होण्याची शक्मयता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोळशाची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले. कोळशाच्या कमतरतेमुळे हे संकट अधिक गडद होऊ शकते, असे मतप्रदर्शन ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांनी केले आहे. येथे पुढील वर्षीच्या प्रारंभी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारला वेळीच पावले उचलावी लागतील. अन्यथा निवडणुकीत ‘शॉक’ लागण्याची भीती आहे.
दिल्ली ः देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीतील वीज वितरण कंपनी टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्यूशन लिमिटेडचे सीईओ गणेश श्रीनिवासन यांनी लोकांना समन्यायीपणे वीज वापरण्याचे आवाहन केले आहे. देशभरात कोळशाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मिती कमी झाली आहे आणि आगामी काळात दिल्लीत वारंवार लोडशेडिंग होऊ शकते, असा इशाराच त्यांनी दिला आहे. अन्य काही राज्यांमध्येही अशीच स्थिती आहे.
मागणी-पुरवठय़ाचे ‘गणित’ बिघडले !


कोरोना महामारी हे एक मोठे कारण ऊर्जा संकटामागे आहे. संपूर्ण जगभर कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे उद्योगधंदे ठप्प झाले होते. उद्योग बंद पडल्याने ऊर्जेचा खप घटल्यामुळे ऊर्जेची मागणी कमी झाली. वीज खूप मोठय़ा प्रमाणात साठवून ठेवली जाऊ शकत नाही, त्यामुळे विद्युत जनित्रांनी आणि वीजनिर्मिती प्रकल्पांनी विजेचे उत्पादन घटवल्यामुळे कोळशाच्या मागणीत घट झाली. कारण बहुतांश वीजनिर्मिती ही कोळशाद्वारे केली जाते. मात्र कोरोना महामारीतून सावरल्यानंतर उद्योगधंद्यांनी गती पकडली आहे. परिणामी विजेची मागणी वाढली आहे. इतक्मया मोठय़ा प्रमाणावर विजेची मागणी वाढेल असा अंदाज नव्हता, त्यामुळे विजेची मागणी आणि त्याचा पुरवठा यांचे गणित बिघडले. भारताप्रमाणेच युरोप-रशियातदेखील ऊर्जेची मागणी वाढल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वषीच्या तुलनेत यावषी विजेची मागणी खूप वाढल्यामुळे वीजनिर्मितीसाठी कोळशाचा वापरही वाढला. सद्यस्थितीत आम्ही 2 कोटी 82 लाख घरांना वीजपुरवठा करत आहोत. त्यातच औद्योगिक उत्पादन क्षेत्रामध्येही विजेचा वापर अधित होत आहे. एकंदर देशातील विजेचा वापर आणि मागणी वाढल्यामुळे वीज प्रकल्पांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे.
– केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह
समस्येमागील कारणे…
पावसामुळे पुरवठय़ात व्यत्यय…
यावषी सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादक भागात मुसळधार पावसामुळे कोळसा खाण आणि वाहतूक विस्कळीत झाली. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा येथील अनेक कोळसा खाणींमध्ये पाणी साचल्याने अनेक दिवस काम बंद राहिले. साहजिकच वीजनिर्मिती केंद्रांना आवश्यकतेनुसार कोळशाचा पुरवठा होऊ शकला नाही.
कोळसा आयातीत झालेली घट…
आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या किमती वाढल्यामुळे 2019-20 च्या तुलनेत यावषी कोळशाच्या आयातीत घट झाली. इंडोनेशियात, मार्चमध्ये कोळशाची किंमत 60 डॉलर प्रतिटन वरून सप्टेंबरमध्ये 200 डॉलर प्रतिटन झाली. इतक्या चढय़ा भावाने खरेदी करणे अशक्य झाल्याने विदेशातून होणाऱया आयातीत घट झाली.
कोविडमध्ये वीज वापर वाढला…
कोविड काळातील लॉकडाऊन, निर्बंध, मनुष्यबळाची कमतरता याचा थेट परिणाम देशातील कोळशाच्या खाणींमधील उत्खनन प्रक्रियेवरही झाला. साहजिकच कोळसा उत्पादनात घट दिसून आली. याउलट कोविडदरम्यान वीजेची मागणी 200 गीगावॅटपर्यंत वाढली. सध्या ही मागणी 170-180 गीगावॅटच्या आसपास आहे.
सण-समारंभ, औद्योगिक वापरात वाढ…
सणासुदीमुळेही विजेची मागणी पुन्हा वाढत आहे. दसरा-दिवाळीपर्यंत वीजवापर वाढू शकतो. याव्यतिरिक्त कोविडनंतर औद्योगिक उत्पादन वाढवण्याच्या प्रक्रियेने वेग घेतल्यानंतरही विजेची मागणी वाढली आहे. ऑगस्ट 2019 च्या तुलनेत, ऑगस्ट 2021 मध्ये देशातील विजेचा वापर 18 अब्ज युनिटने वाढला आहे.
समस्येवर तोडगा कसा काढणार ?
@ पावसाळा आणि इतर कारणांमुळे कोळशाचे उत्पादन खंडित झाले. मात्र आता पाऊस ओसरताच कोळसा उत्खनन वाढवून किंवा आयात वाढवून कोळसा पुरवठय़ाची गाडी रुळावर आणण्याची गरज आहे.
@ देशाच्या विविध भागातील विद्युतनिर्मिती केंद्रांना आवश्यकतेप्रमाणे कोळशाचा पुरवठा केल्यास वीजनिर्मितीही योग्यपणे होऊ शकेल. यासाठी रितसर नियोजन करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न सुरू करावे लागतील.
@ धोरणात्मक निर्णयांमुळे अनेक प्रकल्पांचे उत्पादन बंद आहे. मोठय़ा खाणींसाठी जागाही मोठी लागते. तथापि जमिनीच्या वादात अनेक खाणी बंद पडल्या आहेत. त्यांना चालू करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावे लागतील.
– संकलन ः जयनारायण गवस