मुंबई महानगरपालिकेने जंबो कोविड उपचार पेंद्रांमधील उपकरणे, साहित्य इतर पालिका रुग्णालयांमध्ये हलविण्यास सुरुवात झाली आहे. तर खासगी रुग्णालयेदेखील कोरोना
वॉर्ड कमी करण्यास सरसावली आहेत. याचा अर्थ कोरोना नियंत्रणात येत आहे. कोरोनाचा गाशा गुंडाळताना आरोग्य यंत्रणा मात्र संभाव्य तिसऱया लाटेच्या वास्तवतेचे भान ठेवण्यास अजिबात विसरत नाही, ही जमेची बाजू आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या पाहिल्यास कोरोनासंसर्ग कमी होत असल्याचे सहज ध्यानात येत आहे. 5 नोव्हेंबरपासून राज्य आणि मुंबई पातळीवर रुग्णसंख्या अनुक्रमे 850 ते 200 च्या घरात स्थिरावलेली दिसून येते. 5 ते 15 नोव्हेंबर या दहा दिवसाच्या कालावधीत 10 नोव्हेंबर रोजीचा अपवाद वगळावा लागेल. या दिवशी राज्यातील रुग्णसंख्या 1094 एवढी म्हणजे ती हजार पार तर मुंबईतील रुग्णसंख्या 339 एवढी म्हणजे 200 पार झाली होती. मात्र 10 नोव्हेंबरच्या आदल्या दिवशी राज्यात 10 कोटी लोकसंख्येचे पहिला डोसचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. रुग्णसंख्या कमी होण्यामागे लसीकरण हा महत्वाचा टप्पा ठरत आहे. त्यामुळेच रुग्णसंख्या घटत असल्याचे कोणीही सांगू शकेल. ही रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात घटत असल्यानेच कोविड पेंद्रातून रुग्णसंख्या फार कमी प्रमाणात दाखल असलेली आढळून येत आहे. नेसकोसारख्या जम्बो कोविड पेंद्रात फेज वन, फेज टू असे मोठाले रुग्णसेवा दालने सुरु करण्यात आली होती. आता या प्रत्येक दालनात दाखल रुग्णसंख्या विखुरलेल्या स्वरूपात असल्याचे दिसून येते. एका फेजमध्ये 3 रुग्ण तर दुस़ऱया फेजमध्ये पाच तसेच तिसऱया फेजमध्ये 10 अशी रुग्णसंख्या असल्याने हे सर्व एकाच वॉर्डमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. उर्वरित कोरोना वॉर्ड बंद करण्याचा निर्णय पालिका पातळीवर घेण्यात आला असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मांडले. त्यामुळे रुग्णांची आणि बंद वॉर्डातील उपकरण साहित्याची काळजी घेणे सोपे जाणार आहे. शिवाय वेगवेगळय़ा वॉर्डात विखुरलेले रुग्ण असल्यास त्यातून संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता असते. ही भीती टाळण्यासाठी रुग्ण एकाच वॉर्डात दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय बंद करण्यात आलेल्या
वॉर्डातील एकही वस्तू वाया जाणार नाही याची काळजी पालिकेकडून घेण्यात येत आहे. बंद करण्यात येणाऱया बेड कव्हरपासून ते महत्वाच्या व्हेंटिलेटरपर्यंत सर्व वस्तू इतर रुग्णालयांमध्ये देण्यात येणार आहेत. कोविड पेंद्रातील व्हेंटिलेटर ज्या पालिका रुग्णालयात गरज लागणार त्या ठिकाणी देण्यात येणार असल्याने पालिका रुग्णालयेदेखील अद्ययावत होणार आहेत. कोविड नियंत्रणात येत असून तो पूर्ण गेला नाही याचे भान पालिकेच्या या नियोजनातून दिसत आहे. शिवाय संभाव्य तिसरी लाटही आल्यास अद्ययावत उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोणत्याही गंभीर स्थितीत उपलब्ध साधन साहित्याचा योग्य वापर करण्याचे पक्के नियोजन पालिका पातळीवर घेण्यात आले आहे. कोरोना रुग्ण कमी होत असल्याने पालिकेच्या राजावाडी रुग्णालयाने चार कोविड वॉर्डपैकी एकच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हीच स्थिती इतर पालिका रुग्णालयांची आहे. याला कारण म्हणजे पालिकेच्या डॅशबोर्डच्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत मुंबईत 15,582 कोविड खाटांपैकी 14,326 खाटा रिक्त होत्या. सरकारी जम्बो कोविड पेंद्रातून असे चित्र असताना खाजगी रुग्णालयांनीदेखील घटत्या रुग्णसंख्येनुसार निर्णय घेण्यात येऊ लागले आहेत. मुंबईतील काही रुग्णालये पूर्णपणे नॉनकोविड सुविधांकडे वळण्यास उत्सुक आहेत. त्यामुळेच गेल्या आठवडय़ात खाजगी रुग्णालयांच्या संयुक्त बैठकीत कोविड रूग्णांच्या खाटा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या रुग्णालयांनीदेखील कोविड अत्यावश्यक यंत्रणा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून अचानक रुग्ण वाढ झाल्यास पूर्ण ताकदीने कोविड रुग्ण सेवा पुन्हा सुरु केली जाऊ शकते असे नियोजन खाजगी रुग्णालयांनी केले आहे. दरम्यान मुंबईत दिवाळी सणात बाजारात मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र गर्दीमुळे संसर्ग फैलावेल यासाठी पाच दिवसांच्या चाचण्यांत रुग्ण वाढ झाली नसल्याचे आढळून आले. मात्र दिवाळीनंतर 15 दिवस परीक्षेचे राहतील अशा सूचना आरोग्य विभागाच्या पातळीवर देण्यात आल्या. त्यामुळे 20 नोव्हेंबरपर्यंत चाचण्यांवर भर देऊन निरीक्षण मांडण्यात येणार आहे. तसेच 9 नोव्हेंबरदरम्यान चाचण्यादेखील वाढविण्यात आल्या होत्या. 33 हजार नमुन्यांच्या ठिकाणी 41 हजार नमुने घेण्यात आले होते. यात रोजचा पॉझिटिव्हिटी दर हा 1 टक्क्याहूनही कमी असल्याचे दिसून आले. तर दुस़ऱया बाजूला 13 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ही 5997 वरून 3580 वर आली असल्याचे आकडेवारी सांगत आहे. सक्रिय रुग्णांमधील ही घट सुमारे 40.3 टक्क्यावर आहे.
सणउत्सव साजरे करूनदेखील मुंबईत घटत जाणारी रुग्णसंख्या, पॉझिटिव्हिटी दर कमी होणे, सक्रिय रुग्णसंख्या खालावणे याचे श्रेय लसीकरण आणि आरोग्य विभागाच्या तत्परतेला जात आहे. आता तर प्रवासी, गर्दीच्या ठिकाणी भेटी देणाऱयांची संख्या सतत वाढत असून ही रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. 15 ऑगस्ट रोजी सुरु झालेली लोकल, 4 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या शाळा, 7 ऑक्टोबरपासून उघडलेली मंदिरे असे असूनदेखील पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णसंख्या कमी होण्याने कोविड गाशा गुंडाळत असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयांनीदेखील कोरोना वॉर्ड कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संभाव्य तिसऱया लाटेचा विचार करता तशी सज्जतादेखील ठेवण्यात आली असल्याची खात्री प्रशासन देत आहे.
राम खांदारे