Tarun Bharat

‘कोविड’ नियंत्रणासाठी ‘त्रिस्तरीय व्यवस्थापन ’

कृष्णात चौगले / कोल्हापूर

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर 22 मार्चच्या जनसंचारबंदीनंतर आजतागायत संपूर्ण राज्य लॉकडाऊन आहे. तरीही राज्यातील कोरोना बाधितांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने कोविड व्यवस्थापनासाठी त्रिस्तरीय रचना करण्याचे निर्देश सर्व जिह्यांना दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून त्रिस्तरीय व्यवस्थापन कार्यक्रम निश्चित केला आहे. जिह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यास याची तत्काळ अंमलबाजावणी केली जाणार आहे. 

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. यामध्ये कोरोनाची लागण झालेला रूग्णांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार त्यांना उपचार द्यावे लागतात. यामध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र बाधित असे तीन प्रकार आहेत.  त्यानुसार त्यांच्यावरील उपचार पद्धतीतही बदल होतो. परिणामी भविष्यात  रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्यावर एकाच ठिकाणी उपचार करणे अशक्य आणि गैरसोयीचेदेखील आहे. तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांची संख्याही मोठी आहे. त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून सध्या संशयीत रुग्ण म्हणून उपचार केले जातात. वैद्यकीय निरिक्षणाखाली त्यांना होम अथवा ईन्स्टीटय़ूट क्वारंनटाईन केले जाते.

सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता येत्या काही दिवसांत त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब गांभिर्याने घेऊन राज्यशासनाने सर्व जिह्यात ‘कोविड त्रिस्तरीय व्यवस्थापन’ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेने कोविड काळजी केंद्र, कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड दवाखाना अशी त्रिस्तरीय रचना केली आहे. यामध्ये जिह्यात 62 ठिकाणी कोविड काळजी केंद्र करण्याचे निश्चित केले आहे. या केंद्रामध्ये 1 वैद्यकीय अधिकारी आणि पुरेसे कर्मचारी दिले जाणार आहेत. या ठिकाणी कोरोना संशयीतांवर (सौम्य कोविड) उपचार केले जाणार आहेत. शाळा, वसतिगृहे अथवा हॉटेलमध्ये ही केंद्रे सुरु केली जाणार आहेत.

कोरोना बाधित असलेला पण त्याच्या आरोग्यावर मध्यम स्वरूपात परिणाम झाला असेल तर त्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘कोविड आरोग्य केंद्रांची’ स्थापना केली जाणार आहे. या केंद्रांमध्ये ‘अतिदक्षता विभाग’ अत्यावश्यक असल्यामुळे खासगी दवाखाने, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ती सुरु केली जाणार आहेत. त्यानुसार जिह्यात 18 ठिकाणी कोविड आरोग्य केंद्रे सुरु होतील. तर कोरोना बाधित पण ज्याच्या आरोग्यावर तीव्र स्वरुपात परिणाम झालेला आहे, अशा तीव्र कोरोनाग्रस्तांसाठी समर्पित कोविड दवाखाना सुरु केला जाणार आहे. या ठिकाणी व्हेंटीलेटर, अतिदक्षता विभाग आणि तज्ञ स्टाफची गरज आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, कोल्हापूर, डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, आयजीएम रुग्णालय इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज व केदारी रेडेकर हॉस्पिटल, गडहिंग्लज या पाच ठिकाणी कोविड दवाखाना सुरु केला जाणार आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यास ही त्रिस्तरीय व्यवस्थापन रचना सुरु केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

 आता 28 दिवसांचे होणार ‘होमक्वॉरंटाईन’

शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील तरुण मरकजहून 18 मार्च रोजी जिह्यात आला. त्यानंतर तब्बल 23 दिवसांनी त्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यामुळे 14 दिवसांपर्यंत कोरोनाचा अहवाल स्पष्ट होतो, या वैद्यकीय निष्कर्षाला छेद गेला आहे. अशा प्रकारे राज्यातही काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे होमक्वॉरंटाईनचा कालावधी 14 वरून 28 दिवस करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला असल्याची माहिती सीईओ अमन मित्तल यांनी दिली. सध्या पुणे, मुंबईसह परदेशातून जिह्यात आलेल्या नागरिकांना 14 दिवस होमक्वॉरंटाईन केले आहे. प्रशासनाच्या नवीन धोरणानुसार या सर्वांना आणखी 14 दिवस होमक्वॉरंटाइन केले जाणार आहे. तसेच सध्या ज्या कोरोना संशयित रुग्णांना होमक्वॉरंटाइन केले आहे, त्यांनाही 28 दिवस घराबाहेर पडता येणार नाही. त्याबाबत सर्व गावसमित्या आणि प्रभाग समित्यांना सूचना दिल्या असल्याचेही सीईओ मित्तल यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले.

संशयितांनी माहिती लपवू नये

जिह्यात एखादी व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात आली असेल तर त्या व्यक्तीने स्वतःहून त्याबाबतची माहिती प्रशासनास द्यावी. कोरोनाची लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन त्याबाबत उपचार घ्यावेत. लोकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.

         चोरवाटेने गावात अथवा शहरात आल्यास माहिती कळवा

मुंबई, पुणे अथवा बाहेरील जिह्यातून एखादी व्यक्ती आपल्या गावात अथवा शहरात आल्यास तेथील नागरिकांनी संबंधित व्यक्तीची माहिती प्रशासनास कळवून सहकार्य करावे असे आवाहन सीईओ अमन मित्तल यांनी केले.

Related Stories

परजिल्ह्यातून पॉझिटिव्ह रूग्ण कोल्हापुरात

Archana Banage

चुकीच्या पिक पंचनाम्यास शेतकऱ्यांचा विरोध

Archana Banage

आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर

Patil_p

पावनगडावर सापडले शिवकालीन तोफगोळे

Archana Banage

कोरोना रोखण्यासाठी नरंदे ग्रामपंचायततिची जनचळवळ

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात लवकरच ३ नवीन पोलीस ठाणे -पालकमंत्री सतेज पाटलांची घोषणा

Rahul Gadkar