Tarun Bharat

कोव्हिड-19 लढय़ात लस मिळाल्यानंतरच क्रिकेट सुरु करा

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची सूचना, प्रत्यक्ष लढतीपूर्वी किमान एका महिन्याचा सराव आवश्यक असल्याचे प्रतिपादन

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोणत्याही स्तरावरील प्रत्यक्ष व्यावसायिक क्रिकेट लढतीत खेळण्यापूर्वी खेळाडूंना किमान 3 ते 4 आठवडय़ांचा सराव आवश्यक असेल. पण, सध्याच्या घडीला कोव्हिड-19 विरुद्धचा लढा सर्वाधिक महत्त्वाचा असून यात निर्णायक लस मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष क्रिकेटला सुरुवात करावी, अशी सूचना भारतीय कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केली. ईएलएसए (इंग्लिश लँग्वेज स्पीच असिस्टन्ट) ऍपच्या ब्रँड ऍम्बेसिडरपदी निवड झाल्यानंतर ऑनलाईन पत्रकार परिषदेला तो येथे संबोधित करत होता. कोरोनानंतरचे नवे जगत बरेच बदललेले असेल, खेळाडूंना त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करावे लागतील, असेही तो म्हणाला.

‘सध्या मी फलंदाजीला मुकत आहे. पण, कोव्हिडविरुद्ध लढण्यासाठी लस मिळाल्यानंतरच क्रिकेट सुरु होणे हिताचे ठरेल’, याचा रहाणेने येथे पुनरुच्चार केला. केंद्रीय क्रीडा मंत्रालय सध्या ऑलिम्पिक खेळांची राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरे सुरु करण्याबाबत नियोजनाला मूर्त स्वरुप देत आहे. बीसीसीआयने मात्र याबाबत अद्याप काहीही कार्यवाही केलेली नाही. या पार्श्वभूमीवर, खेळाडूंनी आपल्या तंदुरुस्तीवर भर देणे आवश्यक असल्याचे रहाणे म्हणतो.

‘माझ्या ट्रेनरने दिलेला चार्ट मी अंमलात आणत आहे. मी घरी ध्यानधारणा करतो. त्याचबरोबर जिमवर माझा बराच भर असतो. अर्थात, कोव्हिडनंतरचे जग वेगळे असणार आहे. भविष्यात खेळाडूंना प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद केल्यानंतर एकमेकांना आलिंगन देत आनंद साजरा करता येणार नाही. हस्तांदोलन करणेही थांबवावे लागेल आणि कदाचित आनंद साजरा करण्यासाठी फक्त नमस्ते म्हणावे लागेल. यामुळे पूर्वीचे दिवस कदाचित परत येतील आणि प्रतिस्पर्धी बाद झाल्यानंतर देखील क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरच थांबून राहतील आणि जागेवर थांबूनच टाळय़ा वाजवत सहकाऱयांचे अभिनंदन करतील’, असा अंदाज रहाणेने पुढे व्यक्त केला.

‘प्रत्यक्षात क्रिकेट सुरु झाल्यानंतर चाहत्यांची सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची असेल’, याचाही त्याने उल्लेख केला. चेंडूला लकाकी आणण्यासाठी सलाईव्हा लावले जावे का, यावर मात्र त्याने कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. मी याबाबत थांबा आणि पहा असे धोरण राबवणे पसंत करेन, असे तो म्हणाला. काही कालावधीपूर्वी अजिंक्य रहाणेला त्याचा प्रदीर्घ अनुभव पाहता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान देण्याचा विचार सुरु होता आणि या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा त्याच्यासाठी महत्त्वाची ठरणार होती. पण, ती स्पर्धाही लांबणीवर टाकली गेल्याने हा रहाणेसाठी धक्का ठरला. अर्थात, यानंतरही रहाणे सकारात्मकतेवर अधिक भर देण्यासाठी महत्त्वाकांक्षी आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने 65 कसोटी, 90 वनडे व 20 टी-20 सामने खेळले आहेत.

रहाणेच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप

स्पर्धा / कसोटी / वनडे / टी-20 / प्रथमश्रेणी

सामने /  63 / 90 / 20 / 142

केलेल्या धावा / 4112 / 2962 / 375 / 10689

फलंदाजी सरासरी / 43.74 / 35.26 / 20.83 / 49.25

शतके-अर्धशतके / 11-22 / 3-24 / 0-1 / 32-49

सर्वोच्च / 188 / 111 / 61 / 265ना.

Related Stories

रेड बुलचा व्हर्स्टापेन सलग दुसऱयांदा चॅम्पियन

Patil_p

सिंधूचा भारताला अभिमान – पंतप्रधान

Patil_p

आला रे आला, अजिंक्य आला!

Amit Kulkarni

नदाल, मेदवेदेव्ह, प्लिस्कोव्हा, हॅलेपची आगेकूच

Patil_p

दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

Patil_p

स्पेनचा राफेल नदाल विजेता

Patil_p