बेपत्ता मुलाचे गूढ उकलले, कपिलतीर्थ तलावात बुडून मृत्यू : मनपाचा गलथान कारभार जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया
प्रतिनिधी / बेळगाव


क्रिकेट खेळत असताना तलावात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कपिलेश्वर रोड मारुती मंदिरानजीक राहणाऱया स्वराज राजू मोरे (वर्षे 7) असे त्या दुर्दैवी लहानग्याचे नाव आहे. कपिलतीर्थ येथील नव्या विसर्जन तलावामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कपिलेश्वर रोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
शनिवारी दुपारच्या सुमारास चार चिमुकले कपिलतीर्थ तलावाशेजारी क्रिकेट खेळत होते. यावेळी एकाने बाजूच्या घरावर चेंडू मारला. तो चेंडू घरावर लागून थेट पाण्यात पडला. घरातील लोक ओरडतील या भितीने इतर मुले तेथून पळून गेली परंतु स्वराजचा चेंडू असल्याने तो काढण्यासाठी पाण्यात उतरला असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. तलावात बुडला असल्याच्या शक्मयतेने शनिवारी रात्रीपासून शोध मोहीम सुरू होती. रात्री 2 वाजेपर्यंत अग्निशमनचे जवान शोध घेत होते. परंतु त्यांना यश आले नव्हते.
रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास स्वराजचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांना दिसला. त्यानंतर तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. रविवार साप्ताहिक सुटी असल्याने तलाव परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. स्वराजचे वडील राजू हे एका बिस्किट कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करतात. स्वराजच्या घरी एक मोठी बहीण, आई, वडिल असा परिवार आहे. या घटनेने मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अवैध धंद्यांसाठी तलावाचा वापर
गणेशोत्सव विसर्जनासाठी नवा कपिलतीर्थ तलाव बांधण्यात आला. गणेशोत्सव, नवरात्रीमध्ये विसर्जनासाठी हा तलाव खुला करून देण्यात येतो. परंतु इतरवेळी हा तलाव बंद असतो. मनपाने लावलेले कुलूप काही विघ्नसंतोषी लोकांनी तोडले होते. त्यामुळेच लहान मुले थेट पोहोचत होती. काहीनी तर संरक्षक भिंत फोडून येण्या जाण्यासाठी रस्ता केला आहे. रात्रीच्यावेळी येथे अवैध प्रकार सुरू ठेवण्यासाठी ही वाट ठेवण्यात आली होती का? असाही प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
मनपाचा गलथान कारभार जबाबदार
नवरात्रोत्सवात दुर्गामातेच्या मूर्ती विसर्जनासाठी तलावात पाणी भरण्यात आले होते. त्यानंतर मागिल पाच-सहा महिन्यात पाण्याचा उपसाच करण्यात आलेला नाही. सध्या तलावात चार ते पाच फूट पाणी आहे. वेळीच मनपाने या पाण्याचा उपसा केला असता तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती. तसेच दोन्ही गेटना वेळीच कुलूप लावले असते तर स्वराजचा बळी गेला नसता. महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळेच स्वराजचा मृत्यू झाल्याची संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांमधून व्यक्त केली जात होती.