Tarun Bharat

क्रिकेटपटूंच्या मानधनकपातीचा विचार नाही

Advertisements

बीसीसीआय खजिनदार अरुण धुमल यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

क्रिकेटच्या काही स्पर्धा, मालिका कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या स्थगित करण्यात आल्या असल्याने जगभरातील अनेक क्रिकेट मंडळांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयलाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असले तरी भारतीय खेळाडूंच्या मानधनात कपात करणार नसल्याचे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले.

गेल्या मार्चपासून क्रिकेटचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र मानधन कपातीची गरज लागली तरच त्याचा विचार केला जाणार असल्याचे ते म्हणतात. ‘सध्या तरी आम्ही मानधन कपातीबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. आर्थिक अडचण असली तरी त्यावर आम्ही मात करून शकेन, अशी आम्हाला आशा वाटते. मात्र आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयसाठी ते फार मोठे नुकसानीचे ठरेल, यात शंका नाही. असे असले तरी मानधन कपातीबाबत एकदम शेवटी विचार केला जाईल. तसे झाल्यास खेळाडूंच्या फीमध्ये कपात करावी लागेल. पण हा पर्याय निवडण्याची गरज लागणार नाही, अशी व्यवस्था करण्याचा आमचा मनोदय आहे,’ असे त्यांनी सांगितले.

मात्र इतर खर्च कमी करून तसेच उत्पन्नाच्या नव्या योजना आखून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही धुमल म्हणाले. ‘खर्चावर बंधन घालणे आणि जास्तीत जास्त बचत करणे, यावर आम्ही काम करीत असून ही प्रक्रिया महामारी सुरू होण्याआधीपासून सुरू करण्यात आली आहे. आयपीएल स्थगितीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी खर्च कमी करून महसूल मिळविण्याच्या अन्य मार्गांचाही विचार केला जात आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. याचाच एक भाग म्हणून बीसीसीआयने आपल्या कर्मचाऱयांचा खर्च कमी केला आहे. ‘खेळाडूंच्या मानधन कपातीचा सध्या तरी विचार नाही. पण कर्मचारी व पदाधिकारी यांचा खर्च कमी करण्यावर आम्ही भर देणार आहोत. शक्य तितका खर्च कमी होईल, यावर लक्ष देणार आहोत. त्यांचा प्रवास, निवास तसेच अन्य खर्च आम्ही कमी करणार आहोत,’ असे त्यांनी या संदर्भात सांगितले.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर क्रिकेट पुन्हा करण्याबाबत विचार होईल. सरकारच्या नियमावलीनुसार त्याची सुरुवात केली जाईल. खेळाडू सध्या शारीरिक फिटनेसवर काम करीत असल्याने त्याची फारशी चिंता नाही. प्रवासावरील निर्बंध हटविले आणि सर्व खेळाडू एकत्र येऊ शकले तर पुढे काय करता येईल, ते ठरवू. निर्बंध हटविले न गेल्यास स्थानिक स्तरावरील स्टेडियममध्ये त्यांचा सराव सुरू करण्यात येईल. आम्ही या पर्यायाचाही विचार करीत आहोत, असेही धुमल म्हणाले.

Related Stories

पाकिस्तानने जिंकला ‘लो स्कोअरिंग थ्रिलर’!

Patil_p

‘रनमशिन’ जो रुटने रचला नवा इतिहास

Patil_p

लॉन बॉल्स, टेटेमध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्ण

Patil_p

व्हेलॉसिटी-सुपरनोव्हाज आज अंतिम लढत

Patil_p

सुपरकिंग्सविरुद्ध हैदराबादला चमत्काराची अपेक्षा

Patil_p

अजय जयरामला डेन्मार्क स्पर्धा हुकणार?

Patil_p
error: Content is protected !!