Tarun Bharat

क्रूर हत्येमागे नेमके कोणते ‘सत्य’ दडलंय?

Advertisements

दहिबाव मोहन कदम खून प्रकरण पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक पण, आव्हान कायम

प्रशांत वाडेकर / देवगड:

दहिबाव आयतनवाडी येथील मोहन फटू कदम यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे देवगड पोलिसांच्या तपासात समोर आले असले तरी या क्रूर हत्येमागील मुख्य कारण प्रकाशझोतात आणणे पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे. धारदार हत्याराने तब्बल 20 वार, तेही डोक्यापासून शरीरावर अनेक ठिकाणी. एवढी क्रूरता 60 वर्षीय मोहन कदम यांच्याविषयी संशयित मारेकऱयांच्या मनात असू शकते का? तेही जमीन जागेच्या वादातून, पूर्ववैमनस्यातून..! अवघ्या 24 तासांत पोलिसांनी मोहन कदम यांच्या खुनाचा छडा लावला, ही बाब खरंच कौतुकास्पद आहे. पण, मोहन कदम यांना खरा न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हत्येमागील मुख्य कारण व मारेकऱयांना कठोर शिक्षा होईल, याबाबतचे घटनेतील सर्व पुरावे गोळा करण्यामागील पोलिसांची कामगिरी अधिक महत्वाची ठरणार आहे.

मंगळवार, 4 ऑगस्टची सकाळ देवगडवासियांना हादरवणारी ठरली. दहिबाव येथील ‘पन्हाळ बावन खंड’ या माळरानावरील जंगलमय भागात मोहन कदम यांचा खून झाल्याचे वृत्त वादळी वाऱयासारखे तालुक्यात घोंघावले. मोहन कदम… सर्वसामान्य कुटुंबातील एक कर्ता पुरुष. आपली मुलगी, पुतण्या व भावजय यांच्यासमवेत राहणारे..! 3 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ते सकाळी सात वा. च्या सुमारास दहिबाव पन्हाळ बावन खंड येथील परिसरात गुरांना चारण्यासाठी गेले. काही वेळाने ते घरी परतले व पुन्हा दुपारी दीड वा. च्या सुमारास छत्री व काठी घेऊन गुरांना आणण्यासाठी गेले. सायंकाळी गुरे परतली. पण, मोहन कदम घरी आले नाहीत. त्याच सायंकाळी त्यांचा पुतण्या प्रणिकेतने आपल्या मित्रासमवेत मोहन कदम यांना शोधण्यासाठी ‘पन्हाळ बावन खंड’ परिसर गाठला व मोहन कदम यांची शोधाशोध सुरू केली. पण, ते न सापडल्याने प्रणिकेत व त्याचा मित्र माघारी परतले. रात्री उशिरापर्यंत मोहन कदम यांची वाट पाहून घरातील मंडळीही झोपी गेले. दुसऱया दिवशी प्रणिकेतने मोहन कदम घरी आलेत का, याची आईकडे चौकशी केली. पण, ते घरी न आल्याचे आईने सांगताच प्रणिकेतने आपल्या शेजाऱयांना मोहन कदम यांचा थांगपत्ता लागत नसल्याची माहिती दिली. अखेर, मोहन कदम यांच्या शोधासाठी स्थानिक ग्रामस्थ एकवटले व त्यांनी मोहन कदम यांच्या शोधासाठी पुन्हा ‘पन्हाळ बावन खंड’ या ठिकाणचा परिसर पिंजून काढला. याचदरम्यान, मोहन कदम यांचा मृतदेह धारदार शस्त्राने वार केलेल्या अवस्थेत उपडय़ा स्थितीत आढळून आला.

पावसामुळे रक्त गेले वाहून

घटनेची माहिती मिळल्यानंतर देवगड पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून तात्काळ घटनेचा तपासही सुरू केला. काही वेळाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी व त्यांची टीम, श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या पाहणीअंती मोहन कदम यांच्या शरीरावर धारदार हत्याराने वार करून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे लक्षात आले. पण, या घडलेल्या घटनेदरम्यान सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रक्त वाहून शरीरावर केलेले वार ठळकपणे दिसत होते.

पोलिसांचे ‘टीमवर्क’ तपासात यशस्वी

या सर्व घटनेची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कटेकर यांना तपासकामी मार्गदर्शनाच्या सूचना केल्या. त्यानंतर देवगड पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि उपविभागीय अधिकारी यांचे सहकारी अशी टीम या तपासामध्ये गुंतली. 24 तासांत हत्येचा छडा लावण्याचा निर्धार करीत या हत्येमागील गुन्हेगारांची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या तपासात श्वान पथकाचा तपासही मोलाचा ठरला. त्यानंतर या घटनेतील संशयित गुन्हेगार जिथे होते, तेथून त्यांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

या गुन्हय़ातील संशयित आरोपी संजय सदाशिव तारकर (45, रा. दहिबाव कुपलवाडी), अतुल मनोहर चव्हाण (31, शिरगाव दुसणकरवाडी) व नंदकिशोर यशवंत करंगुटकर (48, दहिबाव कुपलवाडी) या तिघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी टीमवर्कने अवघ्या 24 तासात संशयित मारेकऱयांना पकडले. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करावेच लागेल. पण त्याचबरोबर या हत्येचे मूळ कारण शोधण्याचीही जबाबदारी आहे. त्यानंतर खऱया अर्थाने पोलिसांचे कौतुक आणि मोहन कदम यांना न्याय मिळेल, असे वाटते.

हत्येमागील मुख्य कारण गुलदस्त्यात?

मोहन कदम यांच्या संशयित मारेकऱयांना अटक झाली असली तरी त्यांच्या हत्येमागे जमिनीचा वाद, पूर्ववैमनस्य अशी कारणे पोलीस तपासात समोर आली आहेत. पण, मोहन कदम यांचा ज्या क्रूरपणे व ज्या तिरस्काराने खून करण्यात आला, त्यामागील मुख्य कारण वेगळे असण्याची दाट शक्यता आहे. मोहन कदम यांचा खून करताना मारेकऱयांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड चीड होती, हे हत्येच्या प्रकारावरून दिसून येते. मोहन कदम यांच्या शरीरावर तब्बल 20 वार होते. डोक्यापासून कंबरेच्या वरील भागातील शरीरावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्राचे खोल घाव होते. त्यामुळे हत्येमागील मुख्य कारण वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संशयितांवर खुनासह दरोडय़ाचाही गुन्हा

पोलिसांनी संशयित आरोपींना न्यायालयात हजर करताना रिमांड रिपोर्टमध्ये पुतण्याच्या फिर्यादीनुसार मोहन कदम यांच्या गळय़ातील सोन्याची दीड तोळय़ाची चेन मारेकऱयांनी चोरी केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार संशयिताविरुद्ध पोलिसांनी भादंवि 397 हे वाढीव दरोडय़ाचे कलम लावले आहे. त्यामुळे या घटनेमध्ये 302 आणि 397 अशी खून आणि दरोडा अशी दोन मुख्य कायदा कलमे आहेत. त्यामुळे हत्येचा उद्देश नक्की काय होता? जमिनीचा वाद, पूर्ववैमनस्य की दरोडा हे स्पष्ट होत नाही. मात्र, या हत्येमागील मुख्य कारण वेगळे असण्याची शक्यता असून हत्येमागील मारेकऱयांचा मुख्य उद्देश प्रकाशझोतात आणावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Related Stories

69 कामे बहुमताने नामंजूर करत सत्ताधाऱयांचा सेनेला शह

Patil_p

दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा 1 कोटी 10 लाखाला लिलाव

Patil_p

रत्नागिरी : उद्यापासून टप्याटप्याने जिल्हा अंतर्गत एसटी सेवा सुरू होणार

Abhijeet Shinde

जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यतासाठी सहा लाख

NIKHIL_N

कुडाळमध्ये हायवेचे काम घिसाडघाईने

NIKHIL_N

रत्नागिरीत होणार समुद्रशास्त्र विद्यापीठ!

Patil_p
error: Content is protected !!