Tarun Bharat

क्रेसिकोव्हा, गॉफ, रीबाकिना उपांत्यपूर्व फेरीत

Advertisements

अलेक्झांडर व्हेरेव्ह, फोकिना, मेदवेदेव्ह, सित्सिपसही शेवटच्या आठमध्ये, सेरेनाचा पुन्हा स्वप्नभंग, निशिकोरी, स्टीफेन्स पराभूत

वृत्तसंस्था/ पॅरिस

झेक प्रजासत्ताकची बार्बरा क्रेसिकोव्हा, अमेरिकेची युवा खेळाडू कोको गॉफ, कझाकची इलेना रीबाकिना, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, स्पेनचा अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिना, रशियाचा डॅनील मेदवेदेव्ह यांनी प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स व स्लोअन स्टीफेन्स, जपानचा केई निशिकोरी, डेल्बोनिस यांना पराभवाचा धक्का बसल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले.

बिगहिटर असलेल्या क्रेसिकोव्हाने अमेरिकेच्या स्टीफेन्सचा 6-2, 6-0 असा सहज फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली. 33 वे मानांकन असलेल्या क्रेसिकोव्हाने 2018 मध्ये कॅटरिना सिनियाकोव्हासमवेत येथे महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेआधी तिने स्ट्रासबर्ग स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. तेव्हापासून ती अपराजित राहिली आहे. माजी तिसरी मानांकित असलेल्या स्टीफेन्सने 2018 मध्ये या स्पध्sा&ची अंतिम फेरी गाठली होती. पण यावेळी क्रेसिकोव्हाच्या पॉवरफुल फटक्यांचे तिला उत्तर देता आले नाही. तिच्याकडून 26 अनियंत्रित चुकाही झाल्या. 25 वर्षीय क्रेसिकोव्हाने दुसऱया मॅचपॉईंटवर फोरहँड फटका मारत विजय साकार केला. तिची पुढील लढत अमेरिकेच्याच कोको गॉफविरुद्ध होणार आहे. गॉफने टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉचा केवळ 53 मिनिटांत 6-3, 6-1 असा धुव्वा उडवित आगेकूच केली. गॉफ सध्या 17 वर्षे 86 दिवसांची असून गेल्या 15 वर्षातील ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी ती सर्वात युवा महिला खेळाडू बनली आहे. याआधी 2006 मध्ये निकोल वायडिसोव्हाने येथील स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, त्यावेळी ती 17 वर्षे 44 दिवसांची होती. त्याचप्रमाणे गॉफ ही 1993 नंतर येथील स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला टेनिसपटूही बनली आहे. 1993 मध्ये जेनिफर कॅप्रियतीने हा पराक्रम केला होता. या स्पर्धेत येण्याआधी गॉफने परमा येथील क्ले कोर्टवरील स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. क्ले कोर्टवर खेळण्याचा तो अनुभव तिला येथे उपयोगी पडला.

सेरेनाकडून पुन्हा एकदा निराशा

24 वे ग्रँडस्लॅम जिंकून सर्वकालीन विक्रमाशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱया अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे. कझाकच्या 21 व्या मानांकित इलेना रीबाकिनाने तिला 6-3, 7-5 असे नमवित शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. 2016 मध्ये अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर सेरेनाला येथील स्पर्धेत आजवर चौथी फेरी पार करता आलेली नाही. रीबाकिनाची पुढील लढत रशियाच्या ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हाशी होणार आहे. सेरेनाच्या पराभवामुळे स्वायटेक व केनिन या दोनच टॉप टेनमधील सीडेड खेळाडू राहिल्या आहेत. सिमोना हॅलेपने या स्पर्धेतून माघार घेतली तर बार्टी व नाओमी ओसाका लवकर स्पर्धेबाहेर पडल्याने सेरेनाला येथे चौथ्यांदा जेतेपद मिळवून मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची सुवर्णसंधी होती. पण तिला ती साधता न आल्याने तिचा पुन्हा एकदा स्वप्नभंग झाला आहे.

निशिकोरी, डेल्बोनिसचा पराभव

पुरुष एकेरीत जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने निशिकोरीचा 6-4, 6-1, 6-1 असा पराभव करून तिसऱयांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याची पुढील लढत स्पेनच्या बिगरमानांकित अलेजांड्रो फोकिनाशी होणार आहे. फोकिनानेही पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याने फेडरिको डेल्बोनिसचा 6-4, 6-4, 4-6, 6-4 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात रशियाच्या द्वितीय मानांकित डॅनील मेदवेदेव्हने शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना चिलीच्या 22 व्या मानांकित क्रिस्टियन गॅरिनवर 6-2, 6-1, 7-5 अशी मात केली. मेदवेदेव्हने हार्ड कोर्टवरील दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. पण क्ले कोर्टवरील या स्पर्धेत याआधी चार वेळा त्याला पहिली फेरीही पार करता आली नव्हती. त्याची पुढील लढत ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसशी होणार आहे. पाचव्या मानांकित सित्सिपसने स्पेनच्या 12 व्या मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्टावर 6-3, 6-2, 7-5 असा विजय मिळविला.

बोपण्णा-स्कुगर उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा क्रोएशियन साथीदार प्रँको स्कुगर यांनी कोर्टवर न उतरताच पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी नेदरलँड्सचा मॅटवे मिडलकूप व एल साल्वादोरचा मार्सेलो ऍरेव्हालो यांनी त्यांना पुढे चाल दिली. बोपण्णा-स्कुगरची पुढील लढत स्पेनच्या पाब्लो अँडय़ुअर-पेड्रो मार्टिनेझ यांच्याशी होणार आहे.

स्वायटेक-मॅटेक सँड्सची आगेकूच (फोटो-7 एसपीओ 13-मॅटेक सँड्स-स्वायटेक)

इगा स्वायटेकने महिला एकेरी व दुहेरीचे जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली असून तिने महिला दुहेरीत अमेरिकेच्या बेथनी मॅटेक सँड्ससमवेत खेळताना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. त्यांनी अग्रमानांकित प्रतिस्पर्ध्यांवर 5-7, 6-4, 7-5 अशी मात केली. निर्णायक सेटमध्ये विजयी जोडी 5-1 अशी पिछाडीवर पडली होती. तरीही त्यांनी जोरदार मुसंडी मारत सात मॅचपॉईंट्स वाचवत अग्रमानांकित सीह सु वेई व एलिस मर्टेन्स यांच्यावर मात केली. तीन तासाहून अधिक काळ ही लढत रंगली होती. स्वायटेक ही एकेरीची विद्यमान चॅम्पियन असून तिने यावेळी चौथी फेरी गाठली आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियाकडून वनडे मालिकेत इंग्लंडचा व्हाईटवॉश

Patil_p

टाटा ओपनमध्ये साकेत, अर्जुनला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश

Patil_p

प्रेक्षकाशिवाय क्रिकेट म्हणजे वधूशिवाय विवाह : शोएब

Patil_p

अमेरिकन टेनिसपटू पॅट्रिकला कोरोनाची बाधा

Patil_p

राजीनामा देणाऱया जाफरला कुंबळेचे समर्थन

Amit Kulkarni

सराव शिबिरातून बोल्टची माघार

Patil_p
error: Content is protected !!