Tarun Bharat

क्रॉसिंगची सुविधा नसल्याने मोठी अडचण

Advertisements

हायवे चौपदरीकरण पिंगुळी-म्हापसेकर तिठामार्गे येतात वाहने : सावंतवाडीच्या दिशेने जाताना समस्या : विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू दुर्घटनेची भीती

वार्ताहर / कुडाळ:

हायवे चौपदरीकरण करताना स्थानिक वाहतूक व प्रवाशांच्या जीविताचा विचार केला नाही. पिंगुळी-म्हापसेकर तिठामार्गे वडगणेश मंदिराकडून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱया वाहनांसाठी क्रॉसिंगची सुलभ सुविधा नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या रस्त्याने येणाऱया वाहनांची एकेरी वाहतूक सुरू असलेल्या  हायवेवरून विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दुर्घटना घडणार, ही काळय़ा दगडावरची रेषा आहे.

हायवे प्रशासनाने तेथे ‘नो एन्ट्री’चा फलकही लावलेला नाही. तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. क्रॉसिंग असलेल्या ठिकाणापर्यंत दुपदरी सर्व्हिस मार्ग तयार केला, तरच प्रवाशांना सुरक्षा मिळेल.                                                वाहतूकदार व प्रवाशांचा  सुखकर  प्रवास व्हावा, म्हणून हायवे चौपदरीकरण  केले जात आहे. या महामार्गाचे कामही जवळपास पूर्णत्वास आले आहे. दुतर्फा एकेरी वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. या मार्गाचे डिझाईन तयार करताना  स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा व प्रवाशांचा विचार केला नाही, ही वस्तुस्थिती लोकांनी कामाच्यावेळी केलेल्या तक्रारी व हरकतींवरून अनेकवेळा निदर्शनास आली आहे.         

चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर हायवे ठेकेदाराने महत्वाचे बसथांबे व काही मुख्य फाटय़ांवरील क्रॉसिंगसाठी ठेवलेले मिडल कट बंद करण्यास सुरुवात केली  आहे. पिंगुळी-वडगणेश मंदिर येथील मिडल कट बंद करण्यात आला. हा महत्वाचा फाटा आहे. तेथून पिंगुळी-म्हापसेकर तिठा हा महत्त्वाचा रस्ता आहे. मालवणकडे पर्यटकांची याच मार्गावरून वर्दळ असते. पिंगुळीसह निवती, खवणे, म्हापण, पाट, नेरुर, वालावल पंचक्रोशीकडून सावंतवाडीकडे जाण्यासाठी हाच जवळचा मार्ग आहे. तसेच प. पू. राऊळ महाराज समाधी मंदिर व विनायक (अण्णा) महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सावंतवाडीकडे जाणारी वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू असते.

                  क्रॉसिंग बंद केल्याने संभ्रम

सध्या हायवे वडगणेश मंदिराकडील क्रॉसिंग बंद केल्याने वाहनधारक व प्रवाशांना संभ्रम निर्माण होत आहे. हायवेवरून सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने एकेरी वाहतूक सुरू केली आहे. पिंगुळी-म्हापसेकर तिठा मार्गाने आलेली वाहने  सावंतवाडीच्या दिशेने मार्गस्थ करताना कुडाळच्या दिशेने येणाऱया मार्गावरून विरुद्ध दिशेने व अगदी दुभाजकाच्या बाजूने चालवितात. समोरून येणारी वाहने आपल्या बाजूने सुसाट येतात. त्या वाहनचालकांना कोणताही हासभास नसल्याने गोंधळून जीवघेणी घटना घडणार हे सत्य आहे.

                ठेकेदाराने उपाययोजना कराव्यात

पिंगुळी-मोरजकरवाडी (कुडाळच्या दिशेने जाताना साधारण दीड कि.मी. अंतरावर) येथे वाहनतळ ठेवण्यात आला आहे. तेथे मिडल कट, तर बिबवणे   हायस्कूल येथे बॉक्सेल आहे. या दोन्ही ठिकाणांहून सावंतवाडीकडे जाणारी वाहतूक वळविणे हाच पर्याय आहे. मात्र, त्यासाठी क्रॉसिंगपर्यंत सर्व्हिस मार्गाची आवश्यकता असतानाही हायवे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीचा विचार केला नाही.                    प्रवाशांचे प्राण वाचवायचे असतील, तर ठेकेदाराने उपाययोजना कराव्यात. सध्या वडगणेश मंदिराकडून सावंतवाडीकडे विरूद्ध दिशेने जाणारी वाहतूक  रोखण्यासाठी    ‘नो एन्ट्री’ फलक लावण्याची तसदी घ्यावी.

             क्रॉसिंग सुविधेअभावी वाहन चालकांचा गोंधळ                               

क्रॉसिंगची सुविधा नसल्याने तेथे वाहन चालक गोंधळतात. नाईलाजास्तव विरुद्ध दिशेने मार्गस्थ होतात. पण हे नियमबाह्य व अत्यंत धोकादायक आहे, याची कल्पना त्यांना असते. आपण नियम मोडत आहोत, याचे भान त्या वाहनधारकांनी राखावे. समोरून येणारी वाहने गोवा व अन्य ठिकाणच्या लांब पल्ल्यावरून आपल्या बाजूने  सुसाट येतात, हे ध्यानात ठेवावे.

                   अजूनही वेळ गेलेली नाही                                        

हायवे चौपदरीकरण कामाला सुरुवात केली. त्यावेळी तेथील तात्पुरते ठेवण्यात आलेले क्रॉसिंग बंद करणार आणि भविष्यात क्रॉसिंगचा प्रश्न निर्माण होणार, याची पूर्वकल्पना होती. पण स्थानिकांनी गांभीर्याने लक्ष दिला नाही. तसेच स्थानिक   लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केला. ते आता अडचणीचे ठरत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आताच हायवे प्रशासन व राजकीय नेत्यांच्या माध्यमातून यात मार्ग काढावा.

                   गंभीर समस्या येणार समोर                                              

मांडकुली ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तेथील कर्ली नदीवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. कोटय़वधी रु. खर्चून पिंगुळी येथील साई मंदिरापर्यंत रस्ता तयार करण्यात आला. तेथे ठेवण्यात आलेला तात्पुरता मिडल कट बंद करणार आहे. मांडकुली येथून कुडाळकडे जाणाऱयांना बिबवणे  बॉक्सेलमधून प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना अडीज किमी. चा वळसा घालावा लागणार आहे. तसेच कुडाळहून पिंगुळी-धुराटेंबनगर येथे जाण्यासाठी हाच मार्ग सुरक्षित ठरणार आहे. चौपदरीकरण करताना स्थानिकांना विश्वासात घेतले नाही आणि स्थानिकांनीही दुर्लक्ष केल्यानेच आता गंभीर समस्या समोर येणार आहेत.

Related Stories

प्रभावती पालकर यांचे वृध्दापकाळाने निधन

Anuja Kudatarkar

पोलीस खात्याच्या बदनामीप्रकरणी गुन्हा

NIKHIL_N

राजापूर शहराला पुराचा वेढा

Patil_p

कणकवली उपनगराध्यक्षपदी बंडू हर्णे

NIKHIL_N

पाकिस्तान हादरलं….माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार

Anuja Kudatarkar

तुतारी एक्स्पेस आजपासून 5 अतिरिक्त डब्यांची धावणार

Kalyani Amanagi
error: Content is protected !!