Tarun Bharat

‘क्वारंटाईन जेल’मधून संशयित पळाला

कोलगाव येथील घटना : संशयित अन्य सहकारी, बंदोबस्तावरील पोलिसांना थांगपत्ताही लागला नाही

प्रतिनिधी / सावंतवाडी:

एका अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित प्रमोद मधुकर परब (51) या कैद्याने कोलगाव आयटीआय क्वारंटाईन जेलमधून सोमवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास खिडकीची ग्रील उचकटून पलायन केले. तत्पूर्वी त्याने प्रवेशद्वारावरील स्लॅबवरून उतरण्यासाठी बेडशीटचा वापर केला. चार पोलीस डय़ुटीवर असताना आणि सोबतच्या तीन कैद्यांनाही थांगपत्ता लागू न देता प्रमोद परब याने पलायन केल्याने एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने परबचा शोध सुरू केला. आंबोली नांगरतास येथील स्फोटातील आरोपी ज्ञानेश्वर लोकरे याने दहा वर्षांपूर्वी शहरातील कारागृहातून पलायन केले होते. त्यानंतर जेलमधून कैद्याने पलायन करण्याचा हा दुसरा प्रकार आहे. ज्ञानेश्वर लोकरेने पलायन केल्यानंतर तो पडवे येथील एका झाडावर आढळला होता. प्रमोद परब पडवे येथील रहिवासी आहे.

 कारोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सध्या न्यायालयीन कोठडी मिळणाऱया संशयितांना कोलगाव येथील आयटीआयमध्ये तात्पुरत्या निर्माण केलेल्या क्वारंटाईन जेलमध्ये ठेवण्यात येते. त्यानंतर त्यांना तपासणी करून जेलमध्ये आणण्यात येते. एका अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या प्रमोद परब याला कोलगाव येथील क्वारंटाईन जेलमध्ये 15 मेपासून ठेवण्यात आले होते. तेथे दोन खोल्यांमध्ये मिळून आठ संशयित होते. परब याच्यासोबत तीन कैदी होते. पहाऱयासाठी चार पोलीस तेथे तैनात होते. मात्र इमारतीच्या बाहेर पोलीस तैनात नव्हते. तसेच इमारतीच्या ग्रीलच्या खिडक्या मजबूत नाहीत. तीच संधी परब याने साधली. सोमवारी पहाटे सहकारी कैदी झोपलेले असताना बंद खोलीच्या कमकुवत असलेल्या खिडकीचे ग्रील त्याने उचकटले व इमारतीबाहेर पडून प्रवेशद्वारावरील स्लॅबवर आला. हा भाग उंच असल्याने त्याने खाली उतरण्यासाठी बेडशिटचा वापर केला. तेथून त्याने पलायन केले.

त्याच्या पलायनाची कल्पना बाहेर डय़ुटीवर असलेल्या पोलिसांना येताच त्यांनी अन्य तिघा संशयितांना बाजूच्या खोलीत हलवून प्रमोद परबचा शोध सुरू केला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. सहाय्यक निरीक्षक अण्णासो बाबर यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी भेट दिली. पुन्हा परब याचा शोध सुरू करण्यात आला. जनतेच्या माहितीसाठी सोशल मीडियावर परब याच्या शोधासाठी माहिती देण्यात आली. मात्र उशिरापर्यंत तो सापडला नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार तो एका मोटारसायकलस्वाराला हात दाखवून झारापपर्यंत गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र सर्वत्र नाकाबंदी करूनही तो सापडला नव्हता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही परब याचा शोध सुरू केला. परंतु उशिरापर्यंत तो सापडला नव्हता. मात्र, त्याच्या पलायनामुळे डय़ुटीवरील कर्मचाऱयांवर आता कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

क्वारंटाईन जेलमधील परिस्थिती पाहता ही इमारत सराईत गुन्हेगारांसाठी ‘अनुकुल’ अशीच आहे. कोविडपासून अन्य कैदी सुरक्षित राहण्यासाठी येथे तात्पुरत्या स्वरुपात संशयितांना ठेवण्यात येते. मात्र प्रमोद परब याने पलायनासाठी हीच संधी साधली.

Related Stories

पेरणीनंतर व्यवस्थापन शेतकऱयांना घरबसल्या मार्गदर्शन

Patil_p

‘त्यां’च्या शब्दांनी मला प्रेरणा दिली!

NIKHIL_N

नवीन तापसरी ठरतेय सिंधुदुर्गसाठी ‘डोकेदुखी’

NIKHIL_N

परशुराम घाट 9 जुलैपर्यंत बंद राहणार!

Patil_p

रायपाटण ग्रामीण रूग्णालयाची वीज कापली!

Patil_p

गाबित समाजतर्फे १७ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Tousif Mujawar