सहा महिन्यांपासून केवळ चर्चाच; 15 दिवसात कार्यवाही करणार


प्रतिनिधी /बेळगाव
चव्हाट गल्ली येथील ग्रामीण क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालय स्थलांतर गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. केवळ वीज तोडणी करण्यात आली नसल्याचे कारण देत ही कार्यवाही थांबविण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत कोणत्याही स्थितीत कार्यालय स्थलांतरीत केले जाईल, अशी माहिती ग्रामीण क्षेत्र शिक्षणाधिकारी आर. पी. जुटन्नावर यांनी तरुण भारतला दिली.
पूर्वी अनेक वर्षे ग्रामीण क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालय काळी आमराई येथे होते. काही वर्षांपूर्वी ते चव्हाट गल्ली येथील मराठी शाळेत स्थलांतरीत करण्यात आले. अपुऱया जागेमुळे ते पुन्हा गणपत गल्ली येथील शाळा क्रमांक 2 येथील इमारतीत स्थलांतरीत करण्याचा निर्णय सहा महिन्यापूर्वी घेण्यात आला होता. गणपत गल्ली शाळेत सध्या केवळ 17 विद्यार्थी आहेत. तर 17 वर्गखोल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी ग्रामीण क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालय स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालय स्थलांतराची चर्चा सुरू आहे पण हेस्कॉमने वीज जोडणी देण्यास दिरंगाई केल्याने स्थलांतर रखडले आहे. चव्हाट गल्ली शाळेतील पटसंख्या वाढत असल्याने कार्यालय स्थलांतराची गरज आहे पण शिक्षण खात्याकडून गांभीर्य पाळले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.