Tarun Bharat

खड्डय़ातील पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू

गणेबैलनजीक अंकले हद्दीत घडलेल्या घटनेने हळहळ, खेळत असताना बुडाले

प्रतिनिधी /खानापूर

खानापूर-बेळगाव मार्गावरील गणेबैलनजीक अंकले हद्दीत असलेल्या खड्डय़ातील पाण्यात बुडून दोघा शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. विठ्ठल परशराम निलजकर (वय 12) आणि भूतनाथ दीपक निलजकर (वय 8) यांचा समावेश आहे. विठ्ठल हा गावातील प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीत शिकत होता. तर भूतनाथ हा दुसरी इयत्तेत शिकत होता.

भूतनाथ डोंगराच्या पायथ्याशी निलजकर कुटुंबांची घरे आहेत. या घरांपासून काही अंतरावर पाण्याने भरलेला खड्डा आहे. ती दोन्ही मुले खेळत खड्डय़ाकडे गेली आणि अचानकपणे पाण्यात बुडाली. जवळपास कुणीच नसल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. काही वेळाने त्या खड्डय़ातील पाण्यात दोन मुले बुडाल्याचे समजताच लोक जमा झाले. त्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. याची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली. खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह खानापूरच्या शासकीय दवाखान्यात आणले गेले. उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाईकांच्याकडे देण्यात आले. ती दोन्ही मुले परशराम व दीपक निलजकर या सख्ख्या चुलत भावांची मुले होती. विठ्ठल याच्या पश्चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे. तर भूतनाथच्या पश्चात आई-वडील व चार बहिणी असा परिवार आहे.

विशेष म्हणजे भूतनाथ हा चार मुलीनंतर झालेला मुलगा होता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

जीएसएस कॉलेजच्या सर्व विभागांचे काम समाधानकारक

Amit Kulkarni

पिरनवाडी येथील ‘त्या’ खटल्यात चार्जफ्रेम

Omkar B

तालुक्मयात ‘लम्पिस्किन डिसीज’चा वेगाने फैलाव

Omkar B

जिल्हय़ात 106 रुग्ण झाले कोरोनामुक्त

Amit Kulkarni

ग्रामीण भागातही दिवाळीच्या खरेदीची लगबग

Omkar B

विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी

Patil_p