Tarun Bharat

खलाशांना आणण्याच्या निर्णयाबद्दल चर्चिलकडून सरकारला धन्यवाद

गोमंतकीय खलाशांना परत आणण्यासाठी : सर्वप्रथम आपण पुढाकार घेतल्याचा दावा

प्रतिनिधी / मडगाव

जहाजांवरील खलाशांना भारतात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने बाणावलीतील राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सरकारचे आभार मानले असून जहाजांवर अडकलेल्या गोमंतकीय खलाशांना गोव्यात परत आणण्यासाठी आपण सर्वप्रथम पुढाकार घेतला होता, असा दावा त्यांनी केला आहे.

बाणावली येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील दावा केला. यावेळी त्यांच्या कन्या वालंका आलेमाव याही हजर होत्या. 29 मार्चपासून आपण पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, अनिवासी भारतीय विभाग, आयुष मंत्रालय यांना ई-मेल पाठवून व राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन जहाजांवर अडकून पडलेल्या गोमंतकीय खलांशाचा विषय त्यांच्यासमोर मांडलेला आहे, हे आलेमाव यांनी नजरेस आणून दिले.

आपल्याला केंद्र सरकार व राज्य सरकारकडून मिळालेला प्रतिसाद पाहता एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच भारतीय खलाशांना परत आणण्याबाबत निर्णय होणार होता. मात्र निजामुद्दीन येथील तबलिगीच्या मरकज प्रकारानंतर सगळय़ावर पाणी पडले, असा दावा चर्चिल यांनी केला. आपल्या मतदारसंघांतील कोलवा व बाणावलीतील खलाशी जहाजांवर अडकल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला. तेव्हापासून आपण केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर काही राजकारण्यांनी यासंदर्भात राजकारण केले, अशी टीका त्यांनी केली.

एनडीए का सोडत नाही ते सरदेसाईंनी सांगावे

एका स्थानिक वाहिनीवर बोलताना गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांनी या प्रश्नावरून मुख्यमंत्री व सरकारवर टीका केली. पण मुख्यमंत्र्यांच्या हातात काही नव्हते. केंद्र सरकारकडे ते पाठपुरावा करत होते. आपण भाजपाचे समर्थन करत असल्याची टीका सरदेसाई यांनी केली. मात्र ते पर्रीकर सरकारात होते व अजूनही एनडीएचे भाग आहेत. एनडीएला का सोडचिठ्ठी देत नाही हे सरदेसाई यांनी आधी स्पष्ट करावे. परत सरकारात घेतल्यास सरदेसाई भाजपाची संगत धरायला तयार असतील. हा स्वार्थीपणा नव्हे, तर काय आहे, असा सवाल आलेमाव यांनी केला. आमदार सरदेसाई यांच्यावर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

सर्वप्रथम भारतीय सागरी हद्दीत असलेल्या खलाशांना, नंतर खोल समुद्रात असलेल्यांना व त्यानंतर अन्य खलाशांना असे तीन टप्प्यांमध्ये खलाशांना भारतात आणले जाणार आहे. गोमंतकीय खलाशांना विलगीकरणात ठेवण्यासाठी हॉटेल्स व अन्य खासगी जागा आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्रीच अधिक भाष्य करू शकतील, असे ते एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले.

Related Stories

फोंडय़ातील बुधवारपेठ पूर्ण लॉकडाऊन

Patil_p

दहावी-बारावीची प्रथम सत्र परीक्षा 10 नोव्हेंबरपासून

Amit Kulkarni

अखेर आठ महिन्यानंतर म्हापसा बाजारपेठ सुरू

Patil_p

शिमगोत्सव मिरवणुकीने फातोर्डा परिसर दुमदुमला

Amit Kulkarni

जलसिंचन खात्याच्या हलगर्जीपणामुळे तिळारी कालवा फुटला , संध्याकाळी केली तात्पुरती दुरुस्ती

Amit Kulkarni

शशिकलाताई काकोडकर यांचा जयंती सोहळा 9 रोजी

Amit Kulkarni