Tarun Bharat

खांडज येथे गुदमरुन चौघांचा मृत्यू

खांडज 22 फाटा येथील दुर्घटना, बापलेकासह चौघांचा मिथेन गॅसमुळे श्वास कोंडला

प्रतिनिधी/ बारामती

बारामती तालुक्यातील खांडज 22 फाटा येथे ब्रिटीशकालीन (मेणवली) गुप्तचारीमध्ये पडून मिथेन गॅसमुळे श्वास केंडून बापलेकासह चार जणांचा दुःखद मृत्यु झाला. हि घटना बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली त्यामुळे संपुर्ण खांडज परिसरावर शोककळा पसरली होती. या दुर्घटनेत भानुदास आनंदराव आटोळे (वय 60), प्रविण भानुदास आटोळे (वय 35), प्रकाश सोपान आटोळे (वय 54), बाबासो पिराजी गव्हाणे (वय 34) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 बारामती -फलटण रोडवरील बावीसफाटा येथील आटोळे वस्तीवर प्रविण भानुदास आटोळे हा तरूण नेहमीप्रमाणे गाईंचा गोठा साफ करीत होता. मोठा गोठा असल्याने गाईचे शेण फक्त उचलले जाई, इतर मलमुत्र व गोठा साफ केल्याचे सर्व घाण पाणी पाईपवाटे या मेणवलीमध्ये (अडीच ते तीन फुट गोल वीट काम केलेला इंग्रजांच्या काळातील गोल व खोल खड्डयात) सोडले जात असे. व ते पुन्हा गाळ ओढण्याच्या पंपाने पाईपमधून पाटातुन ओढय़ाला सोडला जात असे. परंतु तो पाईप व्यवस्थित करण्यासाठी प्रविण लोखंडी शिडीवरून या खोल व गोल खड्डय़ात उतरला. शेजारी त्याचे वडील भानुदास आनंदराव आटोळे हे उभे होते. मुलगा बाहेर येत नाही म्हणुन त्यास काढण्यासाठी तेही शिडीवरून खाली उतरले, तेही बाहेर येईनात म्हणुन शेजारील बायकांनी प्रकाश सोपान आटोळे शेजारच्या रानात पाणी धरत होते त्यांना हाक मारली. तेही खाली उतरले. पण तेही वर आलेच नाहीत. परत शेजारील बाबासो पिराजी गव्हाणे यास हाक मारली तोही त्यांना काढण्याच्या प्रयत्नात खाली गेला तो वर आलाच नाही. बघता बघता तेथे गर्दी वाढली. त्यातच प्रसाद दिलीप लोले हा खाली उतरला परंतु मिथेन गॅसच्या दुर्गंधीमुळे तो तातडीने बाहेर आला व बेशुद्ध पडला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने तो गोल खड्डा आठ ते दहा फुट खोल खणला व त्यांनतर या चारही जणांना बाहेर काढण्यात आले.

     माळेगांव साखर कारखान्याच्या ऍब्युलन्समध्ये या चारही जणांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटलमध्ये 11.45 वाजता नेहण्यात आले तर डॉ. जगताप व डॉ. वाघमारे यांनी दुपारी 12.30 वाजता त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, माळेगांव पोलीस स्टेशनचे पी आय किरण अवचर आपल्या सहकाऱयासह घटना घडताच उपस्थित राहिले. त्यांनी इतरांना सर्व सूचना दिल्या प्राथमिक माहिती घेऊन ते बारामती सिल्व्हर ज्युबिली हॉस्पीटलमध्ये तातडीने निघून गेले. गावचे तलाठी टकले यांनी पोलीस पाटील राऊत यांच्यासह इतरांच्या मदतीने पंचनामा केला. तहसिलदार विजय पाटीलही घटनास्थळी तातडीने हजर झाले. त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना या दुर्घटनेची प्राथमिक माहिती दिली.

  भानुदास आनंदराव आटोळे (वय 60) यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, नातू, पत्नी असा परिवार आहे. प्रविण भानुदास आटोळे (वय 35) याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आहे. प्रकाश सोपान आटोळे (वय 54) यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले, एक सुन असा परिवार असून ऊस तोडणीचा व मोलमजुरी करून जगणारे कुटूंब आहे. बाबासो पिराजी गव्हाणे (वय 34) याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली व एक लहान मुलगा आहे. हे मोलमजुरी करून पोट भरणारे कुटूंब  आहे.

Related Stories

मुंबईत १२ गोविंदा जखमी, ७ जणांवर उपचार सुरू

Archana Banage

पवारसाहेब देणार कोणता कानमंत्र?

Patil_p

बहुतांश नद्यांना पूर; माणगंगा अजूनही कोरडीच

datta jadhav

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; भाई जगताप यांच्याविरोधात…

datta jadhav

सांडवलीकरांना तात्पुरते स्थालांतरित होण्याच्या सूचना

datta jadhav

कोल्हापूर : तारळे खुर्द येथे चाळीस वर्षांनी रस्ता झाला अतिक्रमण मुक्त

Archana Banage