Tarun Bharat

खात्यातून रक्कम गेली? आता नो टेन्शन…!

तातडीने 155260 वर कॉल केल्यास रक्कम होणार  ‘होल्ड’

ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी हेल्पलाईन नंबर

सावंतवाडी:

बँकेतून ऑनलाईन रक्कम हडप झाली असेल तर आता घाबरण्याचे कारण नाही. अशा सायबर गुन्हय़ांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने 155260 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून गायब झाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. त्यामुळे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होणार आहे. या यंत्रणेबाबतच्या माहितीला सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दुजोरा दिला आहे.

तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. सायबर चोरी हा त्यातलाच एक प्रकार आहे. विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेल्या व्यक्तीही याला बळी पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे. तुमच्या पिन नंबरची मुदत संपली. तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा क्लुप्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असल्याच्या
तक्रारी दाखल आहेत.

                         त्वरित कॉल आवश्यक

अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 155260 हा क्रमांक हेल्पलाईन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून गायब झाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण सायबर गुन्हय़ात वेळेला फार महत्व असते. जेवढय़ा लवकर हेल्पलाईनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.

इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करत असता ते ओटीपी सांगून अथवा एखादे ऍप डाउनलोड करून! कारण, हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाहीत. आतापर्यंत देशात लाखो लोकांना याचा फटका बसला.

सात ते आठ मिनिटात रक्कम होल्ड

सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित 155260 या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटात ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करत असतात. कॉल येताच संबंधित बँक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

यंत्रणा काम कशी करते?

हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करताच खातेदाराचे नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.

एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि 155260 हा हेल्पलाईन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफॉर्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास 55 बँका, ई-वॉलेटस्, पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱया संस्था जुळलेल्या आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांना विचारले असता अशा सायबर गुन्हय़ांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सायबर सेल यंत्रणा विकसित केली आहे. नागरिकांनी शक्यतो अनोळखी कॉल रिसिव्ह करू नये. आपले खाते क्रमांक, ओटीपी नंबर, डाटा देऊ नये. किंवा लिंक डाऊनलोड करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

आणखी एका शेडसह विद्युत दाहिनीही

NIKHIL_N

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूलचे यश

Anuja Kudatarkar

लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबध ठेवणाऱया तरूणावर गुन्हा

Patil_p

Ratnagiri : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

कोकणातील पर्यटनाला पुन्हा ग्रहण

Archana Banage

रत्नागिरी : दापोलीच्या वनपालाचे अखेर निलंबन

Archana Banage