Tarun Bharat

खानापुरात मंकर सक्रांतीसाठी बाजारपेठ झाली सज्ज

Advertisements

खानापूर / प्रतिनिधी

नववर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांतीनिमित्त पांढरा शुभ्र तिळगूळ, काळे तीळ, वाणाच्या वस्तू अशा साहित्याने बाजारपेठ सजली आहे. अवघ्या दोन दिवसांवर भोगी व संक्रांत आल्याने खानापूरच्या बाजारपेठेत खरेदीसाठीची गर्दी होत आहे. तिळगूळ घ्या, गोड बोला’ असा संदेश देणाऱया मकरसंक्रांतीसाठी खानापूर बाजारपेठ सज्ज झाली आहे. बाजारपेठेत संक्रातीसाठी विविध साहित्य खाद्यपदार्थ, तिळगुळ, सुगड बाजारात दाखल झाले आहेत.

सक्रांतीनिमित्त बाजारात ठिकठिकाणी तिळगुळाचे स्टॉल लागले असून 10 रुपये, 20 रुपये अशा दरात तिळगुळाची पाकिटे उपलब्ध आहेत. तिळगुळाचा दर 60 रुपये किलो असा आहे. सक्रांतीला प्रामुख्यांने गुळपोळी, विविध प्रकारच्या पोळय़ा आणि मलिदा तसेच चटण्या केल्या जातात. मात्र सणाच्या आदल्यादिवशी भोगीनिमित्त खास बेत असतो. या दिवशी प्रामुख्याने बाजरीची भाकरी केली जाते. तसेच भाकरीबरोबर वांग्याची भाजी, वाटाण्याची उसळ, गाजराची कोशंबिर खाण्याची या भागात प्रथा आहे. यामुळे बाजरी बरोबरच गाजर, वाटाण्याच्या शेंगालाही बरीच मागणी होत आहे.  या शिवाय गृहोद्योग करणाऱया महिलांनी भाकऱया तयार करण्यास सुरवात केली आहे. या भाकऱया बरेच दिवस टिकतात. 5 रुपयाला एक या दराने बाजरीची भाकरी तर 6 रुपयाला एक या दराने ज्वारी आणि नाचण्याची भाकरी मिळते. सक्रांतीला सुगड पुजविण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत सुगड विक्री करतात. प्रामुख्याने खानापूरहून बेळगावला त्याची आवक होते. येथील काही विक्रेते हा माल गोवा, कोकण परिसराला निर्यात करतात. सक्रांत म्हणजे महिलांचा तिळगूळ समारंभ करण्याचा सण. त्यामुळे बाजारपेठेत असंख्य तऱहेच्या वाणवस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. बाजारात तिळाचे लाडू विक्रीस ठेवण्यात आले आहेत. संक्रांतीला भेटवस्तू देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यात आरसा, प्लास्टिकचे डबे, छोटय़ा वाटय़ा, चमचे, गाळी, कंगवा, कुंकवाचा करंडा, बांगडय़ा टिकल्यांची पाकिटे व इतर साहित्य अशा वस्तू देऊन हळदी-कुंकू समारंभ साजरा केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत असे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत. तसेच शेंगा, काजू-बदाम, बडीशेप आदी प्रकारातील तिळगूळ उपलब्ध आहे.

या सणाला नवविवाहितेला तिळगुळाचा हार, कर्णफुले, किरीट, बाजूबंद, कंबरपट्टा, मंगळसूत्र असे तिळगुळाचे दागिने घातले जातात. ते ही बाजारात उपलब्ध आहेत. तसेच बाजारात तिळगूळ, काटेरी तिळगूळ, शेंगा तिळगूळ (हातावरचे), मशिनवरचे शेंगा तिळगूळ, काजू-बदाम तिळगूळ, बडीशेप तिळगूळ, शेंगा चक्की, तीळ चक्की, शेंगा लाडू, तीळ लाडू, हे सर्व बाजारात उपलब्ध आहेत. तसेच संक्रातीनिमित्त जवळपास तीन दिवस तालुक्यात विविध ठिकाणी मलप्रभेच्या स्नानासाठी भाविक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित राहतो. या भाविकांच्या स्वागतासाठी खानापुरातील मलप्रभा नदीघाट, असोग्यातील रामलिंग मंदिर परिसर, हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्र, कणकुंबी मलप्रभा नदी उगमस्थान परिसर स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी मलप्रभा नदीवरील ठिकठिकाणच्या बंधाऱयात पाणी आडवल्याने नदीपात्रही पाण्याने तुडूंब भरले आहे. यामुळे भाविकांना मलप्रभा स्नानाचा आगळा आनंद लुटण्यास मिळणार आहे.

Related Stories

ता.पं.सदस्य-पिडीओंची बैठक घेण्याची मागणी

Patil_p

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

आरएस वॉरियर्स 15 धावांनी विजयी

Amit Kulkarni

तालुक्यात बटाटा काढणीला प्रारंभ

Amit Kulkarni

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल, वैद्यकीय केंद्रात ‘जागतिक थॅलेसेमिया दिन’

Amit Kulkarni

सिव्हिलच्या सुरक्षेची जबाबदारी आता पोलिसांवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!