Tarun Bharat

खानापुरात 600 च्या वर कोरोनाबाधित

मृत्यूचे प्रमाणही वाढले : तालुक्यात कोरोना विषयीची धास्ती अधिकच वाढली

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यात कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 600 च्या वर पोहोचली असून त्यापैकी जवळपास दीडशे कोरोनाबाधित सक्रीय आहेत. गेल्या काही दिवसात तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली आहे. यामुळे तालुक्यात कोरोना विषयीची धास्ती अधिकच वाढत आहे.

भारतामध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाबाधित सापडण्यास सुरुवात झाली. पण पहिल्या चार महिन्यात तालुका जवळजवळ कोरोनामुक्तच होता. दि. 18 जुलै रोजी तालुक्यातील करविनकोप्प गावात पहिला कोरोनाबाधित सापडला. त्या गावातील केरळहून आलेल्या बीएसएफ जवानाला कोरोनाची बाधा झाली होती. यानंतर मात्र तालुक्यात कोरोनाचा शिरकाव सुरू झाला. गेल्या अडीच महिन्यात तालुक्यात 600 च्या वर कोरोनाबाधित सापडले आहेत. सुरुवातीला लॉकडाऊनमुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. पण लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोना अधिकच वाढत चालला. लॉकडाऊन काळात रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. केवळ कारणापुरते लोक घराबाहेर पडत होते. लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थिती उलटी झाली आहे. रस्त्यावर सर्व ठिकाणी गर्दी होत असून सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. बरेच लोक मास्क न घालताच फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. गेल्या चार दिवसांपासून नगर पंचायतीने मास्क न घालणाऱयांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधित सापडला की त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. आता कोरोनाबाधितांना होम आयसोलेशन करण्यात येत आहे. एखादा रुग्ण अधिकच गंभीर झाल्यास त्याला मात्र रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले बरेच रुग्ण आता खासगी दवाखान्यात दाखल होत असल्याने तालुक्यात कोरोनाबाधितांची नेमकी संख्या समजणे कठीण आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये आलेला कोरोनाबाधितांचा आकडा तेवढा मिळत आहे. तालुक्यातील परिस्थिती पाहता खानापूर शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात सध्या एक तरी कोरोनाबाधित असून दवाखान्यात गेल्यास कोरोना पॉझिटिव्ह म्हणून घोषित करण्यात येते, या भीतीने बरेच रुग्ण दवाखान्यात न येता  घरीच इलाज करून घेत आहेत.

जवळपास 20 जणांचा मृत्यू

तालुक्यात आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा आकडा अधिक असून जे रुग्ण दवाखान्यात दाखल होऊन कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत त्यांची माहिती तेवढीच सरकारदप्तरी नोंद होत आहे. काही कोरोनाबाधित दवाखान्यात न येताच मृत्यू पावले आहेत. त्यांची सरकारदप्तरी नेंद नसल्याने तालुक्यात कोरोनामुळे नेमके किती लोक दगावले याचा अधिकृत आकडा मिळणे कठीण झाले आहे. खानापूर शहरासह तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोना महामारीमुळे पुन्हा एकदा काही दिवसांसाठी लॉकडाऊन करावे की काय, याबद्दलच्या चर्चेला ऊत आला आहे. तालुक्यातील काही गावात पुन्हा एकदा स्वयंघोषित लॉकडाऊन केला जात आहे. काही गावांमध्ये पुन्हा एकदा कडक वार पाळले जात आहेत.

Related Stories

मुख्यमंत्री बोम्मई यांना सूचना द्या; खासदार धैर्यशील माने यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाकडे मागणी

mithun mane

मुरगेश निराणी यांना देणगी परत करणार

Amit Kulkarni

महिला गृहउद्योग हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन

mithun mane

अंगणवाडी सेविका-मदतनीस भरती प्रक्रिया रखडली

Patil_p

शिक्षणाधिकाऱयांकडून स्वच्छतागृहाचा कायापालट

Amit Kulkarni

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अद्वैत दळवीला कांस्य

Amit Kulkarni