Tarun Bharat

खानापूर नगरपंचायत बैठकीत अधिकारी धारेवर

स्थायी कमिटी बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी सोमवारपासून करण्याचे अधिकाऱयांचे आश्वासन

प्रतिनिधी / खानापूर

खानापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थायी कमिटी बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत नगराध्यक्ष मजहर खानापुरी व स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार यांनी मुख्याधिकारी व नगरपंचायत कर्मचाऱयांना धारेवर धरले. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी दिले.

खानापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क न घालणाऱयांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, हॉटेल व सलून दुकानांमध्ये कोरोनाविषयक नियमांचे जागृती फलक लावावेत, अशा महत्त्वपूर्ण सूचना स्थायी कमिटीच्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. त्याचे काय झाले, असा सवाल नगराध्यक्ष व स्थायी कमिटी अध्यक्षांनी बैठकीत मुख्याधिकाऱयांना केला. आतापर्यंत मास्क न वापरणाऱयांकडून कधी व किती दंड वसूल केला, असाही प्रश्न केला. उद्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला तर याला जबाबदार कोण, असाही सवाल करत त्यांना धारेवर धरले. त्यावेळी अद्याप निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. पण या सर्व निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करू, अशी ग्वाही मुख्याधिकाऱयांनी दिली.

कर्मचाऱयांबाबत तक्रार

नगरपंचायत कर्मचारी वेळेत कामावर येत नसल्याची तक्रार नगरसेवक रफिक वारीमणी व इतरांनी केली. सकाळी 10.30 वा. सर्व कर्मचाऱयांनी कामावर उपस्थित राहावे, असा आदेश नगराध्यक्ष खानापुरी यांनी दिला. सध्या नगरपंचायतीमध्ये कर्मचाऱयांची संख्या कमी असून सात कर्मचाऱयांना अन्य ठिकाणी डेप्युटेशनवर पाठविण्यात आले आहे. त्या सर्व कर्मचाऱयांना माघारी बोलवावे. अन्यथा, त्यांचा पगार देऊ नये, असा ठरावही बैठकीत करण्यात आला. अभियंता कोंगवाड यांनी बैलहोंगल नगरपंचायतीत न जाता सर्व दिवस खानापूर नगरपंचायतीतच काम पाहावे, अशी सूचनाही त्यांना करण्यात आली. प्रत्येक प्रभागातील विकासकामांसंदर्भातही चर्चा करण्यात आली. खानापूर लक्ष्मीनगर येथील खुली जागा 2000 साली नगरपंचायतीने ठराव करून कलावती देवी मंदिरासाठी दिली आहे. आता त्या ठिकाणी मंदिराची उभारणी झाली आहे. पण प्रशासनाकडून आलेल्या आदेशानुसार या जागेसंदर्भातही विषय प्रस्थापित झाला. त्यावेळी मुख्याधिकारी विवेक बन्ने म्हणाले, 2009 पूर्वी नगरपंचायत किंवा सार्वजनिक जागेत अतिक्रमण झाले असल्यास संबंधितांना ती जागा सक्रम करून द्यावी व 2009 नंतर झालेली अतिक्रमणे काढून टाकावी, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यानुसार कलावती मंदिराला दिलेली जागा 2000 सालच्या ठरावानुसार असल्याने या संदर्भात बैठकीत निर्णय घ्यावा, अशी सूचना केली.

कलावती मंदिरासाठीच्या जागेची सोमवारी पाहणी करणार

सर्वच नगरसेवकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी व ती जागा कलावती मंदिरासाठीच ठेवावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. नगरपंचायतीच्या कागदपत्रांनुसार सदर जागा 12 गुंठे असली तरी प्रत्यक्षात कलावती मंदिराच्या ताब्यात असलेली जागा साडेदहा गुंठे असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी यावेळी नगरपंचायतीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिले. त्यावेळी प्रत्यक्ष जागेची पाहणी करताना ती दीड गुंठे जागा कोठे आहे, याची पाहणी करून ती जागा उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी अंगणवाडी इमारत बांधावी, अशी सूचना नगरसेविका मेघा कुंदरगी यांनी केली. यासाठी सोमवार दि. 16 रोजी प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चर्चेत उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक सर्वश्री तोईद चांदकन्नावर, फातिमा बेपारी, नारायण ओगले, नारायण मयेकर, आप्पय्या कोडोळी, विनायक कलाल, विनोद पाटील, मिनाक्षी बैलूरकर, जयश्री भुतकी, हणमंत पुजार, प्रकाश बैलूरकर, राजश्री तोपिनकट्टी, लक्ष्मी पाटील, शोभा गावडे, सायरा सनदी आदींनी भाग घेतला.

Related Stories

कचरावाहू वाहन ताफ्यात ई-ऑटोटिप्पर दाखल

Omkar B

श्रीपंत महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात साजरा

Amit Kulkarni

फिटनेस प्रशिक्षिका संध्या पाटील यांच्याकडून सूर्यनमस्कार

Amit Kulkarni

आजपासून बँकांचे व्यवहार दुपारी 2 पर्यंतच सुरू

Amit Kulkarni

काजू उत्पादक शेतकरी क्लोजडाऊनमुळे अडचणीत

Omkar B

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आता मोबाईल ऑक्सिजन बससेवा

Amit Kulkarni