Tarun Bharat

खानापूर बसस्थानकाचे भाग्य लवकरच उजळणार

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर बसस्थानकाची आता असलेली इमारत काढून त्या ठिकाणी अद्यावत बसस्थानक बांधण्यासाठी 7 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर झाले होते. आता त्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. यासाठी निविदा स्वीकारण्याची 21 फेब्रुवारी अंतिम तारीख आहे. यामुळे गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या बसस्थानक नूतन इमारतीच्या बांधकामाला आता नव्या वर्षात सुरुवात होणार आहे.

बेळगाव जिल्हय़ातील जवळपास सर्व बसस्थानकाचे रुपांतर हायटेक बसस्थानकात करण्यात आले आहे. त्यामध्ये काही ठिकाणच्या हायटेक बसस्थानक इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणची बांधकामे सुरु आहेत. त्याप्रमाणे खानापूरलाही सध्या असलेली इमारत काढून त्या ठिकाणी हायटेक बसस्थानक व्हावे, अशी मागणी केली जात होती. या मागणीचा पाठपुरावा विद्यमान आमदार अंजली निंबाळकर यांनी सातत्यांने केला. अखेरीस त्या बसस्थानकासाठी सहा महिन्यापूर्वी 7 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर झाले होते. आता त्या कामाच्या निविदाही निघाल्या आहेत. पण त्या निविदामध्ये हायटेक शब्दाऐवजी खानापूर बसस्थानकाच्या नूतन इमारतीसाठी असा उल्लेख करण्यात आला आहे. या बसस्थानक इमारतीचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच कामालाही प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. पण निविदा प्रक्रियेसाठी दिलेला वेळ लक्षात घेता मार्च 2021 मध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरु होणार आहे.

खानापूरला पूर्वीच्या काळात बसआगार तर सोडाच पण बसस्थानकाची इमारतीही नव्हती. बसस्थानक आणि आगारासाठी जांबोटी कत्रीवरील सध्या असलेली जागा निश्चित झाली होती. पण जागेच्या मालकीवरुन वाद होता. या पूर्वी म्हणजे 1998 साली तत्कालीन आमदार कै. अशोक पाटील तसेच तत्कालीन नगराध्यक्षा सुष्मा देशपांडे व तत्कालीन उपनगराध्यक्ष कै. रफिक खानापुरी यांच्या पुढाकाराने तो वाद कायदय़ाच्या चौकटीतून संपवण्यात आला. यानंतर गायराण ट्रस्ट कमिटीने बसस्थानक आणि बस आगारासाठी आवश्यक असलेल्या स्वतच्या मालकीची 7 एकर जागा दान दिली. त्यावेळी तत्कालीन आमदार कै. अशोक पाटील यांच्या प्रयत्नाने त्यावेळी केवळ बसस्थानकच नव्हे तर बस आगारही मंजूरही झाले. केवळ दोनवर्षाच्या कालावधीत बसस्थानक आणि आगाराचे काम पूर्ण झाले. व सप्टेंबर 2002 मध्ये बसस्थानक आणि आगाराचे उद्घानही झाले. आता त्या बसस्थानक आणि आगाराला जवळजवळ 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण बदलत्या परिस्थितीत राज्यातील परिवहन महामंडळाने बसस्थानक आणि बस आगाराची नुतनीकरण करण्याची योजना संपूर्ण राज्यभर सुरु केली. त्यामधूनच खानापूर देखील सध्याचे असलेले बसस्थानक काढून त्या ठिकाणी हायटेक बसस्थानक व्हावे, अशी मागणी करण्यात आली. अखेर राज्य परिवहन महामंडळाने यासाठी 7 कोटी रु. चे अनुदान मंजूर केले. आणि आता त्यामधून कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.

Related Stories

एपीएमसी रोडशेजारील चेंबर देताहेत अपघातास निमंत्रण

Amit Kulkarni

भांबार्डा येथील कलमेश्वर मंदिराचा कॉलमभरणी कार्यक्रम उत्साहात

Amit Kulkarni

‘ई-जन्म’च्या माध्यमातून मृत व्यक्तीचे आधारकार्ड होणार रद्द

Amit Kulkarni

खानापूरसह परिसरात घरफोडी प्रकरणी तिघांना अटक

Patil_p

आता कोरोनावर नियंत्रणासाठी प्रयत्न करा!

Amit Kulkarni

मंत्री राजेंद्र यड्रावकर यांची कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी यांच्यांशी चर्चा, आलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची मागणी

Archana Banage