Tarun Bharat

खानापूर महामार्गावरील निम्म्याहून अधिक हायमास्ट बंद

नगरपंचायतीचे दुर्लक्ष, प्रवाशांना करावा लागतोय अंधाराचा सामना : नगरपंचायतीने दखल घेऊन हायमास्ट त्वरित दुरुस्त करण्याची मागणी

वार्ताहर / खानापूर

खानापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱया शहरांतर्गत महामार्गावरील हायमास्ट (पथदीप) निम्म्याहून अधिक बंद पडले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी खानापूर शहरातून होणारी प्रवाशांची वाटचाल अंधारातून होत असल्याचा अनुभव दिसून येत आहे. सदर हायमास्टच्या दुरुस्तीसाठी नगर प्रशासन दखल घेईल का, असा प्रश्न सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे.

खानापूर शहरांतर्गत महामार्गाचे दुभाजीकरण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात शिवस्मारकाच्या आवारात हायमास्टची उभारणी करण्यात आली. पण उभारण्यात आलेले हायमास्ट अवघ्या सहा महिन्यातच गंजल्याच्या परिस्थितीत दिसून आले. लाखो रुपयांचा खर्च या हायमास्टच्या उभारणीसाठी करण्यात आला खरा. परंतु या दुरुस्तीकडे नगर प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणारा शहरांतर्गत महामार्ग दुभाजीकरण झाल्यानंतर उर्वरित मार्गावर लाखो रुपये खर्च करून हायमास्ट उभारण्यात आले. मलप्रभा नदीच्या पुलापासून हेस्कॉम कार्यालयापर्यंत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून हलकर्णी फाटय़ापर्यंत जवळपास तीसहून अधिक हायमास्ट पथदीपांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे खानापूर शहराच्या सौंदर्यात चांगलीच भर पडली. या हायमास्टच्या उभारणीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. एक हायमास्ट उभारणीसाठी जवळपास सव्वा लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे कळते. परंतु सदर हायमास्टपैकी निम्म्याहून अधिक सद्यपरिस्थितीत बंद पडले आहेत. परंतु दुरुस्तीचे सौजन्य मात्र नगरपंचायतीने दाखवले नसल्याने नागरिकांतून असमाधान व्यक्त होत आहे.

खानापूरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्राथमिक टप्प्यात नगरपंचायतीने हाती घेतलेले 15 हून अधिक हायमास्ट शिवस्मारकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत उभारण्यात आले. यापैकी बरेच बंद पडले आहेत. परंतु याची आतापर्यंत एकदाही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यानंतर उर्वरित शहरांतर्गत महामार्गावर विशेष प्रयत्न करून आमदार अंजली निंबाळकर यांनी हायमास्ट उभारणी करून घेतली आहे. परंतु याची दुरुस्ती करण्यासाठी मात्र नगरपंचायत तसदी घेत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या पावसाळय़ापासून या मार्गावरील बरेचसे हायमास्ट बंद पडले आहेत. सद्यपरिस्थितीत निम्म्याहून अधिक हायमास्ट बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना रात्रीच्या वेळी अडचण होताना दिसते. विशेषतः पादचाऱयांना मोठा फटका बसत आहे. हेस्कॉम कार्यालयापासून मासळी मार्केट ते नदीच्या पुलापर्यंत बरेच हायमास्ट बंद पडले आहेत. मासळी मार्केटला सायंकाळच्यावेळी अनेकजण पायी ये-जा करत असतात. पण हायमास्ट बंद असल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. यासाठी नगरपंचायतीने याची गांभीर्याने दखल घेऊन शहरांतर्गत महामार्गावरील हायमास्ट दुरुस्त करावेत, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

लोकमान्यतर्फे 11 लाखांचा भरघोस निधी

Patil_p

विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून अधिकारी धारेवर

Patil_p

कर्नाटक: ५६१९ पॉझिटिव्ह तर २४ तासांत ५४०७ रुग्ण बरे, १०० रूग्णांचा मृत्यू

Archana Banage

म. ए. समितीतर्फे जांबोटीत जनजागृती फेरी

Amit Kulkarni

अनगोळ येथे गाडय़ांची मिरवणूक

Amit Kulkarni

मुसळधार पावसाने कोसळली घराची भिंत

mithun mane
error: Content is protected !!