Tarun Bharat

खानापूर शहरातील दुकानांच्या वेळावर पुन्हा निर्बंध

सकाळी 7 ते दुपारी  1 पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचा आदेश

प्रतिनिधी/ खानापूर

लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्यामुळे खानापूर शहर परिसरातील दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत उघडण्याची मुभा देण्यात आली होती. पण यामुळे सोमवारी खानापूर शहरात वाहनधारक व पादचाऱयांची इतकी गर्दी झाली की शहरात जणू जत्रेचे स्वरुप येऊन सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. पण प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन मंगळवारपासून पुन्हा एकदा दुकाने उघडण्याच्या वेळेत निर्बंध आणले असून आता सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेतच दुकाने उघडण्याची सूचना करण्यात आली आहे.

सोमवारी झालेल्या गर्दीमुळे शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. यामुळे जनसामान्यांतून दुकानांच्या वेळा आहे तशाच म्हणजे सकाळी 8 ते 12 हीच वेळ ठेवावी, अशी मागणी केली जात होती. या संदर्भात खानापूर तालुका भाजप उपाध्यक्ष संजय कुबल, जिल्ह उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख पंडित ओगले यांच्यासह काही प्रमुखांनी सेंमवारी सायंकाळी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांची भेट घेऊन या संदर्भात प्रदीर्घ चर्चा केली. तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी देखील बाजारात होत असलेल्या वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त करून यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. याचवेळी प्रमोद कोचेरी यांनी या संदर्भात पालकमंत्री जगदीश शट्टर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यामुळे खानापूर शहर तालुक्यात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. तसेच आणखी काही दिवसांसाठी नियम कडक ठेवावेत, अशी विनंती केली. त्यांनी देखील जिल्हाधिकाऱयांना या संदर्भात सूचना करण्याचे आश्वासन दिले.

मंगळवारी सकाळी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी नगरपंचायतीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱयांसमवेत स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ परिसराचा फेरफटका मारून सर्व दुकानदारांना सामाजिक अंतराचे भान राखण्याच्या कडक सूचना केल्या. तसेच संबंधीत अधिकाऱयांशी चर्चा करून दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंतच ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू केली. यामुळे मंगळवारी सकाळी स्टेशन रोड, बाजारपेठ परिसरात जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र पोलिसांची गस्तही सुरूच होती. यामुळे सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत होते. दुपारी 1 वाजताच सर्व दुकानेही बंद झाल्याने दुपारपासूनच शहरात शुकशुकाट निर्माण झाला होता.

 दारू दुकानांसमोरील गर्दी ओसरली

तब्बल 42 दिवसानंतर तालुक्यातील दारू दुकाने सुरू झाल्याने सोमवारी खानापूर शहर तसेच नंदगड, लेंढा, बिडी, जांबोटी, पारिश्वाड, इटगी, गंदीगवाड येथील दारू दुकानांसमोर दारू खरेदीसाठी मद्यपी लोकांची झुंबड उडाली होती. यामुळे काही दुकानदारांचा असलेला दारूसाठाही संपला. पण मंगळवारी पुन्हा दारू दुकाने सुरू झाली. पण गर्दी मात्र बरीच ओसरली होती. दारू दुकानांच्या वेळेत मात्र कोणताही बदल करण्यात आला नसून त्यांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 अशीच राहणार आहे. त्यांच्या वेळेत बदल करण्यासाठी अबकारी खात्याकडूनच आदेश यावा लागतो. दरम्यान राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतुद केल्याप्रमाणे दारुचे दरही 7 टक्क्यांनी वाढले आहेत.

दुचाकीस्वारांवर पोलिसांची कारवाई

लॉकडाऊनच्या काळात दुचाकीवरुन केवळ एकालाच फिरणे बंधनकारक आहे. असे असताना बरेच दुचाकीस्वार डबल सीट फिरत होते. अशा डबल सीट दुचाकीस्वारांवर पोलिसांनी मंगळवारी लाठीचा प्रसाद देण्यास प्रारंभ केला. तसेच मास्कशिवाय फिरणाऱयांवरही कारवाई सुरू केली. यामुळे बघता बघता दुचाकीस्वारांची होणारी गर्दी देखील कमी झाली. यापूर्वी देखील विनाकारण फिरणाऱयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्या दुचाकींना दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे..

Related Stories

रस्त्यांचे विकासीकरण… वाहतुकीचे कोंडीकरण

Omkar B

लव्ह जिहाद विरोधी पोलीस पथकाची स्थापना करा

Amit Kulkarni

दुर्गा देवस्थानच्या जागेतील अतिक्रमण हटवावे

Amit Kulkarni

कुदेमनी-सोनोली संपर्क रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीकामाचा शुभारंभ

Amit Kulkarni

नामदेव शिंपी समाजासाठी निगम मंडळाची स्थापना करा

Amit Kulkarni

नागशांती हुंडाईतर्पे वाहन शुभारंभ

Amit Kulkarni