Tarun Bharat

खासदार राऊतांचे नाथ पैंच्या स्मृतीस अनोखे अभिवादन

साहित्यप्रेमी खासदारांची अशीही साहित्यसेवा : ‘सिंधुसाहित्यसरिता’ पुस्तक देणार सर्व ग्रंथालयांना!

जिल्हय़ात 130 ग्रंथालयांचा समावेश : कोमसाप मालवण शाखेतर्फे पुस्तक प्रकाशित

प्रतिनिधी / मालवण:

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवणने अलिकडेच सिंधुदुर्गातील दिग्गज साहित्यिकांच्या चरित्रावर ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक कोकणचे भाग्यविधाते बॅ. नाथ पै यांच्या पवित्र स्मृतीस कोमसाप मालवणने अर्पण केले आहे. या पुस्तकातील सर्व लेख ज्या साहित्यिकांवर लिहिले ते सर्व साहित्यिक खासदारांच्या मतदारसंघातील आहेत. या पुस्तकातील कोमसाप शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकुर यांनी बॅ. नाथ पै यांच्यावर लिहिलेला ‘बॅ. नाथ पै-ओजस्वी वक्तृत्वाचे तेजस्वी दर्शन’ हा लेख खासदार राऊत यांना फारच भावला. या लेखासह अन्य साहित्यिकांवरील लिहिलेले लेख जिल्हय़ातील सर्व वाचकांपर्यंत जावेत, अशी इच्छा राऊत यांनी व्यक्त केली असून जिल्हय़ातील सर्व 130 वाचनालयांना ‘सिंधुसाहित्यसरिता’ हा ग्रंथ ते बॅ. नाथ पै यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भेट म्हणून पाठविणार आहेत.

‘ज्यांच्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची आपण मला संधी दिलीत, त्या आम्हा सर्वांचे लाडके संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दीचा आज शुभारंभाचा दिवस! संसदीय कामकाजासोबत बॅ. नाथ पै यांनी साहित्य, संस्कृती, नाटय़, चित्र, शिल्प आदींच्या रसिकतेत आपला आगळा ठसा उमटविला आहे. बॅ. नाथ पै आपल्याला सोडून गेल्यावर अर्धशतक लोटले, तरी त्यांच्या स्मृती माझ्या मतदारसंघात अजूनही टवटवीत आहेत. त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व मला तुमच्या लोकसभा मतदारसंघातील नेतृत्व करत असताना नेहमीच नंदादीप ठरलेले आहे. बॅ. नाथ पै यांना आपल्या मतदारसंघातील साहित्यिकांबद्दल नेहमीच अभिमान आणि आदर असायचा. म्हणून नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभाला माझ्या मतदारसंघातील लेखकांनी लिहिलेले, माझ्या मतदारसंघातील साहित्यिकांवर प्रकाश टाकणारे आणि नाथ पै यांच्या पवित्र स्मृतींना अर्पण केलेले, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा-मालवणचे ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक आपल्याला भेट म्हणून देत आहे,’ असा संदेश खासदार राऊत यांनी दिला आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे एका विशेष कार्यक्रमात त्यांच्याच जन्मदिनी येथील सानेगुरुजी वाचन मंदिरच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर व बॅ. नाथ पै वाचनालय, कट्टाच्या ग्रंथपाल सुजाता पावसकर यांना प्रसिद्ध साहित्यिक रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते पुस्तक प्रदान करून झाला. मालवण सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, दीपक भोगटे, किशोर शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, अदिती पै, प्रा. आनंद मेणसे, सुरेश ठाकुर, सेवांगणचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. लवकरच जिल्हय़ातील 130 वाचनालयांना नाथ पै यांची स्मृती म्हणून हा ग्रंथ खासदार राऊत यांच्यावतीने देण्यात येणार आहे.

Related Stories

लक्झरीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Patil_p

तळाशीलवासीयांच्या आंदोलनास गाबित समाजाचा पाठिंबा

NIKHIL_N

पाथरटच्या गुरूजींनी केल्या शाळेच्या अबोल भिंती बोलक्या!

Patil_p

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Patil_p

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे यांची खाजगी दौऱ्या दरम्यान सावंतवाडीला भेट

Anuja Kudatarkar

ओटवणे प्राथमिक शाळा नं १ चे १०० व्या वर्षात पदार्पण

Anuja Kudatarkar