Tarun Bharat

खासदार संभाजीराजे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

मराठा आरक्षणविषयी मुंबईत महत्वपूर्ण बैठक : मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयकही राहणार उपस्थित

प्रतिनिधी / कोल्हापूर

नाशिक येथे शनिवारी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत ईडब्ल्यूएस आरक्षणाला विरोध  करण्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केल्यानंतर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (29 सप्टेंबर) खासदार संभाजीराजे हे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. वर्षा निवासस्थानावर होणाऱया या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार असून त्यावर मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीची पुढील नियोजनही निश्चित होण्याची शक्यता आहे.

 मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबरला  स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांतून आरक्षण (ईडब्ल्यूएस), सवलती देण्यासंदर्भात गेल्या आठवडÎात घोषणा केली होती. पण नाशिक येथे शनिवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत ईडब्ल्यूएस आरक्षणाला राज्यभरातून आलेल्या समन्वयक, प्रमुख कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. ईडब्ल्यूएसमधून आरक्षण नको तर राज्य घटनेच्या निकषावर टिकणारे आरक्षण द्या, अशी मागणी करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाने ईडब्ल्यूएस आरक्षण नको अशी भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मार्ग काढण्यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पुढाकार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर विशेष बैठकीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खासदार संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चातील राज्य समन्वयकांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत खासदार संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांशी चर्चा करून त्यांची भूमिका समजून घेणार आहेत.

विरोधानंतर राज्य सरकारने जीआर काढणे थांबवले

ईडब्ल्यूएस आरक्षण व इतर सवलती देण्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर राज्य सरकार अध्यादेश (जीआर) काढण्याच्या तयारी होते. पण शनिवारच्या नाशिकच्या राज्यव्यापी बैठकीत मराठा क्रांती मोर्चाने ईडब्ल्यूएस आरक्षणाला विरोध केल्यानंतर   राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. जीआर काढणे कठिण बनले. त्यामुळे संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक तातडीने घेण्याच्या हालचाली मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

ईडब्ल्यूएस आरक्षण का नको ?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. ते फेटाळलेले नाही. घटनापीठापुढे सुनावनी होणार आहे. अशावेळी जर राज्य सरकारने जाहीर केलेले आर्थिक दुर्बल घटकातून अर्थात ईडब्ल्यूएस आरक्षण आणि सवलती  मराठा समाजाने स्वीकारल्या तर घटनापीठासमोरील होणाऱया सुनावनीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने कायदेतज्ञ, घटनातज्ञांचा सल्ला घेऊन मराठा क्रांती मोर्चाने ईडब्ल्यूएस आरक्षणाला विरोध केला आहे.

Related Stories

वडूथ येथे कोव्हीड उपचार सेंटर उभारणी – आ.शशिकांत शिंदे

Patil_p

अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Archana Banage

खंडपीठ स्थापनेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

Abhijeet Khandekar

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Archana Banage

उच्च न्यायालयाची राज्यपाल कोश्यारी यांना नोटीस; ‘बेकायदेशीर’ नियुक्तीप्रकरणात मागितले उत्तर

Abhijeet Khandekar

प्लास्टिकचा वापर टाळू; पर्यावरण रक्षणाचा संकल्प करू…

datta jadhav