Tarun Bharat

खुनाला नाही कारण, स्वस्त झाले मरण!

Advertisements

क्षुल्लक कारणावरून पडताहेत मुडदे : वारंवारच्या घटनांमुळे सर्वसामान्यात अस्वस्थता : हातावर पोट असणाऱयांच्या काळजीत भर

प्रतिनिधी /बेळगाव

यावर्षीच्या सहामाहीत बेळगाव शहर व तालुक्मयात खुनाचे प्रकार वाढले आहेत. पहिल्या तीन महिन्यांत 7 तर त्यानंतरच्या तीन महिन्यांत 8 असे एकूण 15 खून झाले आहेत. यापैकी काही खुनांचा अद्याप तपासही लागलेला नाही. काही खुनांना तर सबळ कारणही नाही. केवळ रस्त्यावर घडलेल्या क्षुल्लक वादातून मुडदे पडल्याची उदाहरणे आहेत.

जानेवारी ते मार्चपर्यंत घडलेल्या खुनांचा यापूर्वी आढावा घेण्यात आला आहे. कोरोना, लॉकडाऊननंतर आता कुठे परिस्थिती सुधारते आहे. लोक आपापल्या व्यवहाराला लागले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे जगण्यासाठी गरीब, मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांची धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत बेळगावात मरण स्वस्त झाले आहे का? असा संशय येईल अशा घटना घडू लागल्या आहेत.

शांतताप्रिय बेळगावच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणाऱया या घटना आहेत. काही खूनप्रकरणांचा आढावा घेतला असता विनाकारण किंवा क्षुल्लक कारणावरून हत्यारे बाहेर काढली गेल्याचे ध्यानात येते. यावरून माणसाची खास करून तरुणाईची सहनशीलता संपते आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जे प्रश्न चर्चेतून सोडविता येतात, अशा क्षुल्लक बाबींसाठीही मुडदे पाडले जात आहेत.

31 मार्च रोजी करडीगुद्दीजवळ मुदकप्पा चंद्रप्पा अंगडी (वय 25) रा. सुनकुप्पी, ता. बैलहोंगल या तरुणाचा खून झाला. तुंबळ हाणामारीत सातजण जखमी झाले. बोलेरोतून बेळगावहून गावी जाताना कॅम्पबेलजवळ परिचयाची व्यक्ती भेटली म्हणून मुदकप्पा बोलत उभा होता. अत्यंत क्षुल्लक कारणावरून मुदकप्पाचा बळी घेण्यात आला.

गवंडी कामगाराच्या खुनाचा आजतागायत उलगडा नाही

14 एप्रिल रोजी शंकर ऊर्फ बाळू मारुती पाटील (वय 40) रा. यरमाळ रोड, वडगाव या गवंडी कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. खुनानंतर शंकरचा मृतदेह नाझर कॅम्प, वडगाव येथील चिल्ड्रन्स पार्कमधील बाकडय़ावर बसविला होता. खरेतर 12 एप्रिलपासून हा युवक बेपत्ता होता. त्याचा खून कोणी केला? याचा आजतागायत उलगडा झाला नाही.

केवळ 250 रुपयांसाठी खून

16 एप्रिल रोजी रात्री सत्यसाई कॉलनी, वैभवनगर येथे महम्मद दिलपुकार शेख (वय 27) या तरुणाचा बियर बाटलीने हल्ला करून खून करण्यात आला. या खुनाचे कारण धक्कादायक आहे. केवळ 250 रुपयांसाठी हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. महम्मदने उस्मान शेख (वय 25) या आपल्या मित्राला पाचशे रुपये देऊन दारू आणण्यास सांगितली होती. दारू खरेदी करून उरलेले 250 रुपये परत केले नाहीत म्हणून झालेल्या वादावादीतून महम्मदचा खून झाला आहे.

पोलिसांची दिरंगाई, सामान्यांना संकटात नेई!

एखाद्या खुनानंतर त्या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन खुनी कोण? याचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्मया आवळण्याची जबाबदारी पोलीस दलावर असते. अनेकवेळा पैशाच्या मोहापायी अधिकारी आपली जबाबदारी विसरतात. गौंडवाड येथील सतीश राजेंद्र पाटील (वय 37) या युवकाच्या खून प्रकरणानंतर काकती पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. म्हणून गावकऱयांनी पोलीस निरीक्षक गुरुनाथ आय. एस. यांच्यावर उघडपणे आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनीही काकती पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे गौंडवाडची घटना घडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना या प्रकरणाचा तपास अधिकारी बदलावा लागला. युवकाच्या खुनानंतर गावात त्याचे संतप्त पडसाद उमटले. दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या. स्थानिक पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली असती तर ही दंगल टाळता आली असती.

25 एप्रिल रोजी सुळगे-येळ्ळूर येथील शिवारात एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. खून करून केवळ अंडरवेअरवर मृतदेह टाकून देण्यात आला होता. नंतर त्याची ओळख पटली. ए. कुमार (वय 37) रा. के. आर. पेठ, जिल्हा मंडय़ा याचा तो मृतदेह असल्याचे उघडकीस आले. के. आर. पेठ येथील युवकाचा खून बेळगावात कोणी केला? याचाही उलगडा झाला नाही. याचा तपासही रखडला आहे.

क्षुल्लक कारणावरून तरुणाचा बळी

जुन्या पी. बी. रोडवर 13 मे च्या रात्री महेश ज्ञानेश्वर कामाण्णाचे (वय 35) या मेकॅनिक युवकाचा खून करण्यात आला. शहापूर पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. या खुनाचे कारणही थक्क करणारे आहे. दुरुस्ती केलेल्या कारची ट्रायल घेण्यासाठी महेश बाहेर पडला होता. त्यावेळी एका दुचाकीची कारला पुसटशी धडक बसली. दुचाकीवरील तरुणाबरोबर झालेल्या वादावादीतून महेशचा खून करण्यात आला. याचवेळी त्याचे वृद्ध आई-वडील या मार्गावरून जात होते. त्यांच्या डोळय़ादेखत हा खून झाला आहे. अत्यंत क्षुल्लक कारणावरून या तरुणाचा बळी गेला आहे.

12 मे 2022 पासून बहाद्दरवाडी येथून बेपत्ता झालेल्या देवप्पा सुरेश सुतार (वय 18) या तरुणाचा 28 मे रोजी किणये येथील सरकारी दवाखान्यामागे सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना अटक केली आहे. उंच उडणाऱया शर्यतीच्या कबुतरावरून या तरुणाचा खून झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणाच्या तपासातही पोलिसांनी दिरंगाई केली होती. कोल्हय़ा-कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले होते. त्याची ओळख पटविणेही कठीण झाले होते. त्यामुळेच पडून मृत्यू झाला असावा, असा सुरुवातीचा कयास होता. शवचिकित्सा अहवालानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले.

16 मे रोजी रात्री कंग्राळी बुद्रुक येथे कौटुंबिक वादातून सासू व दोन मुलांवर हल्ला करणाऱया दीपक पांडुरंग वाके (वय 42) रा. हनुमाननगर या युवकाला मारहाण झाली होती. नंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या दोन चुलत मेहुण्यांना अटक झाली आहे. या प्रकरणाचाही तपास व्यवस्थित झाला नाही, असा आरोप काकती पोलिसांवर केला जात आहे.

क्षणिक रागाच्या भरात खुनाच्या घटना

या घटना लक्षात घेता एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत टोकाची भूमिका घ्यावी, अशी कारणे नाहीत. तरीही क्षणिक रागाच्या भरात मागचा पुढचा विचार न करता खून पाडले गेल्याचे दिसून येते. कामासाठी बाहेर पडलेली मुले सुखरुप परत येतील, याची शाश्वती नाही, असे भीतीदायक चित्र गेल्या सहा महिन्यात निर्माण झाले आहे. बेळगावकरांच्या चिंता वाढविणाऱया या घटना आहेत.

Related Stories

बोरगाव येथून महिला बेपत्ता

Rohan_P

बस्तवाड (हलगा) मध्ये बटाटे बियाणे कुजल्याने शेतकरी चिंतेत

Patil_p

दलित-शेतकरीविरोधी सरकारला विरोधच

Amit Kulkarni

क्रिकेटचा चेंडू चिमुकल्याचा ठरला काळ

Amit Kulkarni

निपाणीजवळ दाम्पत्यास लुटले

Patil_p

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव

Amit Kulkarni
error: Content is protected !!