Tarun Bharat

खेडच्या नगराध्यक्षांकडून घोटाळेच घोटाळे!

माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा आरोप,जिल्हाधिकाऱयांकडे अपात्रतेबाबतचा प्रस्ताव सादर,गुन्हा दाखल करण्याचीही मागणी

प्रतिनिधी / खेड

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पदाचा दुरूपयोग करत गेल्या 3 वर्षात तब्बल 77 लाख रूपयांचा डिझेल घोटाळा केल्याचा आरोप करत अन्य 11 प्रकरणांमध्येही भ्रष्टाचार केल्याची माहिती अधिकारात उघड झाल्याचा आरोप माजी पर्यावरणमंत्री व आमदार रामदास कदम यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. सेना गटनेते व नगरसेवकांनी त्यांच्या अपात्रतेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे सादर केल्याची माहितीही त्यांनी दिली. 

ते म्हणाले, नगराध्यक्ष खेडेकर यांनी खुर्चीत बसण्यापूर्वी नगर परिषदेचे कुठलेही वाहन वापरणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र या सर्वांना बगल देत त्यांनी 3 वर्षात 77 लाख रूपयांचा डिझेल घोटाळा केला आहे. नियमानुसार नगराध्यक्षांसाठी प्रतिमहा 200 लिटर डिझेल वापरण्याची तरतूद असतानाही त्यांनी महिनाकाठी तब्बल 600 लिटर डिझेलचा वापर केला आहे. स्वतःच्या वाहनासह मनसे कार्यकर्त्यांच्या वाहनांतही भरणेतील एका पेट्रोल पंपामधून डिझेल भरले जात आहे. वाहनांच्या बनावट नंबरद्वारे डिझेल घेऊन, बऱयाचवेळा कॅनमधूनही डिझेल आणल्याची माहिती उघड झाली आहे. नगर परिषदेतील जनरेटरसाठी डिझेल आणल्याचे सांगण्यात येत असले तरी हे डिझेल जनरेटरमध्ये नेमके कितीवेळा भरले, असा प्रश्न उपस्थित करत डिझेलचा घोटाळा करणाऱया नगराध्यक्षांनी अन्य 11 प्रकरणांमध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

 विकासकामांना बाजूला ठेऊन स्वतःच्याच सहीने बिले काढणाऱया नगराध्यक्ष खेडेकर यांनी स्वतःची तुंबडी भरण्यापलिकडे काहीच केलेले नाही. नगर परिषदेच्या गाडी दुरूस्तीसाठी 11 लाख रूपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र 6 लाखातच नवीन वाहन खरेदी करता येत असताना दुरूस्तीवर एवढा खर्च कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

रस्त्यासाठी निधी मंजूर झालेला असतानाही रस्त्याचा थांगपत्ताच नसून तिसऱयाच रस्त्याच्या नावाने बिल काढल्याचेही उघड झाले आहे. सत्कारांसाठी लाखो रूपयांचा खर्च नगर परिषदेतूनच करण्यात आला आहे. प्रत्यक्षात एका साडीच्या दुकानातून ही बिले घेऊन नगर परिषदेस लुटण्याचे काम नगराध्यक्ष खेडेकर यांनी केले आहे. स्मशानभूमीच्या कामांवर निधी खर्च केल्याचे दाखवत यातूनही लाखो रूपयांचा घोटाळा केला आहे. सागाची लाकडेही गायब असून ही लाकडे नेमकी गेली कुठे, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

भडगाव येथे पत्नीच्या नावे असलेल्या 4 फ्लॅटकडे जाण्यासाठी अधिकाराचा दुरूपयोग करून पुलाची उभारणी करताना बौद्धवाडीतील रहिवाशांच्या बनावट सहय़ा घेऊन विशेष घटक योजनेतील 19 लाखाचा फंड लाटण्याचे काम केल्याचा आरोप करतानाच नगराध्यक्ष खेडेकर यांच्या आणखी 10 प्रकरणांचाही लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे स्पष्ट केले. नगर परिषदेत घोटाळय़ांवर घोटाळे करून लूट करणाऱया नगराध्यक्ष खेडेकर यांच्यावर तातडीने अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव सेना गटनेते प्रज्योत तोडकरी व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱयांकडे पाठवला आहे. लवकरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. जनतेच्या पैशांवर डल्ला मारून नगर प्रशासनास लुटणाऱया नगराध्यक्ष खेडेकर यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

सांगली : वाङ्मय प्रकल्प समितीवर प्रा. अविनाश सप्रे यांची निवड

Archana Banage

लक्ष्मीटेकडी परिसरात सापडल्या डेंग्यूच्या अळय़ा

Patil_p

देशात परतीच्या मान्सूनचा धुमाकूळ

datta jadhav

जलसंधारणचा कार्यकारी अभियंता लाचलुचपतच्या जाळय़ात

Patil_p

अन् भिंती लागल्या बोलू

Patil_p

विना परवाना फ्लेक्सप्रकरणी संतोषभाऊ जाधवांवर गुन्हा

Patil_p