Tarun Bharat

खेडमध्ये 2290 ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो!

Advertisements

14 गावे 24 वाडय़ांना पाणीटंचाईचे चटके, ग्रामस्थांची मदार टँकरच्या पाण्यावर

प्रतिनिधी/ खेड

एकीकडे कडाक्याच्या उन्हामुळे ग्रामस्थांना घाम फुटत असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईच्या भीषण चटक्यांनी ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून सद्यस्थितीत 14 गावे 26 वाडय़ांना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. या गाव-वाडय़ांतील 2290 ग्रामस्थ पाण्यासाठी अक्षरशः टाहो फोडत आहेत. या ग्रामस्थांची सारी मदार टँकरवरच अवलंबून असून एका शासकीय व 5 खासगी टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागवताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होवून झालेल्या मुबलक पाणीसाठय़ामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल, या भ्रमात प्रशासन होते. मात्र दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांची संख्या वाढतच चालली आहे. टंचाईग्रस्त गाव-वाडय़ा अर्धशतकाच्या उंबरठय़ावर येवून ठेपल्या आहेत. रणरणत्या उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्त्रोत आटत चालल्याने ग्रामस्थांची दाहीदिशा सुरू आहे. पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला असून शेतीच्या मशागतीची कामेही सुरू झाली आहेत. मात्र अवघा दिवस पाण्यासाठी वेचावा लागत असल्याने शेतीची कामे उरकायची तरी कधी, या विवंचनेत तहानलेले ग्रामस्थ आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मे अखेरीस टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांच्या संख्येत घटच झाल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेणाऱया गाव-वाडय़ांची संख्या वाढतच चालल्याने प्रशासनही मेटाकुटीस आले आहे. एकीकडे टंचाईग्रस्त गाव-वाडय़ा वाढत असताना दुसरीकडे मात्र अपुऱया टँकरअभावी ग्रामस्थांची तहान भागवताना प्रशासनाला अक्षरशः तारेवरची कसरतच करावी लागत आहे. 5 खासगी टँकरसह एका शासकीय टँकरद्वारे तहान भागवली जात असली तरी काही गाव-वाडय़ांना मात्र टँकरच्या पाण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

तालुक्यात दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या धनगरवाडय़ा पाण्यासाठी सर्वाधिक आक्रोश करत आहेत. या ठिकाणी रस्त्यांचा थांगपत्ताच नसल्याने टँकरही वाडय़ांपर्यंत पोहोचत नाहीत. याचमुळे ग्रामस्थांना डुऱयातील जेमतेम पाण्यावर तहान भागवून आला दिवस ढकलण्याची नामुष्की ओढवली आहे. तालुक्यातील 2290 ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा सुरू आहे. मूळगाव-वरचीवाडी व खालचीवाडी या 2 वाडय़ांतील ग्रामस्थ पाण्यासाठी हंबरडा फोडत आहेत. वरचीवाडीतील 292 तर खालचीवाडीतील 278 ग्रामस्थ पाण्याच्या शोधात आहेत. टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांना नियोजनबद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीचा प्रयत्न सुरू आहे.

Related Stories

पत्रकारांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

NIKHIL_N

क्रॉसिंगची सुविधा नसल्याने मोठी अडचण

NIKHIL_N

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबा बागायतदार धडकणार मुंबईत

Sumit Tambekar

शीळ धरणात बुडून तरूणाचा मृत्यू

Patil_p

राजन तेली यांचा राजीनामा नामंजूर

Ganeshprasad Gogate

घर फोडून चार लाखांच्या ऐवज लंपास

Patil_p
error: Content is protected !!