प. महाराष्ट्रातील प्रशिक्षक, खेळाडूंनी व्यक्ती केली भावना, जिल्हा नियोजनकडून विशेषनिधीची गरज
कोल्हापूर / संग्राम काटकर
गेल्या पाच ऑलिंपिकमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील किती खेळाडूंचा सहभाग होता. हे तपासले तर तो नगन्य असेच उत्तर येईल. कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, साताऱ्यातील धावपटू ललिता बाबर व तिरंदाज प्रविण जाधव यांच्याशिवाय अन्य खेळाडूला ऑलिंपिकमध्ये स्थान मिळालेले नाही. अंगात ऑलिंपिकपर्यंत झेप घेण्याची धमक आहे. पण त्यांना सरावासाठी आधुनिक साहित्य मिळत नसल्यानेच त्यांना मोठी झेप घेता येत नाही, हेही सत्य आहे. ही परिस्थिती बदलायची असेल पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व जिह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धासह ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी सरावास जे क्रीडा साहित्य लागेल त्याचा पुरवठा करणारी ‘मिशन ऑलिंपिक’ ही योजना जिल्हा नियोजन समित्यांनी सुरु करुन निधीची तरतुद करावी, अशी मागणी खेळाडू, प्रशिक्षकांमधून होत आहे.
महागडे सराव साहित्य घेणे परवडत नाही…


लंडन ऑलिंपिकवेळी तत्कालिन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना डोळ्यासमोर ठेवून ‘मिशन कोल्हापूर गोल्ड’ ही योजना अस्तित्वात आणली होती. या योजनेतून ऑलिंपिकवीर नेमबाज राही सरनोबत, बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, आंतरराष्ट्रीय मल्ल विक्रम कुऱहाडे, रेश्मा माने यांना त्यांच्या खेळाच्या सरावासाठी जे महागडे क्रीडा साहित्य मिळणे अपेक्षित होते ते सहजपणे मिळाले. खेळाडूंनीही क्रीडा साहित्याच्या आधारे कसून सराव करत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करत योजना सुरु करण्यामागचा उद्देश सफल केला. याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात मिशन ऑलिंपिक ही योजना सुरु करुन खेळाडूंना ऑलिंपिकपर्यंत मजल मारण्यासाठी पाठबळ द्यावे. – अर्षद देसाई प्रशिक्षक-जिल्हा लॉनटेनिस असोसिएशन


आंतरराष्ट्रीय स्टॅडर्डच्या सुविधा आवश्यकच
पश्चिम महाराष्ट्रात कुस्तीपासून ऍथलेटिक्सपर्यंत आणि जलतरणपासून बुद्धिबळपर्यंतच्या अनेक खेळांमध्ये राष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू आहेत. पण त्यांना आंतरराष्ट्रीय स्टॅडर्डचा सरावासाठी लागणारी सुविधा मिळत नाहीत. अनेक खेळाडूंना आधुनिक क्रीडा साहित्य घेणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. मिशन ऑलिंपिक ही योजना सुरु निधी दिल्यास खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्टॅडर्डचे महागडे सराव साहित्य खरेदी करणे सोपे हाईल. जे खेळाडू आधुनिक साहित्याच्या आधारे सराव करतात, तेच आंतरराष्ट्रीय स्पर्धापर्यंत पोहतात हा इतिहास आहे. – प्रा. पद्माकर जगदाळे रा. सांगली-टेनिस, व्हॉलीबॉल प्रशिक्षक


खेळाडूंना फिजीओथेरपीस्ट मिळालाच पाहिजे…
जो राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे, त्याला फिजीओथेरपीस्ट, क्रीडा मानसोपचारतज्ञ, बायोमॅकेनिस्ट आणि क्रीडा आहारतज्ञ मिळणे अत्यावश्यक आहे. या सुविधा खेळाडूंना मिळाल्यास ते अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनतीलच. शिवाय ते ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याइतपक लायक बनतील. पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत. त्यामुळेच गुणपत्ता असूनही खेळाडू ऑलिंपिकपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी खेळाडूंना सर्व सुविधा देणारी मिशन ऑलिंपिक ही योजना अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. – राष्ट्रीय बॅडमिंटनपटू ऋचा व प्रेरणा आळवेकर रा. वडणगे, ता. करवीर


प्रशिक्षकांना परदेशातील प्रशिक्षकांना पाठवावे लागेल…
राष्ट्रीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनवायचे असेल तर त्यांना सर्वात आधी त्यांच्या त्यांच्या खेळांचे मुख्य व सहायक प्रशिक्षक उपलब्ध होणे नितांत गरजेचे आहे. याचरोबर जगभरातील नामवंत प्रशिक्षकांना पश्चिम महाराष्ट्रात बोलावून खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणेही तितकेच गरजेचे आहे. शिवाय प्रशिक्षक व खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवल्यास त्यांना जागतिक पातळीवर काय पद्धतीने प्रशिक्षक दिले याची माहिती मिळेल. – राष्ट्रीय धावपटू सुदेष्णा शिवणकर रा. सातारा