वार्ताहर / नंदगड


हजारो भाविकांच्या उपस्थितीत खैरवाड येथील श्री दुर्गादेवी यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात झाला. मंगळवारी सकाळपासून भाविकांनी यात्रोत्सवाला गर्दी केली होती.
दुर्गादेवी मंदिर खैरवाड गावच्या उत्तरेला 3 कि. मी. डोंगरमाथ्यावर आहे. वर्षातून एकदा येथे यात्रोत्सव होतो. डोंगरावरील मंदिरात देवीची आकर्षक मूर्ती आहे. मंदिराला जाण्यासाठी डेंगरातून कच्चा रस्ता आहे. दुर्गादेवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जात असल्याने मंगळवार व शुक्रवारीही दर्शनासाठी भाविक येत असतात. खैरवाड गावापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
मंदिर परिसरात मोठमोठी झाडे आहेत. यात्रेनिमित्त येणाऱया भाविकांना देवीच्या दर्शनाबरोबरच निसर्ग सौंदर्याचा आनंदही येथे घेता येतो. त्यामुळे ग्रामस्थांसह माहेरवासिनी, पै. पाहुणे, भाविक वर्ग यात्रेसाठी आवर्जुन उपस्थित
राहतात. यात्रेनिमित्त मंगळवारी गाऱहाणे, श्रीफळ वाढविणे, ओटय़ा भरणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम झाले. बुधवारी खैरवाड गावात असलेल्या हुडगाम्मा देवीचा यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात झाला. दोन्ही देवींच्या यात्रोत्सवाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.