बागणी / वार्ताहर
दुधगाव ता मिरज येथील इलाही जमादार यांचे राहत्या घरी दुधगाव येथे अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे झाला. जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळाही घेतल्या आहेत. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, हे असे बागेवरी उपकार केले, अनाथ होईल वेदना जगी माझ्यानंतर या त्यांच्या काही प्रसिद्ध गझल होत.
२०२० च्या जुलै महिन्यात ते तोल जाऊन पडल्याने त्यांना जबर मार लागला होता. शिवाय वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतिभ्रंशही जडला होता. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी लिहिलेल्या १३ दोह्यांच्या ‘दोहे इलाहीचे’ या संकलनात्मक पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं होतं. इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने व मुशायरे यात भाग घेतला आहे. इलाही जमादार यांचे महाराष्ट्रतील अनेक शहरांत व महाराष्ट्रा बाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी गजलांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम झाले आहेत. इलाही यांनी ‘जखमा अशा सुगंधी’ आणि ‘महफिल-ए-इलाही’ या नावांचे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कर्यक्रम केले आहेत.
त्यांच्या काही गझला
मराठी – एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे
हिंदी अलबम- हिंदी पॉप गीते
संगीतिका – हिंदी – सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक. मराठी – स्वप्न मिनीचे
नृत्यनाट्ये : हिंदी नीरक्षीरविवेक, मराठी – मी कळी मला फुलायचे. या सर्व संगीतिका व नृत्यनाट्ये ’मनीषा नृत्यालय’ द्वारा रंगमंचावर सादर होत होत्या.
जखमा अशा सुगंधी, भावनांची वादळे, दोहे इलाहीचे, मुक्तक आदी इलाही जमादार यांचे काव्य किंवा गझल संग्रह- अनुराग, अनुष्का, अभिसारिका, गुफगू, मुक्तक असे त्यांचे प्रसिद्ध गझल संग्रह देखील आहेत. दफनविधी कार्यक्रम सोमवार १ फेब्रुवारी रोजी दुधगाव येथे होणार आहे.