ऑनलाईन टीम / गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवर दोन वेेगवेगळ्या वाहनांमधून 2 कोटी 20 लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. दोन्ही वाहनचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू झाल्यावर या कामात कोणती अडचण येऊ नये, यासाठी कंत्राटदार नक्षल्यांना खंडणी देत असतात. त्याच पार्श्वभूमीवर दोन वाहने अतिदुर्गम, नक्षली भामरागड तालुक्यात जाणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून ही कारवाई केली. दोन वेगवेगळ्या वाहनातल्या पिशवीतून 2 कोटी 20 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यातील एक स्कॉर्पिओ चंद्रपूर पासिंग तर दुसरी तेलंगाणा पसिंगची आहे.
तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने कंत्राटदाराने नक्षल्यांना खंडणी दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.