Tarun Bharat

गड-किल्ल्यांचे संवर्धन होणे काळाची गरज!

‘आधी तोरण गडाला मग माझ्या घराला’ अभियान

किल्ले रामगडवर दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे आयोजन

फुलांची आरास, तोरणे उभारून सुशोभिकरण

स्वच्छता मोहीम अन् विजयादशमीही साजरी

अनिल तोंडवळकर / बागायत:

महाराष्ट्रातल्या दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे विजयादशमीनिमित्त मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर ‘आधी तोरण गडाला मग माझ्या घराला’ या अभियानांतर्गत किल्ला संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी किल्ले रामगडावर विजयादशमीही साजरी करण्यात आली.

दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक रहिवाशांसमवेत रामगडावर रविवारी सकाळपासून स्वच्छता मोहीम राबवून त्यानंतर शिवप्रतिमेचे विधीवत पूजन करून शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर घोषणा देण्यात आली. शिवाजी महाराजांची आरतीही करण्यात आली. किल्ले रामगडावर सर्वत्र फुलांची आरास, तोरणे उभारून परिसर सुशोभित करण्यात आला.

रामगड येथील ग्रामस्थांचेही सहकार्य

महाराष्ट्रातल्या दुर्गवीर प्रतिष्ठानचे रवींद्र रावराणे यांनी सांगितले, सण 2008 साली मोजक्या किल्ले-गडप्रेमींच्या सहभागातून दुर्गवीर प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. सध्या महाराष्ट्रातील 10 किल्ले-गडांच्या संवर्धनासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान कार्यरत असून त्यातील मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्याची निवड झाली आहे. रामगड किल्ल्यावर 2015 सालच्या गुढीपाडव्यापासून स्वच्छता मोहीम प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत आहे. प्रत्येक महिन्यातून दोनवेळा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते येथे येऊन सहभागी होतात. याकामी रामगड येथील ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य लाभत असल्याची माहिती रावराणे यांनी दिली.

महाराष्ट्रातील दहा किल्ल्यांचा समावेश

महाराष्ट्रातल्या 10 किल्ले-गडांमध्ये नागोठणे येथील सुरगड, माणगाव येथील माणगड, कोल्हापूर येथील सामानगड, नाशिक येथील साल्हेर-मुल्हेर, सीमाभागातील कलानदीगड, गुहागरातील गोपाळगड तसेच कर्नाटक सीमेवरील वल्लभगड व इतरही किल्ल्यांचे संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. विजयादशमीनिमित्त ‘आधी तोरण गडाला मग माझ्या घराला’ हा प्रतिष्ठानचा संकल्प ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत विज्ञानाबाबत जनजागृती व माहिती मिळावी व लोक मोठय़ा संख्येने गड-किल्ल्यापर्यंत येऊ लागतील हाच मूळ उद्देश आहे. महाराष्ट्रातले गड-किल्ले पूर्वी राज्य कारभार चालविण्यासाठी गजबजलेले असायचे. त्यावेळी सर्व सण-उत्सव गडावरच साजरे व्हायचे. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती झाल्यावर अतिदुर्गम भागातील गड-किल्ल्यांवर जाणे-येणे कमी झाल्याने गड-किल्ले पडले. काही ठिकाणी फक्त कागदावरच गड-किल्ल्यांची नावे दिसत आहेत. यासाठी प्रत्येकाने पुरातन गड-किल्ले शाबूत राखण्यासाठी सहभागी होणे गरजेचे असून गड-किल्ल्यांचे संवर्धन होणे आज काळाची गरज असल्याचे रावराणे यांनी सांगितले.

13 एकर क्षेत्रात किल्ल्याची व्याप्ती

दिग्विजय राणे, विनोद घाडीगावकर, सायली आचरेकर, प्रतिमा गवाणकर, पंकज दळवी, रवींद्र रावराणे यांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबाबत उपस्थित किल्लेप्रेमी व ग्रामस्थांना उपयुक्त माहिती दिली. महाराष्ट्र शासनाकडून किल्ल्याकडे जाण्यासाठी कायमस्वरुपी पायवाट व्हावी, अशी मागणी दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करण्यात येणार आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग झाल्यास पर्यटक, स्थानिक विद्यार्थी तसेच इतरांना ऐतिहासिक वस्तूंची पाहणी करता येईल. रामगड किल्ल्याची तटबंदी अजूनही मजबूत असून 13 एकर जमीन क्षेत्रात किल्ल्याची व्याप्ती आहे. यापुढे किल्ल्यातील झाडेझुडपे लवकरच साफसफाई करून रामगड किल्ला ऊर्जितावस्थेत आणण्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती दिग्विजय राणे यांनी दिली. रवींद्र रावराणे, दिग्विजय राणे, विनोद घाडीगावकर, सायली आचरेकर, चेतन घोणे, योगेश गवाणकर, लकी कांबळी, प्रतिमा गवाणकर, भास्कर धुरी, पूर्वा वाघ, सहना प्रभूदेसाई, भाग्यश्री कुंभार, मैत्रेयी चव्हाण, पूनम कांबळी, पंकज दळवी, ऋतुपर्णा ठाकुर, कणकवली सायकल क्लबचे सदस्य नितांत चव्हाण व सहकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र रावराणे यांनी केले.

Related Stories

रत्नागिरी : खेडमध्ये एटीएम कार्डद्वारे महिलेचे ५८ हजार रूपये लांबवले

Archana Banage

भातगावात वाळूचा संक्शन पंपाव्दारे उपसा

Patil_p

ओटवणे विकास सोसायटी चेअरमनपदी दाजी गावकर तर व्हाईस चेअरमनपदी स्वप्नील उपरकर

Anuja Kudatarkar

मालवण नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर

Anuja Kudatarkar

वीज कनेक्शन कापू नये अशी लांजात भाजपची मागणी

Patil_p

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी येथे अपघात; एक ठार दोघे जखमी

Archana Banage