Tarun Bharat

गरीब-श्रमिकांना विशेष पॅकेजचा आधार

राज्य सरकारकडून 1,250 कोटींची घोषणा : लॉकडाऊनमुळे संकटग्रस्तांना दिलासा : सहकारी संस्थांच्या कर्जदारांनाही सवलत

प्रतिनिधी / बेंगळूर

लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यास गरिबांना आणि श्रमिक वर्गाला विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केली होती. त्यामुळे राज्य सरकारने मंगळवारी अर्थखात्यातील अधिकाऱयांची बैठक घेऊन विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बुधवारी सकाळी 11.30 वाजता विधानसौध येथे पत्रकार परिषद घेऊन पॅकेज देण्याच्या निर्णयाची घोषणा केली. कोरोना परिस्थितीमुळे कोणाचीही उपासमार होवू नये, याकरिता कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी देण्यात आलेल्या पॅकेजच्या धर्तीवरच यावेळीही पॅकेज देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारने घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजअंतर्गत राज्यातील 20 हजार फुलशेती करणाऱयांना 12.73 कोटी रुपये, 69 हजार फळ उत्पादकांना 69 कोटी रु., 2.10 लाख ऑटोरिक्षाचालकांना 63 कोटी रु., नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 494 कोटी रु., असंघटित क्षेत्रातील 3.04 लाख कर्मचाऱयांना 60.89 कोटी रु., रस्त्यावरील 2.20 लाख विपेत्यांना 44 कोटी रु., कलाकार आणि कला पथकांतील 16,095 लाभार्थींना 4.82 कोटी रु., रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्यांना धान्य वितरणासाठी 24 कोटी रु., प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेसाठी 180 कोटी रु., शेतकरी आणि स्वसाहाय्य बचत गटांच्या कर्जाच्या मुदतवाढीसाठी 134.38 कोटी रु., इंदिरा कॅन्टीनमध्ये मोफत भोजन वितरणासाठी 25 कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा केली आहे.

शेतकरी आणि स्वसाहाय्य बचत गटांनी सहकारी बँका किंवा संस्थांमधून घेतलेल्या लघु आणि मध्यम कालावधीच्या कर्जांचे हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीतील कर्जावरील व्याज सरकार भरणार आहे. लॉकडाऊन कालावधीत शहरी भागात गरिबांसाठी इंदिरा कॅन्टीनद्वारे मोफत आहार पुरवठा होत आहे. दररोज 6 लाख जणांना याचा लाभ होत असून याकरिता 25 कोटी रु. खर्च केले जात आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेंतर्गत बीपीएल रेशनकार्डधारकांना मे आणि जून महिन्यात माणसी 5 किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहेत. या योजनेतून 1.26 कार्डधारक कुटुंबातील 4.34 कोटी सदस्यांना लाभ मिळणार आहे. बीपीएल कार्डांतर्गत प्रत्येक कुटुंबाला याच कालावधीत 10 किलो मोफत तांदूळ तर एपीएलअंतर्गत 10 किलो तांदूळ देण्यात येत आहेत.

पॅकेजची घोषणा करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बेंगळूरमधील आपले गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे मंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा केली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण, गोविंद कारजोळ, लक्ष्मण सवदी, गृहमंत्री बसवराज बोम्माई, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, मंत्री एस. टी. सोमशेखर आदी उपस्थित होते.

मदतीची रक्कम थेट बँक खात्यात…

पॅकेज मदतीची रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मागीलवर्षी झालेल्या चुका यावेळी केल्या जाणार नाहीत. तातडीने मदतीची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्याची सूचना अधिकाऱयांना देण्यात आली आहे. पॅकेजसाठी पैशांची कमतरता नाही. राज्याची आर्थिक स्थिती तितकी चांगली नाही. तरीदेखील लॉकडाऊनमुळे संकटग्रस्त झालेल्यांना मदत देण्यात येत आहे. राज्यातील जनतेच्या सोबत सरकार आहे, असेही येडियुराप्पा यांनी सांगितले.

कोणा-कोणाला मिळणार पॅकेजचा लाभ…

  • ­ फळे, फुले, भाजी उत्पादकांना हेक्टरी 10 हजार रु.
  • ­ ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना 3 हजार रु.
  • ­ बांधकाम कामगारांना 3 हजार रु.
  • ­ रस्त्यावरील विक्रेत्यांना 2 हजार रु.
  • ­ कलाकार, कलापथकांना 3 हजार रु.
  •  असंघटित कर्मचाऱयांना (कर्नाटक राज्य असंघटित कर्मचारी सामाजिक मंडळाकडे नोंदणी केलेले हमाल, घरकाम करणारे, टेलर, मेकॅनिक, परीट, सुतार, कुंभार, केशकर्तनकार (सविता समाज), भट्टी कामगार, सुवर्णकार, लोहार, चांभार) 2 हजार रु.
  • ­ इंदिरा कॅन्टीनमध्ये एक वेळ नाश्ता, दोन वेळचे मोफत जेवण
  • ­ कोरोनाबाधितांवर सरकारी इस्पितळात मोफत उपचार
  • ­ बीपीएल कार्डधारकांना माणसी 5 किलो मोफत तांदूळ
  • ­ एपीएल कार्डधारकांना प्रति 15 रु. दराने 10 किलो तांदूळ
  • ­सहकारी संस्थांमध्ये कर्जाचे हप्ते (ईएमआय)
    1 मे 2021 ते 31 जुलै 2021 पर्यंत सूट

Related Stories

कर्नाटकात बुधवारी १४४० बाधितांची भर

Archana Banage

कर्नाटक: शेतकर्‍यांचे हक्क हिरावून घेण्याचा भाजपचा डाव : सिद्धरामय्या

Archana Banage

कोरोना : केंद्राने कर्नाटक, महाराष्ट्र, आणि आंध्र प्रदेशला सुनावले

Archana Banage

बेंगळूरमध्ये 33 बाधितांमध्ये ‘ब्लॅक फंगस’

Amit Kulkarni

बेंगळूरमध्ये कोरोनाचा उच्चांक

Archana Banage

कर्नाटकात कोरोना काळात १.२० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

Archana Banage