पूरस्थितीत शेतीची हानी टाळण्यासाठी कणकवली पंचायत समिती बैठकीत ठराव
कणकवली:
सिंधुदुर्ग जिह्यातील नदी, नाल्यांलगत असलेल्या शेतामध्ये पावसाचे पाणी शिरून मोठय़ा प्रमाणात पिकांचे नुकसान होते. शेतकऱयाचे हे नुकसान टाळण्यासाठी नदी, नाल्यांलगत संरक्षक भिंत उभारणे व गाळ काढण्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, असा ठराव सर्वानुमते कणकवली पंचायत समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण बैठक प. पू. भालचंद्र सभागृहात सभापती मनोज रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्यासह पं. स. सदस्य व अधिकारी उपस्थित होते. तालुक्यात 65 टक्के लसीकरण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी दिली. फोंडा विभागात लसींचा पुरवठा वाढवून द्यावा, अशी मागणी सुजाता हळदिवे यांनी केली. ज्या गावात लसीकरण होत आहे त्या गावातील नागरिकांना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे, अशी सूचना भाग्यलक्ष्मी साटम यांनी केली.
कोरोनामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात असून 80 टक्के विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके वितरित करण्यात आली, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी दिली. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षण आपल्या दारी उपक्रम राबविण्याची सूचना सभापतींनी केली. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या नाले व गटारांमध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी पं. स. सदस्यांना घेऊन पाहणी करावी, असे निर्देश सभापतींनी संबंधितांना दिले.
15 वित्त आयोगाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामाचा आराखडा तयार करताना प्रशासनाने सदस्यांना विश्वासात घेतले नाही. याबाबत सदस्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. या आयोगाच्या दुसऱया टप्प्यातील निधी प्राप्त झाला असून 10 दिवसांमध्ये कामांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये पं. स. सदस्यांनी कामे सूचवावीत, असे आवाहन त्यांनी केले.
अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून ते गणेशोत्सवापूर्वी बांधकाम विभागाने बुजवावेत व रस्त्यालगत वाढलेली झाडी-झुडपे तोडावीत, अशी सूचना सदस्यांनी केली. बैठकीत पशुसंवर्धन विभाग व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांनी तालुक्यात सुरू असलेल्या योजना व कामांची माहिती दिली. स्वातंत्र्यदिनाच्या 75 अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त युवा पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास समजावा म्हणून तालुक्यात अभिनव उपक्रम राबविण्याची सूचना सदस्य गणेश तांबे यांनी केली. महिला बालविकास कल्याण खात्याच्या ‘बाल संगोपन’ योजनेची माहिती अधिकारी अक्षता दंताळ यांनी बैठकीत दिली. बैठकीतील चर्चेत मिलिंद मेस्त्राr, महेश लाड, मंगेश सावंत, दिलीप तळेकर, सुजाता हळदिवे, स्मिता मालडीकर, तृप्ती माळवदे यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावाला अनुमोदकच नाही
नाटळ येथील मल्हारी नदीवर साकव उभारण्यासाठी व पूल बांधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पं. स. सदस्य मंगेश सावंत यांनी मांडला. मात्र, त्यांच्या ठरावाला कोणाचेही अनुमोदन नसल्याने व सदस्यांनी आक्षेप घेतल्याने हा ठराव मंजूर झाला नाही.