Tarun Bharat

गावरान कोंबडी दहावेळा पारखून घ्यायची वेळ

कोंबडी बाजारा खऱ्या कृत्रिम उबवणीच्या कोंबड्यांची उलाढाल

सुधाकर काशीद / कोल्हापूर

‘बर्ड फ्ल्यु’ मुळे कोंबडी बाजारावर जरूर परिणाम झाला आहे. मात्र त्याहीपेक्षा अस्सल गावरान कोंबडी आणि कृत्रिम ऊबवलेली पण गावरान दिसणारी कोंबडी यातला फरक सर्वसामान्यांना कळण्याच्या पलीकडे गेला आहे. कोंबडी बाजारातील या खऱ्या-खोट्या कोंबड्यांच्या उलाढालीत गावरान कोंबडी शोधून काढायची वेळ आली आहे. कोल्हापूर म्हणजे मांसाहाराचा घमघमाट आणि खाणारेही दर्दी. पण आता गावरान कोंबडी आणि कोंबड्यांची लज्जत राहूदेच. पण अस्सल गावरान कोंबडा कोंबडी बाजारात दहावेळा पारखुन निरखुन घ्यायची वेळ आली आहे.

कोल्हापूर हे मांसाहारी खवय्यांचे माहेरघर. दर बुधवारी रविवारी बहुतेक घरात मांसाहार ठरलेलाच. त्याहीपेक्षा काहीही निमित्त मिळू दे, ती मांसाहार करण्यासाठी संधी. असेच येथे मानले जाते. त्यामुळे मटन, कोंबडा कोंबडी ला कायम मागणी राहते.बकऱ्याच्या मटणाला किंवा मटणाच्या दराला एक पर्याय म्हणून ब्रॉयलर चिकन चा पर्याय पुढे आला आणि त्याची एक वेगळी बाजारपेठ निर्माण झाली. या पांढया कोंबड्या म्हणजे ब्रॉयलर कोंबड्या ही त्यांची ओळख तयार झाली. पण तरीही कोल्हापुरात गावरान कोंबडी आणि कोंबड्याला कायम मागणी राहिली.

यापूर्वी शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात घरगुती पातळीवर कोंबड्या पाळायचा छोटा उद्योग अनेक कुटुंबांनी जपला. दिवसभर कोंबड्या चरायला सोडायच्या. दिवस मावळला की खुराड्यात घालायच्या. त्यातल्याच काही कोंबड्या व खडकी अंडी रविवारच्या आठवडी बाजारात विकून घरखर्चाला चारपाचशे रुपयाची कमाई करायची असा हा उद्योग महिला वर्गाने मनापासून जपला. त्यामुळे कोल्हापुरातील दर रविवारचा कोंबडी बाजार कोंबड्यांच्या कलकलाटाने भरून जाऊ लागला.

अलिकडच्या काळात मात्र ग्रामीण भागातही घरगुती पातळीवर गावरान कोंबड्यांची पैदास कमी होऊ लागली. पूर्वी कोंबड्या गाव भर भटकायच्या आणि संध्याकाळी आपल्या आपल्या घराकडे परत यायच्या. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. खेड्यातही शहरा सारखेच वातावरण तयार झाल्याने गावरान कोंबडी पाळण्यावर मर्यादा आल्या आहेत. कोंबड्या फिरताना कोठेही घाण करत असल्यामुळे वादाचे प्रसंग उभे राहू लागले आहेत. अर्थातच बाजारात अस्सल गावरान कोंबड्या विक्रीसाठी येण्याचे प्रमाण कमी कमी होत गेले आहे.

या पार्श्वभूमीवर अगदी गावरान कोंबडी कोबंड्यांसारख्या दिसणाऱ्या कोंबड्यांची पैदास सुरू झाली. या कोंबडीची अंडी कृत्रिमरीत्या उबवली जातात. वीस रुपयाला एक पिल्लू विकले जाते. तीन-चार महिने हे पिल्लू बंदिस्त जाळीत धान्य टाकून पोसले की ते विक्रीसाठी तयार होते.अलीकडे याच पद्धतीने तयार होणाया कोंबड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्या अस्सल गावरान कोंबड्या सारख्याच दिसतात. आणि येथेच लोक फसतात. बाजारात गावरान आणि या डीपी कोंबडी यातील फरक समजून घेण्यासाठी बहुतेक जण कोंबडी निरखून पारखूनच घेतात. पण भलभले फसतात. म्हटल तर तसा हा खूप छोटा मामला पण कोल्हापुरात तो मांसाहारी खवैयाच्या दृष्टीने खूप महत्वाचा झाला आहे.

गावरान कोंबडी व कोबंड्याचा कुक कुक असा कलकलाटही गावरानच असतो. पण या कृत्रिम उबवलेल्या कोबडा कोंबडीत हा टिपीकल कुककुकचा सुर नसतो.

गावरान कोंबडी कोबडा आपल्या मालकाने घातलेली साद ओळखतो. या उबवलेल्या अंड्यातील कोंबडी कोंबड्यात ही भावना नसते.

अस्सल गावरान कोबंडी 400 रूपयाच्या आसपास मिळते. कृत्रीम उबवलेली पण गावरान सारखी दिसणारी कोबंडी 200 ते 250 रुपयाला मिळते.

Related Stories

फडणवीस,चंद्रकांत पाटील पडळकरांचे बोलवते धनी

Archana Banage

मोटारचा शॉक लागून शिरोळ येथील एकाचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : 22 हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांचा पोबारा

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात 14 कोरोनामुक्त, 9 नवे रूग्ण

Archana Banage

पालकमंत्री सतेज पाटील यांचा जिल्हा बँकेसाठी शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

Archana Banage

Kolhapur : इचलकरंजीत मित्राने मित्राचा केला खून

Abhijeet Khandekar