Tarun Bharat

गुजरातमध्ये आज 89 जागांसाठी मतदान

788 उमेदवार रिंगणात ः पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र, दक्षिण गुजरातमध्ये निवडणूक

@ गांधीनगर / वृत्तसंस्था

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवार, 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सौराष्ट्रातील 54 आणि दक्षिण गुजरातमधील 35 अशा एकंदर 89 मतदारसंघात गुरुवारी मतदान होणार आहे. उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला दुसऱया टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर गुरुवार, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

गुरुवारी मतदान होत असलेल्या 89 जागांसाठी तब्बल 788 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात यंदा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात त्रिकोणी लढत होत आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या (आप) रुपाने तिसरा पक्ष रिंगणात उतरल्याने रंगत वाढली आहे. एकूण 182 जागांपैकी विधानसभेच्या 181 जागांवर आम आदमी पक्षाने उमेदवार उभे केले आहेत.

पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी हे देवभूमी द्वारका जिह्यातील खंभलिया येथून निवडणूक लढवत आहेत. गुजरातचे माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, सहावेळा आमदार म्हणून निवडून आलेले कुंवरजी बावलिया, मोरबीचे ‘नायक’ कांतीलाल अमृतिया, क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा आणि आपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया हेही रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यासाठी भाजपच्या प्रचाराचे नेतृत्व केले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक भाजप नेत्यांनीही प्रचारसभांना संबोधित केले.

भाजप-काँग्रेसचे सर्व जागांवर उमेदवार

पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेसचे 89-89 उमेदवार आणि ‘आप’चे 88 उमेदवार रिंगणात आहेत. सुरत (पूर्व) मतदारसंघातील आपच्या उमेदवाराने शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पहिल्या टप्प्यातील एकूण 788 उमेदवारांपैकी 718 पुरुष आणि 70 महिला उमेदवार आहेत. भाजपने नऊ, काँग्रेसने सहा आणि आपने पाच महिलांना उमेदवारी दिली आहे.  मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) पहिल्या टप्प्यात 57 उमेदवार, भारतीय आदिवासी पक्षाने 14, समाजवादी पक्ष 12, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दोन उमेदवार उतरवले आहेत. याशिवाय 339 अपक्षही रिंगणात आहेत.

पहिल्या टप्प्यात 25,434 मतदान केंद्रांवर मतदान

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या भागात एकूण 2,39,76,670 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 1,24,33,362 पुरुष, 1,15,42,811 महिला आणि 497 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. गुजरातमध्ये एकूण 4,91,35,400 मतदार नोंदणीकृत आहेत. पहिल्या टप्प्यात 25,434 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यापैकी शहरी भागात 9,018 तर ग्रामीण भागात 16,416 मतदान केंदे स्थापन करण्यात आली आहेत.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार मंगळवारी संपला. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपच्या प्रचारसभांना संबोधित केले. त्यापूर्वी 27-28 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱयावर होते. नेत्रंग, खेडा, पालिताना, अंजार, जामनगर आणि राजकोट येथे त्यांनी सहा प्रचारसभांना संबोधित केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पक्षाचा जोरदार प्रचार केला. तसेच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यास अन्य नेत्यांनी प्रचाराचे रण गाजवले.

Related Stories

पंतप्रधान मोदींनी ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचं नाव बदललं

Archana Banage

उत्तराखंडातील उत्तरकाशीमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव; ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना राहुल गांधींचे पत्र

Archana Banage

लवकरच इंफाळपर्यंत धावणार रेल्वे : पंतप्रधान मोदी

Patil_p

निश्चलनीकरणाचा निर्णय वैधच

Patil_p

कुठल्याही आव्हानाकरता भारत सज्ज

Patil_p