Tarun Bharat

गुजरातमध्ये दुसऱया टप्प्याचा प्रचार समाप्त

विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर, अंतिम मतदान 5 डिसेंबरला, परिणामांची प्रतीक्षा

गुजरातमध्ये 2022 च्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे वाटचाल करु लागली आहे. मतदानाचा दुसरा आणि अंतिम टप्पा उद्या, अर्थात 5 डिसेंबरला असून त्यासाठीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी पाच वाजत समाप्त झाला. अंतिम टप्प्यात एकंदर 93 मतदारसंघांमध्ये मतदान होत असून हे मतदारसंघ मध्य गुजरात आणि उत्तर गुजरात या भागांमध्ये आहेत. मध्य गुजरातमध्ये 61 तर उत्तर गुजरातमध्ये 32 विधानसभा मतदारसंघ आहेत. एकंदर, 2 कोटी 54 लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा अधिकार उपयोगात आणणार आहेत.

मतदानासाठी प्रशासनाने पूर्ण सज्जता ठेवली आहे. 26,409 मतदान केंद्रांवरील 36 हजारांहून अधिक मतदानयंत्रे यासाठी उपयोगात आणली जाणार आहेत. एकंदर 14 जिल्हय़ांमध्ये हे मतदान होणार आहे. अहमदाबाद, वडोदरा आणि गांधीनगर हे यांपैकी महत्वाचे जिल्हे आहेत. सर्व पक्षांच्या अनेक महत्वपूर्ण उमेदवारांचे भवितव्य या मतदानानंतर यंत्रबंद होणार आहे. 29,000 मुख्याधिकारी आणि 84 हजारांहून अधिक निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती केलेली आहे.

महत्वाचे उमेदवार

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीत आहेत. त्याशिवाय हार्दीक पटेल (वीरमगाम) आणि अन्य मागासवर्गिय नेते अल्पेश ठाकोर (गांधीनगर दक्षिण) मधून भाजपचे उमेदवार म्हणून भाग्य आजमावत आहेत. काँगेसचेही काही महत्वाचे उमेदवार मैदानात आहेत.

मतगणना 8 डिसेंबरला

गुजरातमधील दोन्ही टप्प्यांची मतगणना 8 डिसेंबरला, अर्थात येत्या येत्या गुरुवारी होणार आहे. या निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर तो पक्षाचा या राज्यातील सलग सातवा विजय असेल. तसे झाल्यास हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीने 1977 ते 2011 या कालावधीत झालेल्या सात सलग सात विधानसभा निवणुकांच्या विजयाशी बरोबरी करणार आहे. भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये 1995 पासून झालेली प्रत्येक विधानसभा निवडणूक जिंकली आहे.

काँगेस-आपचाही जोर

काँग्रेस आणि दिल्ली तसेच पंजाबमध्ये असलेला आम आदमी पक्ष भाजपशी स्पर्धा करीत आहेत. भाजपला येथे सलग सातवा विजय मिळू द्यायचा नाही, यासाठी काँगेसने कंबर कसली आहे. काँगेसने यावेळी मोठय़ा सभा घेण्याऐवजी मुख्य भर घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर दिला आहे. दोन्ही पक्षांनी जोरदार प्रयत्न केलेले असून आम आदमी पक्ष राज्यात प्रथमच विधानसभा निवडणूक लढवित आहे. या पक्षाने राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुरतमध्ये बऱयापैकी यश मिळविले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविली जात आहे.  

कोणाचा कोणावर परिणाम

आम आदमी पक्षाची पाटी अद्याप गुजरात विधानसभेत कोरी आहे. हा पक्ष प्रथमच ही निवडणूक लढवित आहे. त्यामुळे त्याच्या प्रवेशाचा परिणाम भाजप आणि काँगेसवर काय होईल, हा गेला महिनाभर चर्चिला गेलेला प्रश्न आहे. या पक्षाच्या कामगिरीवर निवडणुकीचा परिणाम जरी पूर्णपणे अवलंबून नसला तरी, काही भागांमध्ये तो पडल्याचे दिसू शकते, असे मत अभ्यासकांनी व्यक्त पेले आहे. त्यामुळे परिणामांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँगेस हे गुजरातमधील एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत.

Related Stories

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसमध्ये ‘गृहयुद्ध’

Omkar B

स्वयंचलित मेट्रो सेवेचा दिल्लीत शुभारंभ

Patil_p

न्यायालय अवमानप्रश्नी ऍड. प्रशांत भूषण दोषी

Patil_p

शिवराज सिंह चौहान पंतप्रधानांच्या भेटीला

Patil_p

…तर मुस्लीम नेत्यांवरही द्वेषपूर्ण भाषणांसाठी कारवाई व्हावी, हिंदू सेनेची मागणी

Archana Banage

भारतीय लष्कर खूप शक्तिशाली आहे, पण….असदुद्दीन ओवेसी

Abhijeet Khandekar