आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई – तालिबान-विजयवाडा कनेक्शन उघड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातच्या मुंद्रा बंदरात गुप्तचरांनी एका जहाजावर टाकलेल्या धाडीत 21 हजार कोटी रुपयांचा हेरॉईन हा अमली पदार्थ हाती लागला आहे. या अमली पदार्थाने भरलेली किमान 30 पोती जप्त करण्यात आली असून एकंदर 3,000 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात हेरॉईन सापडण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे.
हे अमली पदार्थ अफगाणिस्तानातून आलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल गुप्तचर विभागाने त्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर एका जहाजाची तपासणी केली. एका कंपनीने अफगाणिस्तानातून अर्धप्रक्रियाकृत टाल्क पावडर आणत असल्याचा दावा केला होता. तथापि, ही टाल्क पावडर नसून हेरॉईन असल्याचे स्पष्ट झाले. या कंपनीचे नाव आशी ट्रेडिंग कंपनी असे असून ती आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे नोंद झालेली आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.


धागेदोरे अनेक शहरांमध्ये
आंध्र प्रदेशातील विजय वाडा येथे आशी कंपनीचे मुख्यालय आहे. तसेच अहमदाबाद, गांधीधाम आणि मांडवी तसेच दिल्ली आणि चेन्नई येथे या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले आहेत. या सर्व शहरांमध्ये झडती सत्र सुरु करण्यात आले असून अत्यंत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असल्याचा दावा करण्यात आला. ज्या दोन लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यांना 10 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता बरीचशी माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आल्याचे राज्य सरकारने स्पष्ट पेले आहे.
स्थानिक तस्करांसाठी
मंगळवारी सापडलेला साठा हा स्थानिक तस्करांना देण्यासाठी आणण्यात आला होता. नंतर या स्थानिक तस्करांकडून तो पुढे आंध्र प्रदेशात नेला जाणार होता. तेथून तो पूर्वेकडील देशांना पुरविला जाणार होता, अशी माहिती मिळाली आहे. अटक केलेल्या दोघांच्या चौकशीतून आणखी बरीच माहिती मिळणे शक्य आहे.
सात इराणी जहाजे
तीनच दिवसांपूर्वी गुजरातचे दहशतवादविरोधी दल आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 7 इराणी तस्करांना अटक करण्यात आली होती. त्यांना काही जहाजांमधून हेरॉईची तस्करी होत चालविल्याचा संशय होता. पोरबंदर येथे ही कारवाई करण्यात आली होती. या तस्करांकडून 30 किलो हेरॉईन जप्त झाले होते. अशा सात तस्करांना पोरबंदर येथे आणण्यात आले आहे.
तेव्हापासून गुजरात सागर तटावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. या इराणी तस्करांचा संबंध मंगळवारी सापडलेल्या हेरॉईनशी आहे काय याची चौकशी करण्यात येत आहे. तसेच ही साखळी तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
विजयवाडा कनेक्शन
मंगळवारी सापडलेल्या हेरॉईच्या प्रचंड साठय़ाचे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे नोंद असणाऱया आशी कंपनीशी कनेक्शन आहे. ही कंपनी रासायनिक पदार्थांची निर्मिती आणि व्यापार करते असे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात ती हेरॉईन तसेच अन्य अमली पदार्थांचा व्यापार छुप्या मार्गाने करते असे आता उघड झाले आहे. कंपनीच्या इमारतींची झडती घेण्यात आली असून त्या बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या गुप्तचरांनी दिली.
तालिबानशी संबंध ?
मंगळवारी सापडलेल्या साठय़ाचा संबंध अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीशी असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. तालिबानने सत्तेवर आल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी बंद करण्याचे आश्वासन दिले होते. अफगाणिस्तान अफू उत्पादनाचे जागतिक केंद्र आहे. अफूपासूनच हेरॉईन तयार केले जाते. मात्र या देशातून अद्यापही मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थांचा पुरवठा जगात केला जातो, ही बाब मंगळवारच्या घटनाक्रमानंतर स्पष्ट झाली आहे.
आंतरराष्ट्रीय कट शक्य
ड भारतातून पूर्वेकडील देशांमध्ये हेरॉईन तस्करीचा कट असणे शक्य
ड इराणी तस्करांचाही सहभाग, दोघांना अटक, कसून चौकशी सुरु
ड दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी यांचा संबंध झाला उघड ड गुजरात सागर तटावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे केंद्र सरकारचे आदेश