Tarun Bharat

गुजरात जायंट्स, तामिळ थलैवाज विजयी

वृत्तसंस्था/ पुणे

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत रविवारी झालेल्या विविध सामन्यात गुजरात जायंट्स आणि तामिळ थलैवाज यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविले. गुजरात जायंट्सने बेंगळूर बुल्सचा तर तामिळ थलैवाजने पुणेरी पलटनचा पराभव केला.

रविवारच्या सामन्यात गुजरात जायंट्सने बेंगळूर बुल्सचा 46-44 अशा केवळ दोन गुणांच्या फरकाने पराभव केला. गुजरात जायंट्स संघातील प्रतीक दाहियाचा खेळ आकर्षक झाला. त्याने एकूण 16 गुण मिळविले. कर्णधार चंद्रन रणजितने सुरुवातीला आपल्या चढायांमध्ये बेंगळूर बुल्सचे काही गडी बाद करून आपल्या संघाला सातव्या मिनिटात 5-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर प्रतिक दाहियाच्या शानदार चढायांमुळे बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद झाले. मध्यंतरापर्यंत गुजरात जायंट्सने बेंगळूर बुल्सवर 21-16 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धातील दुसऱया मिनिटाला बेंगळूर बुल्सचे दुसऱयांदा सर्व गडी बाद झाले. त्यानंतर अमन, राकेश आणि निरज नरवाल यांच्या शानदार खेळामुळे बेंगळूर बुल्सने गुजरात जायंट्सला 24 व्या मिनिटाला 24-24 असे बरोबरीत रोखले. 29 व्या मिनिटाला गुजरात जायंट्सने पुन्हा आघाडी मिळविली. 35 व्या मिनिटाअखेर पुन्हा दोन्ही संघ 36-36 असे बरोबरीत होते. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना बेंगळूर बुल्सने गुजरात जायंट्सचे सर्व गडी बाद करून केवळ एका गुणाची आघाडी मिळविली. शेवटच्या काही सेकंदामध्ये आक्रमक चढायांवर बेंगळूर बुल्सचे महत्त्वाचे कबड्डीपटू बाद करून गुजरात जायंट्सने 46-44 अशा दोन गुणांच्या फरकाने विजय संपादन केला.

रविवारी झालेल्या या स्पर्धेतील दुसऱया सामन्यात तामिळ थलैवाजने पुणेरी पलटनवर 35-34 अशा केवळ एक गुणाच्या फरकाने थरारक विजय नोंदविला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. पुणेरी पलटनतर्फे अस्लम इनामदारने 15 गुण तर तामिळ थलैवाजच्या नरेंद्रने 13 गुण मिळविले. मध्यंतरापर्यंत तामिळ थलैवाजने पुणेरी पलटनवर 16-15 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर नरेंद्रच्या सुपर रेडवर तामिळ थलैवाजचे पहिल्यांदाच सर्व गडी बाद झाले. त्यामुळे पुणेरी पलटनने तामिळ संघावर 24-16 अशी बढत मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात तामिळ थलैवाजचा खेळ अधिक आक्रमक झाला. पण पुणेरी पलटनच्या अस्लम इनामदारच्या भक्कम बचाव तंत्रामुळे तामिळ थलैवाजचे सर्व गडी बाद झाले. यावेळी तामिळ थलैवाज आणि पुणेरी पलटन यांच्यात केवळ 4 गुणांचा फरक होता. शेवटच्या काही सेकंदांमध्ये तामिळ थलैवाजने महत्त्वाचे काही गुण मिळवल्याने पुणेरी पलटनला हा सामना केवळ एका गुणाने गमवावा लागला.

Related Stories

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा लांबणीवर

Patil_p

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून पाकचा सोहेब मक्सूद बाहेर

Patil_p

स्वायटेक-बेन्सिक अंतिम लढत

Patil_p

खेलो इंडिया समशेरबाजी महिला स्पर्धेत भवानीदेवीचा सहभाग

Amit Kulkarni

स्विस बुद्धिबळ स्पर्धेत शशीकिरण संयुक्त आघाडीवर

Patil_p

बीसीसीआयकडून रुपरेषेबद्दल कोणतीही विनंती नाही

Patil_p