Tarun Bharat

गुजरात टायटन्सची राजस्थानावर 37 धावांनी मात,

आयपीएल : सामनावीर हार्दिकचे नाबाद अर्धशतक, मिलर-मनोहरची जोरदार फटकेबाजी, फर्ग्युसन-दयालचे प्रत्येकी 3 बळी

वृत्तसंस्था /भुवनेश्वर

कर्णधार व सामनावीर हार्दिक पंडय़ाने वैयक्तिक अर्धशतकासह अभिनव मनोहर व डेव्हिड मिलर यांच्यासमवेत केलेली जोरदार फटकेबाजी आणि यश दयाल व लॉकी फर्ग्युसन यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर गुजरात टायटन्सने येथे झालेल्या आयपीएलमधील साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 37 धावांनी धुव्वा उडवित  चौथा विजय नोंदवला.

गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 4 बाद 192 अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 9 बाद 155 धावांवर रोखत शानदार विजय साकार केला. हार्दिक पंडय़ा, मनोहर व मिलर यांच्या फटकेबाजीनंतर लॉकी फर्ग्युसन व यश दयाल यांची भेदक गोलदांजी निर्णायक ठरली. दोघांनी प्रत्येकी 3 बळी मिळविले. 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला बटलरने जोरदार सुरुवात करून दिली. पण दुसऱयाच षटकात पडिक्कल शून्यावर बाद झाल्यानंतर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले. बटलरने एकाकी लढत देत 24 चेंडूत 8 चौकार, 3 षटकारांसह 54 धावा फटकावल्या. पण त्याला इतर सहकाऱयांकडून पुरेशी साथ मिळाली नाही. शिमरॉन हेतमेयरने 17 चेंडूत 19, परागने 18, नीशमने 17 धावा करीत थोडाफार प्रयत्न केला. पण ते अपुरे पडले. फर्ग्युसनने 23 धावांत 3 बळी टिपले तर यश दयालने 40 धावांत 3 बळी मिळविले. याशिवाय हार्दिक पंडय़ा व शमी यांनी एकेक बळी मिळविला. राजस्थानचा हा 5 सामन्यातील दुसरा पराभव आहे.

हार्दिक, मनोहर, मिलरची फटकेबाजी

हार्दिकला (52 चेंडूत नाबाद 87) प्रथम अभिनव मनोहरकडून (28 चेंडूत 43) चांगली साथ मिळाली. त्यानंतर डेव्हिड मिलरच्या (14 चेंडूत नाबाद 31, 221.42 स्ट्राईकरेट) साथीने त्याने अखेरच्या टप्प्यात जबरदस्त टोलेबाजी करीत संघाला दोनशेच्या जवळपास मजल मारून दिली. गुजरातची ही पदार्पणाची स्पर्धा असून त्यात नोंदवलेली ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. हार्दिक व मनोहर यांनी चौथ्या गडय़ासाठी 86 धावांची भागीदारी केली तर मिलरसमवेत हार्दिकने केवळ 25 चेंडूत 53 धावा झोडपल्या.

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर गुजरातची खराब सुरुवात झाली आणि लवकरच त्यांची स्थिती सातव्या षटकात 3 बाद 53 अशी झाली. मॅथ्यू वेड 6 चेंडूत 12 धावा जमवित व्हान डर डय़ुसेच्या थेट फेकीवर धावचीत झाला तर शुभमन गिल 13 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विजय शंकरला सेनने 2 धावांवर बाद केले होते. हार्दिकने 52 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार, 4 षटकारांची आतषबाजी केली तर मनोहरने 4 चौकार, 2 षटकार मारले आणि मिलरने 5 चौकार, एका षटकाराने आपली खेळी सजवली. त्याने कुलदीप सेनने टाकलेल्या 19 व्या षटकात 21 धावा फटकावल्या.

हार्दिकने कुलदीपला जास्त टार्गेट केले होते. त्याने टाकलेल्या पाचव्या षटकात हार्दिकने सलग तीन चौकार मारले. त्यानंतर सातव्या षटकात त्याने रियान परागच्या गोलंदाजीवर आपला पहिला षटकार नोंदवला. मनोहरच्या साथी मिळाल्यावर धावांची गती आणखी वाढली. मनोहरने फॉर्ममध्ये असलेल्या चहलला एक चौकार व कव्हरवरून एक षटकार मारला. नंतर दोघांनी कुलदीपवर हल्ला करताना 14 व्या षटकात 3 चौकार वसूल केले. याच षटकात हार्दिकने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चौकार ठोकत आपले अर्धशतकही पूर्ण केले. पुढील षटकात अनुभवी आर. अश्विनला हार्दिकने सलग दोन षटकार खेचत एकूण 16 धावा जमविल्या. 15 षटकाअखेर टायटन्सने 3 बाद 130 अशी मजल मारली होती. मनोहर बाद झाल्यानंतर मिलरने धावांचा ओघ कायम ठेवत हार्दिकसह जोरदार फटकेबाजी केली आणि संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. राजस्थानच्या कुलदीप सेन, चहल, पराग यांनी एकेक बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स 20 षटकांत 4 बाद 182 : मॅथ्यू वेड 12 (6 चेंडूत 3 चौकार), गिल 13 (14 चेंडूत 2 चौकार), विजय शंकर 2 (7 चेंडू), हार्दिक पंडय़ा नाबाद 87 (52 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), अभिनव मनोहर 43 (28 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), मिलर नाबाद 31 (14 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), अवांतर 4. गोलंदाजी ः कुलदीप सेन 1-51, चहल 1-32, रियान पराग 1-12 (1 षटक), अश्विन 0-33, प्रसिद्ध कृष्णा 0-35, नीशम 0-29 (3 षटके).

राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 9 बाद 155 : बटलर 54 (24 चेंडूत 8 चौकार 3 षटकार), पडिक्कल 0, आर. अश्विन 8 (8 चेंडूत 1 षटकार), सॅमसन 11 (11 चेंडूत 1 षटकार), डय़ुसेन 6, हेतमेयर 29 (17 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), रियान पराग 18 (16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), नीशम 17 (15 चेंडूत 1 चौकार), प्रसिद्ध कृष्णा 4, चहल 5, कुलदीप सेन नाबाद 0, अवांतर 3. गोलंदाजी ः यश दयाल 3-40, फर्ग्युसन 3-23, शमी 1-39, हार्दिक 1-18, रशिद खान 0-24.

Related Stories

ट्रेलब्लेझर्सचा व्हेलॉसिटीवर सहज विजय

Patil_p

वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानूला रौप्यपदक

Patil_p

भारतीय वनडे संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे

Patil_p

भारतीय बॅडमिंटन संघ थायलंडला रवाना

Patil_p

पंतप्रधान मदतनिधीसाठी सनरायजर्स हैदराबादची 10 कोटींची मदत

Patil_p

डेव्हिड वॉर्नर उर्वरित मालिकेतून बाहेर

Patil_p