लागोपाठ पराभव पचवणाऱया गुजरातला फलंदाजीत चिंता, दोन्ही संघांच्या खात्यावर तूर्तास प्रत्येकी 16 गुण
पुणे / प्रतिनिधी
आपल्या पदार्पणाच्या आयपीएल हंगामात खेळणारे गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स संघ आज होणाऱया साखळी सामन्यात विजय संपादन करुन आयपीएल प्ले-ऑफ स्थान निश्चितीसाठी महत्त्वाकांक्षी असतील. आतापर्यंत गुजरातचा संघ सर्वाधिक वेळ अव्वलस्थानी राहिला असून मागील लढतीत लखनौने त्यावर आपला कब्जा केला. पंजाब किंग्स व मुंबई इंडियन्सविरुद्ध लागोपाठ पराभव पत्करावे लागल्याने त्यामुळे गुजरातची किंचीत पिछेहाट झाली. त्यावर मार्ग काढण्याचा आज त्यांचा प्रयत्न असेल.
यंदाच्या आयपील हंगामात अव्वल दोन संघांमध्ये म्हणजेच लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटनमध्ये ही काटय़ाची टक्कर असेल. मागील सामन्यात गुजरातला मुंबईकडून पराभवाचा फटका बसला होता. तर लखनौने कोलकात्याचा पराभव केला होता. त्यामुळे गुजरात परत विजयी ट्रकवर येण्यासाठी प्रयत्नशील असेल तर लखनौ आपला विजयरथ कायम ठेवण्यास उत्सुक असेल.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडेसातपासून सामन्याला सुरुवात होणार आहे. लखनौ 16 गुणांसह चांगल्या रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहे तर गुजरात 16 गुणांसह दुसऱया क्रमांकावर आहे. मागच्या मॅचमध्ये गुजरातने लखनौला अटीतटीच्या सामन्यात पराभूत केले होते. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी लखनौ प्रयत्नशील असेल.
लखनौच्या राहुलकडून चांगल्या धावा होत आहेत. त्याने आतापर्यंत या सिझनमध्ये दहा मॅचमध्ये 451 धावा बनवल्या आहेत. त्यामुळे तो ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये दुसऱया क्रमांकावर आहे. त्याच्या साथीला दुसरा सलामीवीर क्विंटॉन डी कॉकनेही मागच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक ठोकले होते. तशाच खेळीची अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे. यानंतर दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस हे मधल्या फळीत धावा काढत आहेत. आयुष बदोनी, कृणाल पंडय़ा यांना धावा काढण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यांनीही मधल्या फळीत धावा बनविल्या तर लखनौला सोपे जाईल. जेसॉन होल्डर याच्यासारखा अष्टपैलू खेळाडू आहे तर अवेश खान, दुष्मंत चमीरा, मोहसीन खान यांच्यासारखे फास्ट बॉलर आहेत. रवी बिश्नोईवर फिरकीची भिस्त असणार आहे.
गुजरातचे दोन्ही सलामीवीर वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल उत्तम फॉर्ममध्ये आहेत. दोघांकडूनही धावांचा रतीब कायम आहे. त्यानंतर हार्दिक पंडय़ाही या सिझनमध्ये उत्तम बहरात आहे. या सिझनमध्ये त्याने तीनशेपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर अशी फलंदाजी आहे. तेवातिया आणि रशिद खान हे गुजरातसाठी फिनिशरची भूमिका बजावत आहेत. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी, वरुण ऍरॉन, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, यश दयाल यांच्यावर फास्ट बॉलिंगची मदार असणार आहे तर, रशीदवर फिरकीची जबाबदारी असणार आहे.
संभाव्य संघ
गुजरात टायटन्स ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकिरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमनुल्लाह गुरबाझ, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, वरुण ऍरॉन, यश दयाल.
लखनौ सुपर जायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.