Tarun Bharat

गुढीपाडव्यानंतर काँग्रेस उमेदवारांची यादी?

एकाकी निवडणूक लढविण्याचा निर्णय : नवी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

प्रतिनिधी/ बेंगळूर

काँग्रेस पक्षाने देखील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी चालविली असून उमेदवार निश्चित करण्यासंबंधी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शुक्रवारी नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत 125 उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. ही यादी गुढीपाडव्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते. यावेळची विधानसभा निवडणूक एकाकी लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्यालयात शुक्रवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंबंधी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्य सचिव के. सी. वेणूगोपाल व इतर नेते बैठकीत सहभागी होते.

बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघातून कोणाला तिकीट द्यावे, यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला. 125 मतदारसंघांमधील उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली. तर एकापेक्षा अधिक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मतदारसंघांमधील नावे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे. प्रामुख्याने बैठकीत मुख्यमंत्र्यांची विजयी घोडदौड रोखण्यासाठी हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव मतदारसंघात कोणाला काँग्रेसची उमेदवारी द्यावी, याबाबत चर्चा झाली. लिंगायत समुदायातील प्रभावी नेताच उभा करून तोडीस तोड उमेदवार देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासंबंधी माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्याशी कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात आले आहे.

चार-पाच विद्यमान आमदार वगळता सर्व आमदारांना तिकीट देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. काँग्रेसचे कर्नाटकातील एकमेव खासदार आणि डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश यांचे नावही उमेदवार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे समजते.

सर्वांना तिकीट देणे अशक्य : शिवकुमार

पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर सायंकाळी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना डी. के. शिवकुमार यांनी, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कोणाशीही युती करणार नाही. एकाकी निवडणूक लढविणार असून काँग्रेस बहुमतासह सत्तेवर येणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. कर्नाटकातील सध्याचे सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. निवडणुकीसाठी पक्षातून 1250 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. सर्वांनाच तिकीट देणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

150 जागांचे उद्दिष्ट

224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 150 जागांवर विजय मिळविण्याचे उद्दिष्ट काँग्रेसने राखले आहे. निधर्मी जनता दलाने यापूर्वीच 93 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते 20 मार्च रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या बेळगाव दौऱ्यानंतर म्हणजेच गुढीपाडव्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे समजते.

बोम्माईंविरुद्ध विनय कुलकर्णी रिंगणात?

आतापर्यंत धारवाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विनय कुलकर्णी हे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याविरुद्ध हावेरीच्या शिग्गाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तयार झाले आहेत. काँग्रेस हायकमांडने विनय कुलकर्णींना बोम्माईंविरुद्ध निवडणूक लढविण्यास संमती दर्शविल्याचे समजते. नवी दिल्ली येथे शुक्रवारी पार पडलेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत शिग्गाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास कुलकर्णींना हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. पंचमसाली समुदायातील प्रभावी नेते म्हणून विनय कुलकर्णींची ओळख आहे. ते पंचमसाली समुदायासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. भाजप सरकारने पंचमसाली समुदायाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लिंगायत समुदायातील बसवराज बोम्माई यांच्याविरुद्ध लिंगायत पंचमसाली समुदायातील विनय कुलकर्णींना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय काँग्रेसश्रेष्ठींनी घेतला आहे.

Related Stories

काँग्रेस अध्यक्ष निवडणूक; दिग्विजय सिंहांची माघार, मल्लिकार्जुन खर्गे लढणार निवडणूक

Archana Banage

बिहार निवडणुकीपूर्वी महाआघाडीला झटका

Patil_p

शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग

Patil_p

जामा मशीद पाकमध्ये नाही

Patil_p

आलिशान स्थानकांवरून रेल्वेप्रवास होणार महाग

Patil_p

स्वदेशी कोवॅक्सिनची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू

Patil_p