सौंदत्ती येथील शिक्षण खात्याच्या अधिकाऱयाला अटक
प्रतिनिधी /बेळगाव
दहावीच्या गुणपत्रिकेतील नावांतील चुका दुरुस्ती करण्यासाठी लाच घेणाऱया सौंदत्ती येथील शिक्षण खात्याच्या एका अधिकाऱयाला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
सौंदत्ती गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील द्वितीय दर्जा साहाय्यक व्यंकटरेड्डी हनुमरेड्डी नेगली असे त्या अधिकाऱयाचे नाव आहे. एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
मारुतीगौडा महादेवगौडा पाटील (रा. कुटरनट्टी, पोस्ट हिरेबुदनूर, ता. सौंदत्ती) यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. मारुतीगौडा व त्यांचे मित्र महांतेश चंद्राप्पा बुतनवर या दोघा जणांच्या दहावीच्या गुणपत्रिकेत चुका होत्या. नावातील चुका दुरुस्त करून गुणपत्रिका पुरविण्यासाठी व्यंकटरेड्डी यांनी 1200 रुपये मागितले होते. बुधवारी 1 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.