Tarun Bharat

गुणवंत विद्यार्थी खाजगी शिकवणीचे असताना यशाचे श्रेय तुम्ही घेताच कसे ?

Advertisements

सदस्यांचा गटशिक्षण अधिकाऱ्यांना खडा सवाल
करवीरच्या मासिक सभेत शिक्षण विभागाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी / चूये

करवीर तालुका इतर तालुक्याच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या सधन आणि सक्षम असताना प्राथमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा अग्रेसर कधी होणार असा प्रश्न सदस्यांनी विचारल्यानंतर गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांनी नवोदयमध्ये करवीर आघाडीवर आहे असा खुलासा केला. नवोदयमध्ये आलेले विद्यार्थी हे खाजगी शिकवणीचे आहेत फक्त तालुक्यातील शाळेच्या हजेरीपटावर त्यांचे नाव आहे त्यामुळे नवोदयच्या यशाचे योगदान खाजगी शिकवणीचे असताना तुम्ही त्यांचे श्रेय घेतात कसे ? असा पलटवार सदस्यांनी करून गटशिक्षणाधिकारी यांच्या खुलाशाचा भांडाफोड करीत तालुक्याच्या शैक्षणिक दर्जा वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे पुन्हा एकदा करवीर तालुक्याचा प्राथमिक शिक्षण विभाग गुणवत्तेच्या विषयावरून चर्चेत आल्याचे चित्र आजच्या मासिक सभेत अधोरेखीत झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती अश्विनी धोत्रे होत्या. सभेच्या प्रारंभी हुतात्मा जवान संग्राम पाटील तसेच पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

गेले सात महिने ऑनलाइन सभेच्या संकटात सापडलेल्या करवीर पंचायत समितीला प्रथमच ऑफलाईन सभा घेण्याची संधी मिळाली मात्र या सभेत सदस्यांनी विविध विषयावरती तोंडसुख घेऊन प्रशासनाच्या कारभारावर अक्षरशा वाभाडे काढले सभेच्या प्रारंभी गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी सर्वांचे स्वागत केले. सभेच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाचा आढावा सुरू असतानाच त्यावरती आक्षेप घेत सदस्य सागर पाटील यांनी करवीर तालुका आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि सर्व सोयीसुविधा असताना प्राथमिक शाळेचा दर्जा अग्रेसर कधी होणार ? असा प्रश्न त्यांनी करीत करवीरच्या शिक्षण विभागावर हल्लाबोल केला त्यावरती खुलासा करताना गट शिक्षण अधिकारी एस. के. यादव यांनी नवोदयला 26 विद्यार्थी तर शिष्यवृत्ती ला ७२ विद्यार्थी आल्याची माहिती सांगितली त्यावरती आक्रमक सागर पाटील, अविनाश पाटील यांनी जोरदार आक्षेप घेत म्हणाले, करवीरमध्ये नवोदयला आलेले विद्यार्थी हे तुमचे नाहीत तर ते खाजगी शिकवणीचे आहेत फक्त नोंदणी तालुक्याच्या शाळेत आहे. त्यामुळे नवोदयच्या यशाचे श्रेय घ्यायचा तुम्हाला अधिकार काय ते श्रेय तुम्ही घेताच कसे असा सवाल त्यांनी करून शिक्षण विभागाला अक्षरशः धारेवर झाले.

अनेक प्रश्नांचा सदस्यांनी भडिमार केल्याने गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव निरुत्तर झाले. तालुक्यातील शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार कमी करतात तर राजकारणात जास्त अग्रेसर असतात अशी कोपरखळी सदस्य चंद्रकांत पाटील यांनी केली गुणवंत विद्यार्थ्यांच्या डिजिटल फलकावरती खाजगी शाळेचे शिक्षक दिसतात तर मग आमचे शिक्षक काय करतात असा सवाल सदस्य मोहन पाटील यांनी केला तालुक्यात मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने रिक्त आहेत तर शैक्षणिक दर्जा सुधारणार कसा त्यामुळे तात्काळ रिक्त शिक्षक भरण्याची मागणी करा अशी भूमिका सदस्य रमेश चौगुले यांनी मांडली. त्यावरती सभापती अश्विनी धोत्रे म्हणाल्या, रिक्त शिक्षकांच्या अडचणीबाबत जिल्हा परिषदकडे आम्ही मागणी केलेली आहे. नवीन शैक्षणिक उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहील.

उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ठरतेय त्रासदायक
उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्र दूरवरच्या गावासाठी त्रासदायक ठरत आहे. मुडशिंगी नेर्ली व त्या परिसराला प्राथमिक उपचार वेळेत देण्यासाठी नेरली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मागणीचा ठराव या सभेत मांडला. प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू असल्याची माहिती नागरिकांना नाही त्यामुळे प्रत्येक उपकेंद्रावरती प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाल्याच्या माहितीचा फलक लावावा अशी सूचना सदस्य सागर पाटील यांनी केली.

मासिक सभेत अधिकार्‍यांचे मोबाइल चॅटिंग….
तब्बल सात महिन्याने प्रथमच ऑफलाइन मासिक सभा सुरू असताना विविध विभागाच्या विषयावर सदस्य आपली भूमिका मांडत होते प्रशासनाकडून याबाबत खुलासा होत होता मात्र, त्याचवेळ सभा सदस्यांची आमचे ना घेणे न देणे अशा मनस्थितीत काही अधिकारी मोबाइल चॅटिंगमध्येच व्यस्त होते. ही बाब दक्ष उपसभापती सुनिल पवार यांच्या नजरेत पडली. त्याने तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी सभेत येताना मोबाईल बाहेर ठेवून या असे सुनावून अधिकाऱ्यांच्या गंभीर तेवर ताशेरे ओढले.

ग्रामपंचायतींचे ऑडिट नियमित का नाही
ग्रामविकासाचा कारभार करणाऱ्या ग्रामपंचायतीचे ऑडिट प्रत्येक वर्षी नियमाप्रमाणे होत नाही त्यामुळे ग्रामस्थांना सरपंच ग्रामसेवक सदस्यांनी केलेला कारभार जनतेसमोर येत नाही. त्याचा लेखाजोगा समजत नाही त्यामुळे ग्रामपंचायतीचे ऑडिट प्रतिवर्षी झाले पाहिजे याबाबत सभापती यांनी ग्रामपंचायत विभागाला तात्काळ सूचना द्यावी अशी भूमिका सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी मांडली.

तर सभागृहात पाऊल ठेवणार नाही
आक्षेपार्ह व्यवहाराची रीतसर माहिती मागून सुद्धा प्रशासनाकडून ती माहिती वेळेत मिळत नाही मासिक सभेत विचारलेल्या प्रश्नांना वस्तुनिष्ठ उत्तरे मिळत नाही तर आम्ही या सभेला यायचेच कशाला ? पदाधिकारी म्हणून जर आम्हाला अशी वागणूक असेल तर तालुक्यातील लाभार्थी जनतेने प्रशासनाकडून काय अपेक्षा ठेवायची. डिजिटल सिग्नेचर व्यवहारात चुकीच्या पद्धतीने कामकाज करून तालुक्यातील ग्रामपंचायतींना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे त्यामुळे प्रशासन दोषीवर काय कारवाई करणार. या प्रकरणात कारवाई होणार नसेल तर या सभागृहात मी पुन्हा येणार नाही अशी ठाम भूमिका सदस्य प्रदीप झांबरे यांनी मांडून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी बांधकाम ग्रामपंचायत विभाग कृषी विभाग महिला बालकल्याण पाणी पुरवठा विभाग विभागांच्या कामकाजाचा आढावा संबंधित विभागाच्या खातेप्रमुखा नी सभेत मांडला. आभार उपसभापती सुनिल पोवार यांनी मानले.

Related Stories

कोल्हापूर : ट्रॅक्टर ट्रॉलीची जीवघेणी वाहतूक

Abhijeet Shinde

शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा – आमदार जयंत आसगावकर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा शक्ती प्रदर्शनाने जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल

Abhijeet Shinde

कोल्हापूर : मुरगुडमध्ये अत्याधुनिक बोटींसह पुण्याहून एनडीआरएफची टीम तैनात

Abhijeet Shinde

ग्रामपंचायत निवडणुकीत यड्रावकर गटाची विजयी घोडदौड

Abhijeet Shinde

Kolhapur; सातेरी-महादेव डोंगरावर भाविकांची गर्दी; श्रावण महिन्यातील सोमवारचे औचित्य

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!