397 वर्षानंतर सुवर्णसंधी : अवकाशप्रेमींसह सर्वसामान्यांना पर्वणी : पुढील संधीसाठी 2080 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सूर्यमालेतील गुरु आणि शनि या सर्वात महाकाय ग्रहांमध्ये घडणाऱया युतीचा सुंदर नजारा सोमवारी सायंकाळनंतर पश्चिम दिशेला पाहायला मिळणार आहे. सुमारे 397 वर्षानंतर अशी खगोलीय घटना घडणार आहे. त्यामुळे अवकाशप्रेमींसह सर्वसामान्यांना वेगळी पर्वणी मिळणार आहे. दुर्बिणीतून हे दोन्ही ग्रह पाहणे ही एक मोठी खगोलीय संधीच असेल. पण दुर्बिणीशिवायही सर्वांना या घटनेचा अनुभव घेणे सहज शक्मय आहे.
पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा गुरु ग्रह 21 डिसेंबरला शनि ग्रहाच्या अगदी जवळ येणार आहे. 21 डिसेंबरपासून पुढील दोन-तीन दिवस या दोन ग्रहांमध्ये केवळ 0.1 अंश अंतर असेल. त्यामुळे ते दोन ग्रह वेगळे नसून एकच मोठी ज्योत असल्याचे भासणार आहे. 16 जुलै 1623 रोजी म्हणजे गॅलिलिओच्या काळात असा अविष्कार घडला होता. त्यानंतर तो आता 21 डिसेंबर 2020 ला घडत आहे. नंतर असा नजारा पाहण्यासाठी 2080 सालापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गुरु ग्रह पृथ्वीपेक्षा 13 पट मोठा असून 4 कोटी किलोमीटरवरून सूर्याभोवती 11.86 वर्षात एक फेरी मारतो. शनि ग्रह पृथ्वीपेक्षा 9.5 पट मोठा असून सूर्याभोवती 29.5 वर्षांत एक फेरी पूर्ण करतो. या दोन ग्रहांची युती 19 वर्षे 7 महिन्यांनी घडते. हे दोन्ही ग्रह एकरुप झालेले दिसण्यासाठी हे ग्रह आणि पृथ्वी सरळ रेषेत यावे लागतात. हा योग दुर्मिळ असून तो सोमवारी (21 डिसेंबर) साधणार आहे. म्हणून त्यास ‘महायुती’ असे संबोधण्यात आले आहे.
21 डिसेंबरला सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिमेला पाहिल्यास क्षितिजावर सुमारे 25 ते 30 अंश उंचीवर ठसठशीत-तेजस्वी असा गुरु-शनि महायुतीचा सुंदर नजारा आपले लक्ष वेधून घेणार आहे. एकाच रेषेत दोन महाकाय ग्रह पाहण्याची आणि कॅमेराबद्ध करण्याची ही दुर्मिळ संधी आज अवकाशप्रेमींना मिळणार आहे.
‘महायुती’चा अर्थ…
21 डिसेंबर 2020 रोजी गुरु-शनिची ‘महायुती’ घडेल. याचाच अर्थ गुरु व शनि एवढे एकत्र येतील की दोन स्वतंत्र चांदण्यांऐवजी दोघांची मिळून ‘एकच चांदणी’ दिसू लागेल. आकाशात गुरु व शनिची ही अशी अवस्था दिनांक 20, 21, व 22 डिसेंबरपर्यंत पाहायला मिळेल. यालाच गुरु व शनिची ‘महायुती’ म्हणतात. 22 डिसेंबरनंतर गुरु ग्रह शनिला ओलांडून पूर्वेकडे सरकत गेल्यामुळे दोन्ही ग्रहातील अंतर पुन्हा वाढत जाईल.