Tarun Bharat

गुहागरातील अंगणवाडय़ांना निकृष्ट पोषण आहार

वार्ताहर / तवसाळ :

तालुक्यातील अंगणवाडय़ांना पुरवण्यात येत असलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. तवसाळ खुर्द येथील पालकांनी हा पोषण आहार अंगणवाडीमध्ये परत करून संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी गटविकास अधिकाऱयांकडे केली आहे. 

तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत 197 अंगणवाडी व 39 मिनी अंगणवाडी चालू आहेत तर पेवे  मोहल्ल्यातील अंगणवाडी बंद आहे. या अंगणवाडीमधून 3 ते 6 वयोगटातील 2711 बालके व तीव्र कमी वजनाची 60 बालके नोंदवण्यात आली आहेत. तसेच 988 गर्भवती स्तनदा मातांची नोंद आहे. उज्वल भविष्यासाठी शासनाकडून नवजात बालकांच्या जन्माअगोदर व जन्मानंतर अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना पोषण आहार पुरवला जातो. पूर्वी एकत्रित मिश्रणाचा, तर नंतर शेंगदाणे, गहू, सोयाबीन, साखर, गुळ, तेल यांचा एकत्रित पोषण आहार बालके व गर्भवती-स्तनदा माताना विभागून दिला जात होता. नोव्हेंबर 2019पासून यामधे बदल करून गहू, तांदुळ, मीठ, मसाला, चणा, तेल, हळद, चवळी, मसुरडाळ अशा प्रकारचा पोषण आहार पुरवला जात आहे. लॉकडाऊन काळात या पुरवठय़ात खंड पडला होता. 2 ते 3 दिवसापूर्वी संबंधित ठेकेदाराकडून पोषण आहार अंगणवाडय़ांना व तेथून बालके आणि लाभार्थ्यांपर्यंत पुरवण्यात येत आहे. तवसाळ खुर्द अंगणवाडीत माता-पालकांनी हा कच्चा पोषण आहार उघडून पाहिला असता त्यामधील मसूरडाळ, मसाला, मीठ व इतर आहार निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. या आहाराचे कधी पॅकिंग केले गेले, याविषयी कोणतीच छापील माहिती त्यावर नाही. त्यामुळे माता-पालकांनी या बाबत अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्याकडे हा निकृष्ट पोषण आहार परत केला आहे. पोषण आहार वाटपाबाबत गटविकास अधिकाऱयांकडून अधिक माहिती घेतली असता मे व जून महिन्याचे पोषण आहार वाटप होत असल्याचे सांगण्यात आले.

  या निकृष्ट पोषण आहाराबाबत गुहागर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उपविभागीय अधिकारी चिपळूण, तहसीलदार गुहागर, गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गुहागर यांच्याकडे निवेदन देऊन निकृष्ट पोषण आहार तातडीने बदलून मिळावा व अशा प्रकारचा पुरवठा करणाऱया एजन्सीवर तत्काळ कारवाई करून त्यांचा पुरवठा ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे.       कोरोना महामारीचे संक्रमण हे लहान बालकांसाठी धोकादायक आहे. अशा गंभीर परिस्थितीत निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा करून बालकांच्या, गर्भवती-स्तनदा मातांच्या जीवाशी खेळणाऱयांवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.

             पोषण आहार बदलण्याचे ठेकेदाराला आदेश: भोसले

  निकृष्ट दर्जाच्या वितरित होत असलेल्या पोषण आहाराच्या पार्श्वभूमीवर आपण संबंधित ठेकेदाराला तत्काळ आहार बदलून देण्याचे आदेश दिल्याचे गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी सांगितले. ठेकेदाराने पोषण आहार वितरित करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱयांना दाखवून वितरित करावयाचे असताना परस्पर वितरण होत असल्याने यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

गावातील रस्त्यांसाठीही मुबलक भरपाई मिळावी

NIKHIL_N

वाहून गेलेला संसार उभारताना महिलांची कसरत

Patil_p

इन्सुली येथील पिता पुत्रांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

Anuja Kudatarkar

नौकेला हर्णे बंदरात जलसमाधी!

Patil_p

चौके येथे २०ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर

Anuja Kudatarkar

जिह्यात लसीकरणाची आज रंगीत तालीम

Patil_p